पत्रकारांना विमा संरक्षणासह विविध सोयी द्याव्यात – मुळशी तालुका पत्रकार संघाची मागणी

0
613

स्वराज्यनामा  ऑनलाईन  : पत्रकार हा देखील कोरोनाच्या लढाईतील महत्वाचा घटक आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून काम करणार्या पत्रकारांनाही विमा संरक्षणासह सुरक्षेच्या विविध सोयी व साधनं देण्यात यावीत, अशी मागणी मुळशी तालुका पत्रकार संघाने मावळ प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. शिर्के आज मुळशी दौर्यावर आले असता हे निवेदन दिले आहे. मुंबई येथे 50 पेक्षा अधिक तर चेन्नई येथील 25 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.

            कोरोनाची लढाईत विविध कामगिरी पार पाडणारे डॉक्टर्स, नर्स, पोलिस, प्रशासन, वैद्यकीय क्षेत्रातील लोकं, विविध शासकीय कर्मचारी यांच्यासोबतच पत्रकार हा देखिल महत्वाचं योगदान देत आहेत. तथापि शासनाचं दुर्लक्ष, पत्रकारांच्या आरोग्याबाबतीत होत असलेली हेळसांड आणि पत्रकारांना दिलं गेलेलं दुय्यम स्थान यामुळे हे पत्रकार बांधव कोरोनाला बळी पडले असावेत. त्यामुळे माध्यम क्षेत्रात सक्रीय काम करणारे सर्व पत्रकार यांना विमा संरक्षण देणे अतिशय गरजेचे आहे. पत्रकार नेहमी दुसर्यांच्याच समस्या मांडतो, मात्र स्वतःच्या समस्येला तो सहसा जगापुढे मांडत नसतो. त्यामुळे राज्य शासन, केंद्र शासन यांनी या गोष्टिंकडे त्वरित लक्ष देऊन पत्रकारांना विमा संरक्षण देऊन दिलासा द्यावा, असे मुळशी तालुका पत्रकार संघाकडून विनंतीवजा निवेदन प्रांत अधिकारी शिर्के यांना देण्यात आले आहे.

            शिर्के यांना निवेदन देतेवेळी त्यांच्यासोबत मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण हे होते. तर मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, कार्याध्यक्ष प्रविण सातव, सचिव विजय वरखडे, खजिनदार दिपक सोनवणे, सदस्य तेजस जोगावडे यांनी हे निवेदन दिले.

            पत्रकारांना नुसते विमा संरक्षण देऊन उपयोग नाही, तर त्यांना विविध सोयीही प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात. सुरक्षेसाठी सुरक्षित मास्क, सॅनिटायझर, हात धुण्यासाठी प्रशासकीय ठिकाणी सोयी उपलब्ध करून द्याव्यात. जे पत्रकार कोरोनाबाधित परिसरात वावरले असतील त्यांच्या चाचण्या कराव्यात. पत्रकाराला दुय्यम स्थान न देता, त्यालाही कोरोना विरूद्धच्या लढाईत महत्वाचं स्थान देऊन त्याची योग्य काळजी प्रशासनाने घ्यावी. सर्व पत्रकारांनी मागणी लावून धरल्यास प्रशासनही नक्कीच विचार करेल.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here