पत्रकारांसाठी पत्रकारांच्याच प्रयत्नातून ‘कोरोना कवच विमा’, मुळशीचे पत्रकार ठरले आदर्श

0
694

पौड, ता.मुळशी, जि.पुणे : येथील तहसील कार्यालयात पत्रकारांना कोरोना कवच विमा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी तहसिलदार चव्हाण, पोलीस निरिक्षक धुमाळ तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

           कोरोनाच्या संकटात आपल्या लेखनीने समाजात कोरोनासह इतर माहिती पत्रकार बांधवांनी इत्थंभूतपणे समाजात पोहोचवली व पोहोचवत आहेत. त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता पत्रकार काम करत आहेत. इतर (डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रशासन, स्वच्छता कर्मचारी, विविध शासकीय कर्मचारी) कोरोना योद्ध्यांसारखा मान व सन्मान पत्रकारांच्या नशिबी मात्र आला नाही. सरकारकडूनही पत्रकारांसाठी विशेष काही केले गेले नाही. साधा विमादेखील पत्रकारांना लागू करण्याचे औदार्य दाखवले गेले नाही. पत्रकार हा कायम दुर्लक्षित आणि तसा इतर घटकांच्या तुलनेत आजपर्यंत वंचितच राहिला आहे. कोरोना महामारीही याला अपवाद ठरली नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

           पुण्यासारख्या प्रगत शहरातले मुख्य प्रवाहातील पत्रकार पांडूरंग रायकर यांना व्हेंटिलेटर वेळेत न मिळाल्याने झालेला मृत्यू पत्रकारितेची अब्रु घालवणारा तर सरकारी व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगणारा ठरला. मुख्य प्रवाहातील पत्रकारांची ही दुर्दशा, तर ग्रामीण भागातील पत्रकारांची काय दशा असेल याचा विचार न केलेलाच बरा. मात्र रायकरांच्या दुःखद निधनानंतरही पत्रकारांसाठी कोणतेही ठोस पाऊल न उचलणारे शासन पाहता पत्रकारांनाच पत्रकारांसाठी धावपळ व प्रयत्न यापुढे करावे लागणार आहेत. असाच एक छोटासा आणि आदर्श प्रयोग पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातील पत्रकारांनी केला आहे. तालुक्यातील पत्रकारांसाठी कोरोना कवच विम्याचा लाभ देऊन एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. पत्रकारांना यासाठी हिंजवडी आयटी सिटीतील डी.बी फॅसिलिटीज प्रा.लि.कंपनीचे संचालक दिलीप भरणे यांनी तत्काळ आर्थिक सहाय्य केले.

स्वराज्यनामा ऑनलाईन : मुळशी तालुक्यात कोरोना महामारीचा कहर दिवसोंदिवस वाढतच असून गावनिहाय कोरोना बाधीत रुग्ण संख्येत सुद्धा कमालीची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर दैनंदिन वार्तांकन करण्यासाठी सतत घराबाहेर असणाऱ्या मुळशीतील पत्रकार बांधवांचा कोरोना कवच विमा काढण्यासाठी अखेर पत्रकारच पत्रकारांसाठी सरसावल्याचे उदाहरण मुळशीत समोर आले आहे. मुळशी तालुक्यात पत्रकारांच्या प्रयत्नांतून पत्रकारांसाठी ‘कोरोना कवच’ विमा प्रदान सोहळा पौड येथे तहसिल कार्यालयात पार पडला. यासाठी एका खासगी कंपनीने पत्रकारांना सहाय्य केले.

           कोरोना महामारीच्या कालावधीत अगदी सुरुवाती पासून मुळशी तालुक्यातील सर्वच उपनगर वार्ताहर आपला जीव धोक्यात घालून गावठाण, वाड्यावस्त्यांवर तसेच विविध शासकीय कार्यालयात उपस्थित राहून दैनंदिन घडामोडी तसेच कोरोना विषयीच्या घडामोडी बातमीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत. राज्य शासनाकडून आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच कार्यरत असणाऱ्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले, त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमा संरक्षण आणि उपचारासाठी कोविड रुग्णालयात विशेष तरतूद देखील करण्यात आली. मात्र दुसरीकडे अशा विदारक परिस्थितीत सुद्धा प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणारे पत्रकार मात्र या सगळ्यांपासून दुर्लक्षित राहिले.

           अगदी सुरवातीला एप्रिल महिन्यापासून ते अनलॉक कालावधी सुरू होई पर्यंत तालुक्यातील अनेक राजकीय नेते, स्वयंघोषीत पुढारी, सामाजिक संघटना तसेच सेवाभावी संस्था देखील हजारो गरजू नागरिकांना किराणामाल, अन्नधान्य तसेच आरोग्याच्या सुरक्षेसाठी औषधे, मास्क, सॅनिटायझर वाटण्यात व्यस्त होते. मात्र वेळोवेळी सर्व घडामोडींचे अचूक वार्तांकन करणाऱ्या तालुक्यातील पत्रकार बांधवांचा त्यांनाही विसर पडल्याने अखेर तालुक्यातील काही पत्रकार बांधवांनी पुढे सरसावत आपल्या सहकारी पत्रकार बांधवासाठी कोरोना कवच विमा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यास यश आले असून मंगळवारी (दि.१३) दुपारी पौड येथील तहसील कार्यालयात पत्रकारांना कोरोना कवच विमा प्रमाणापत्र वितरणाचा औपचारिक कार्यक्रम पार पडला.

           यावेळी मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक धुमाळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, उद्योजक राजेंद्र बांदल, पत्रकार बंडू दातीर, दीपक सोनवणे, रोहिदास धुमाळ, विजय वरखडे, गोरख माझिरे, महेश मांगवडे, संजय दुधाणे, बाळासाहेब कुरपे आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमासाठी पत्रकार रोहिदास धुमाळ, विजय वरखडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

पत्रकारांच्या विम्यासाठी आयटीनगरी हिंजवडीतील उद्योजक दिलीप भरणे यांचे सहाय्य

           पत्रकारांसाठी संरक्षण म्हणून विमा सुरक्षा कवच असायला पाहिजे यासाठी काही पत्रकारांनी सहकार्याबाबत विचारणा केल्यावर, ताबडतोब सर्वोतोपरी मदत करण्यासाठी होकार दिला. कोरोनाच्या विदारक परिस्थितीत देखील आपल्या जीवाची पर्वा न करता दररोज अचूक वार्तांकन करणाऱ्या पत्रकार बांधवांसाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून सहकार्य केले आहे. – दिलीप भरणे : संचालक, डी.बी फॅसिलिटीज प्रा.लि. हिंजवडी आयटी सिटी.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here