शिवरायांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक घोषित, पालखीचे प्रस्थान ९ जूनला

0
546

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा टाळून शिवरायांच्या पादुकांचा होणार डोक्यावरून प्रवास

            “अवघे ५ शिवभक्त रायगड ते पंढरपूर असा पायी प्रवास करून सामाजिक अंतर राखत हा पालखी सोहळा पार पाडणार आहेत. पालखी ऐवजी श्री छत्रपतींच्या पादुका डोक्यावर घेऊन अनोखा पालखी सोहळा पार पडेल. मार्गावरील भक्ति-शक्ति रिंगण सोहळे यावर्षी होणार नाहीत. सकाळच्या प्रस्थानाची पूजा व शिववंदना, सायंकाळच्या विसाव्याची आरती व हरिपाठ हे होतील. पादुकांचे दर्शन त्या त्या गावातील शिवभक्तांना सामाजिक प्रचार-प्रसार माध्यमातून घडवले जाणार असल्याने श्रींच्या पादुका दर्शनास गर्दी न करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.”

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  हिंदवी स्वराज्याची तिसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगडाहून पंढरीच्या विठोबाच्या भेटीस दरवर्षी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होत असते. नित्य प्रथेप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, श्री राजाभिषेक शक ३४७, यावर्षी ९ जून २०२० रोजी सकाळी ठीक ८ वाजता रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराज समाधी स्थानाहून होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा टाळून शिवरायांच्या पादुकांचा डोक्यावरून प्रवास होणार आहे.

            जगदीश्वराचे व शिरकाई देवीचे दर्शन घेऊन राजसदर, रायगडाहून प्रस्थान केल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पादुकांचा पहिला विसावा पाचाड मधील जिजाऊ मांसाहेबांच्या समाधी छत्री जवळ असेल. आऊसाहेबांचा आशीर्वाद व निरोप घेऊन सोहळा पहिल्या मुक्कामी पळसगाव खुर्द मधील मारुती मंदिरात येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा मुक्काम श्रीरामपूरमध्ये करून सोहळा तिसऱ्या दिवशीचा मुक्कामास ऐतिहासिक ताम्हिणी घाटातील जुन्या पाऊलवाटेने पुणे जिल्ह्याच्या सिमेवर मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावात येईल.

            तेथून ताम्हिणी, वारक, चाचीवली, ढोकळवाडी, पळसे, गोनवडी मार्गे दिनांक १२ जूनचा मुक्काम मुळशी खुर्द मध्ये होईल. १३ जूनला तेथून निघून माले, दिसली, जामगाव, शेरे, अकोले फाटा, आंदेशे फाटा, कोंढावळे फाटा मार्गे शिवरायांच्या पादुका मुक्कामास मुळशी तालुक्याच्या केंद्रस्थानी मौजे पौड मधील श्री विठ्ठल मंदिरात येईल. पालखीचा मुळशी तालुक्यातील शेवटचा मुक्काम १४ जूनला सुतारवाडी, कासारआंबोली, शिंदेवाडी, घोटावडे फाटा, उरवडे, बोतारवाडी, मुकाईवाडी, भूकुम, माताळवाडी फाटा मार्गे भूगाव मधील श्री पद्मावती मंदिरात पोहोचेल.

            मुळशी तालुका सोडून मजल-दरमजल करत छत्रपतींची पालखी ज्येष्ठ शुद्ध नवमी, १५ जूनला तुकोबारायांच्या पालखी मार्गावर सामील होण्यासाठी पुण्यात दाखल होईल. भागवत धर्माचे संस्थापक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, माऊलींच्या वारीचे जनक जगद्गुरु तुकाराम महाराज व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या भेटीचा उत्सव हडपसरला १६ जूनला पार पडेल. त्यानंतर पालखी सोलापूर महामार्गाने दौंड, बारामती, इंदापूर, अकलूज, तोंडले-बोंडले, भाळवणी मार्गे आषाढ शुद्ध दशमी, दिनांक ३० जूनला पांडुरंगाच्या दर्शन ओढीने पंढरपुरात मुक्कामी पोहचेल. आषाढी वारीचा सोहळा आटोपून गुरुपौर्णिमेसच राष्ट्रसमर्पण अभिवादन असल्याने शिवरायांच्या पालखीचा परतीचा प्रवास वाहनाने होऊन तीन मुक्कामात ४ जुलैला पुन्हा रायगडी दाखल होईल.

            जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या विविध ग्रामप्रमुखांकडून सूचना मागविल्या गेल्या होत्या. त्या सर्व सूचना व शासनाचे आवश्यक प्रतिबंधात्मक निर्देश लक्षात घेऊन पालखी मार्गावरील ५३ शाळांमध्ये होणारी भक्ति-शक्ति जागरण रिंगण सोहळे यावर्षी होणार नाहीत. त्याऐवजी गेल्या ५ वर्षातील विविध रिंगणांचे चित्र विशेषांक संबंधित शाळांना देण्यात येतील. समाज स्वास्थ्यास अत्यावश्यक सामाजिक आरोग्य अंतर कायम राखून जास्तीत जास्त ५ च शिवभक्त रायगड ते पंढरपूर असा पायी प्रवास करतील. शिवरायांच्या पालखी सोहळ्याच्या नित्याच्या प्रथा व परंपरा कायम राखताना पालखी, दिखाव्याचा डामडौल, सोहळ्यातील व्यवस्थेची वाहने आदी सारे टाळले जाणार आहे.

            सकाळच्या प्रस्थानाची पूजा व शिववंदना, सायंकाळच्या विसाव्याची आरती व हरिपाठ सोडून बाकी सारे उपचार यावर्षी होणार नाहीत. रायगड ते पंढरपूर असा पूर्ण प्रवास शिवरायांच्या पादुकांना डोक्यावर घेऊन होणार आहे. पादुकांचे दर्शन त्या त्या गावातील शिवभक्तांना सामाजिक प्रचार-प्रसार माध्यमातून करण्याची सोय केली जाणार असल्याने श्रींच्या पादुका दर्शनास कसलीही गर्दी न करण्याचे आवाहन सोहळा व्यवस्थापन समितीकडून केले गेले आहे. पालखी सोहळ्याचे हे सहावे वर्ष असल्याची माहिती योगेश शिंदे यांनी दिली.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here