केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस उपनिरिक्षक अनिल लवटेंचा आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने गौरव

0
1602

नक्षल्यांच्या धमकीला न घाबरता बजावली होती कर्तव्यनिष्ठ पोलीस सेवा

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  संकटांना न डगमगता सामोरं जायचं असतं आणि त्यांच्यावर मात करत मार्ग काढायचा असतो, याचा प्रत्यय पोलीस उपनिरिक्षक अनिल लवटे यांच्या कामगिरीकडे पाहिला की येतो. नक्षलविरोधात पोलीस म्हणून कर्तव्य बजावत असताना लवटे यांना जीवानिशी मारण्याच्या नक्षल्यांकडून धमक्या मिळूनही, त्याला न घाबरता मोठ्या धीराने लवटे यांनी नक्षलग्रस्त भागात पोलीस कर्तव्य बजावले, विविध सामाजिक उपक्रम राबवले, लोकांना मानसिक आधार दिला. त्यांच्या या कामाचं कौतुक म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदक’ बहाल करण्यात आलं आहे.

          अनिल लवटे हे सध्या मुळशी तालुक्यात पौड पोलीस स्टेशनमध्ये उपनिरिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सन २०१५ मध्ये नाशिक येथे त्यांचे ट्रेनिंग झाल्यानंतर पहिले पोस्टिंग गडचिरोली जिल्ह्यात मिळाले. त्याठिकाणी त्यांना एक महिन्याचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करावं लागलं. प्रशिक्षणानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या दामरांचा पोलीस स्टेशन तालुका अहेरी येथे पाहिले पोस्टिंग झाले. या पोलीस स्टेशनला पदभार घेण्यासाठी दारूगोळा संरक्षक वाहनाने जात असतानाच नक्षल्यांनी त्यांच्या वाहनावर गोळीबार केला. त्यावेळी लवटे यांच्यासह त्यांचे सहकारीही घाबरले होते. ते ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणचे लोकं साधं पोलीस नाव घेतले तरी घाबरत असे. तेथील लोकांच्या मनातील पोलीसांची भीती कमी करण्यासाठी कम्युनिटी पोलीसींग व नक्षलविरोधी ऑपरेशन चालवले.

१) कम्युनिटी पोलिसिंग – यामध्ये सन २०१५ साली एक नवीन प्रयोग चालू केला. तो म्हणजे “यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांना सोबत” या उपक्रमांतर्गत विविध संस्थांना मदतीचे आवाहन केले गेले. त्यांनी केलेल्या मदतीतून पहिल्या वर्षी (२०१६)  दिवाळीला १५०० आदिवासी बांधवांना कपडे वाटप केले. त्याला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला. त्यानंतर २०१७ साली पोलीसांनी स्वतः दामरांच्या पोलीस स्टेशनला इन्चार्ज असताना आदिवासी बांधवांचा “सामुदायिक विवाह सोहळा” आयोजित केला. सदर सोहळ्यामध्ये २०१ आदिवासी जोडप्यांची लग्न लावून त्यांना मॅरेज सर्टिफिकेट देण्यात आले. त्यासह प्रत्येक जोडप्याला संसारोपयोगी साहित्यही देण्यात आले. या प्रकारे कम्युनिटी पोलीसिंगच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या मनात पोलीसांप्रती असणारी भीती दूर केली.

२) नक्षल विरोधी ऑपरेशन – सन २०१६ मध्ये छत्तीसगडमध्ये नक्षल विरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी अचानक पोलीसांवर हल्ला केला. त्या हल्ल्यात दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. त्यामुळे त्यावेळी लवटे यांच्या कामाची दखल घेऊन मला महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी ‘पोलीस महासंचालक पदक’ देऊन गौरव केला

            सन २०१७ मध्ये दामरांचा पोलीस स्टेशन इन्चार्ज असतानाही नक्षल विरोधी अभियान राबवित असताना वेगवेगळ्या तीन ठिकाणी नक्षल्यांसोबत चकमकी झाल्या. सदर चकमकी मध्येही नक्षल विरोधी हेवी फायरिंग केली होती.

            लवटे यांचे नक्षलविरोधी काम पाहून नक्षलवाद्यांनी ‘पोलीस उपनिरिक्षक लवटे को जान से मार देणे का जनताना सरकार आदेश देती हैं’ अश्या आशयाची वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत लवटे यांच्या नावाची पत्रके टाकली होती. परंतु नक्षलच्या धमकीला न घाबरता वरिष्ठ तेथून बाहेर येण्यास सांगत असतानाही लवटे यांनी दुसरी पोस्टिंग होईपर्यंत (२०१८) त्याच ठिकाणी सेवा बजावली.

            लवटे यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने २०१८ मध्ये विशेष सेवा पदक देऊन गौरव केला होता. आणि आता २०२० मध्ये केंद्र शासनाने ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदक’ देऊन गौरव केला आहे. आत्तापर्यंत अनिल लवटे यांना पोलीस महासंचालक पदक, विशेष सेवा पदक व आंतरिक सुरक्षा सेवा पदक अशी तीन पदके मिळाली आहेत.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here