मुळशी तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांची आढावा बैठक, प्रशासनाचं कौतुक

0
948

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  प्रशासनाने उत्तम काम करत लॉकडाऊन काळात मोलाची साथ दिली आहे. त्यांच योगदान खरंच शाबासकी लायक असल्याचे मत बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पौड, ता.मुळशी येथे व्यक्त केले. मुळशी तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आणि कोरोनाची सद्यस्थिती व उपाययोजना यांचा आढावा सुळे यांनी आज मुळशी पंचायत समितीच्या सेनापती बापट सभागृहात शासकीय अधिकारी व पंचायत समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत घेतला. चक्रीवादळानंतर प्रचंड नुकसान झालेली विद्यूत यंत्रणा युद्धपातळीवर पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न आणि अंमलबजावणी करणाऱ्या महावितरण यंत्रणेचं विशेष कौतुकही टाळ्या वाजवून करण्यात आलं.

            या प्रसंगी तहसिलदार अभय चव्हाण, पोलीस निरिक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदिप जठार, सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, अंजली कांबळे, माजी सभापती कोमल वाशिवले, राधिका कोंढरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, माजी सभापती रविंद्र कंधारे, आरोग्य अधिकारी अजित कारंजकर, महावितरण अधिकारी राजेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामभाऊ ठोंबरे, शांताराम इंगवले, सुभाष अमराळे, अंकुश वाशिवले, शंकर काका पवळे, दिपाली कोकरे, सुनिल वाडकर, सतिश सुतार, निलेश पाडाळे, योगेश ठोंबरे, मधुर दाभाडे, विविध सरपंच, महिला पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे यांनी मुळशीतला काय काय आढावा घेतला?

            खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वच पातळ्यांवर मुळशीतला आढावा घेतला. मुळशी तालुक्यात रस्त्यांची दयनीय अवस्था व ते लवकर पुर्ण व्हावेत यासाठी पीएमआरडीए, पीडब्लूडी आणि सर्वच शासकीय यंत्रणेची ऑनलाईन मिटींग घेऊन संबंधितांशी याबाबतीत चर्चा करणार असल्याचे यावेळी जाहिर केले. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे ८ दिवसात पुर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. ताईंनी तालुक्यात मनरेगाची कामं पटापट करून घेण्याची सुचना केली. रेशनिंगच्या लाभापासून क्वचिक वंचित राहिलेल्यांनाही लाभ देण्यात यावा तसेच बहुतांश लोकांना रेशनिंग व्यवस्थित मिळाल्याचेही सांगितले. पशुसंवर्धन विभागाला विविध आदेश देण्यात आले. खतांच्या किमती सर्वत्रच सारख्या असाव्यात अशी सुचना माजी सभापती रविंद्र कंधारे यांनी केली. तसेच कंधारे यांनी मुळशीकरांना त्यांच्या हक्काचे अधिकचे २ टीएमसी पाणी मिळावे, अशीही मागणी यावेळी केली. पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे यांनी पिरंगुट परिसरातील ओढा व लवळे फाटा येथील पुलावरील रस्ता तातडीने दुरूस्त करून पाणी साचणार नाही अशी कार्यवाही करण्याची मागणी केली.

शाळा व शिक्षणाबाबत काय झाली चर्चा व काय निघाला निष्कर्ष… ?

            कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वच शाळा बंद आहेत. तर या शाळा सुरू करण्याबाबत विविध मतं मांडली गेली. जर शिक्षक आधीपासूनच गावात राहत असतील तर त्यांनी शाळा चालू करायला हरकत नाही, असा एक मतप्रवाह मांडला गेला. पुणे शहरातून येणाऱ्या शिक्षकांनी आधी १५ दिवस इकडे क्वारंटाईन राहून व त्यानंतर येथेच वास्तव्य करून त्यानंतर सोशल डिस्टंसिंग पाळून शाळा शिकवण्यास हरकत नाही असेही मत मांडले गेले. तर शाळांच्या फी बाबतीत खाजगी शाळांकडून होणारी मागणीही पालकांसाठी त्रासदायक असल्याचे चर्चेत बोलले गेले.

            तर यावर सुळे यांनी फीच्या बाबतीत म्हटले की, जर पालकांनी फी नाही भरली तर शिक्षकांना पगार मिळणार नाही आणि मग ती शाळा बंद पडू शकते. त्यामुळे दोन्ही बाजूने विचार करणे गरजेचे आहे. तर शासन शाळांच्या बाबतीत काय निर्णय घेतंय हे पाहणंही महत्वाचं ठरेल असे सांगून प्रशासन व राज्य सरकार याबाबतीत योग्यच निर्णय घेतील अशी आशा व्यक्त केली.

स्थानिक तरूणांना औद्योगिक कंपन्यांमध्ये रोजगार मिळावा यावरही चर्चा…

            लॉकडाऊनमध्ये परराज्यातील अनेक कामगार मुळगावी निघून गेले आहेत. तर स्थानिक तरूण आजही कामाच्या शोधात असतात. यावर उपाय म्हणून स्थानिक तरूणांना औद्योगिक कंपन्यांमध्ये रोजगार मिळावा म्हणून इंडस्ट्रियल असोसिएशनची बैठक घेणार असल्याचे सुतोवाच सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिले. तर स्थानिक तरूणांनीही रोजगाराची संधी सोडू नये असे आवाहनही सुळे यांनी केले. येथील आयटीआयच्या विद्यार्थ्यांना अग्रभागाने रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले.

कोरोनाबाबतीत प्रशासनाचं कौतुक आणि ताईंच्या सुचना…

            कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने उत्तम कामगिरी पार पाडली. पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी, विविध शासकीय पदाधिकारी यांचे साडेतीन महिन्याच्या काळात कधीच फोन बंद नव्हते. पोलीस अधिक्षक तर कुटूंबियांपासूनही सोशल डिस्टंसिंग पाळून राहत असल्याचे फोटो सगळ्यांनी पाहिले. पोलीस बांधव व कोरोना योद्धे कोणताही विचार न करता आपलं कर्तव्य बजावण्यासाठी मागे पुढे न पाहता ते पार पाडत होते. त्याचप्रमाणे आता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करावे लागणार असून सर्वांनी कामाला लागून सुरक्षिततेचे भान ठेवून आपले कर्तव्य पार पाडावे, असे सुळे यांनी सांगितले. तसेच प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघात या साडेतीन महिन्याच्या काळात कोणालाच उपाशी झोपावे लागले नसल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे सुळे म्हणाल्या.

            उपस्थित पदाधिकाऱ्यांना बोलताना ताई म्हणाल्या की, काळजी घेणं महत्वाचंच, पण त्याचा उगाच बाऊ करणं पण चुकीचंच आहे. आम्ही नाही का मुंबईत राहत? कसे राहत असू? त्यामुळं सर्वांनी फक्त सरकारी सुचनांच पालन करावं. तसेच २० टक्के नागरिक मास्क वापरत नाहीत, हे चुकीचं आहे. सर्वांनी मास्क वापरणे अनिवार्यच आहे. तर हाताला सारखे सॅनिटायझर लावणे हे देखील आरोग्याच्या दृष्टिने चांगले नाही. त्यामुळे साध्या साबणाने हात स्वच्छ करत रहावेत आणि जिथे पर्यायच नसेल अशा वेळेसच केवळ सॅनिटायझर वापरावे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here