सिम्बॉयसिसमधील कोरोना रुग्णांना सामाजिक बांधिलकीतून प्रशासनाच्या सहाय्याने दोन वेळच्या जेवणाची सोय

0
1436

अंबडवेट येथील पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या माजी संघटिका स्वाती ढमालेंचा उपक्रम

स्वराज्यनामा  ऑनलाईन  :  कोरोनाचा विळखा जसा वाढत आहे, तसं त्यांना उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सोय करण्यात येत आहे. मुळशीतल्या लवळे येथे सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्येही कोरोना पेशंट वर उपचार केले जात आहेत. या रूग्णांना शिवसेना महिला आघाडीच्या पुणे जिल्हा माजी संघटिका, अंबडवेट गावच्या माजी सरपंच स्वाती ढमाले यांनी दोन वेळच्या जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. सामाजिक बांधिलकीतून व प्रशासनाच्या सहकार्याने हे काम करत असल्याचे ढमाले यांनी सांगितले.

            पुण्यात सध्या कोरोनाच्या रूग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. वाढ होत असलेल्या रूग्णांना आता लवळे गावातील सिम्बॉयसिस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात येत आहे. यासाठी ५०० रूग्णांना दाखल करण्याची सोय करण्यात आलेली असून येथे सध्या १०० रूग्ण दाखल करण्यात आलेले आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या रोगामुळे सर्वत्र कामगार निघून गेल्याने सिंम्बोयसिस येथील रूग्णांच्या जेवणाची अडचण निर्माण झाली होती. तहसिलदार अभय चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शिवसेनेच्या स्वाती ढमाले यांनी येथे दाखल होणाऱ्या रूग्णांना दोन वेळचे जेवण पुरवू असे सांगितले होते.

            सोमवार दि.१३ दुपारपासून या रूग्णांसाठी जेवणाचे पाकिटं तयार करून सिम्बॉयसिस येथे पाठविण्यात आले. या तयार केलेल्या जेवणाचा दर्जा सिम्बॉयसिस येथून येऊन तज्ञांनीही तपासणीही केली. तसेच हे जेवण तयार होत असलेल्या ठिकाणी तहसिलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सरपंच अमोल शिंदे, माजी सरपंच निलेश दगडे, युवा नेते मधुर दाभाडे, संतोष पेरणेकर, पत्रकार दिपक सोनवणे, विजय वरखडे, अंबडवेटचे पोलिस पाटील अशोक नागरे यांनी भेट देऊन पाहणी केली.

            मुळशी तालुक्यातील सिम्बॉयसिस येथे येणाऱ्या कोरोना बाधित रूग्णांना जेवणाची मोफत सोय करण्यात येणार असून यासाठी स्वाती ढमाले यांनी जेवण बनवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्यांना यासाठी धान्य व भाज्या द्यायच्या असतील अशा दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन तहसिलदार अभय चव्हाण यांनी केले आहे.

            सध्या कोरोनामुळे सर्व यंत्रणा ठप्प असून या रूग्णांना ना नातेवाईक ना खानावळीचे जेवण सध्या मिळत नाही. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून मी पुढे येऊन सिम्बॉयसिस येथे दाखल होणाऱ्या सर्व रूग्णांना दोन वेळचे जेवण तयार करून देणार आहे. यासाठी स्वाती ढमाले यांना अंबडवेट येथील बचत गटाच्या अध्यक्षा नीता नागरे, पूनम काळे, पल्लवी नागपुरे, दीपक करंजावणे, दीपक सोनवणे यांचीही मोठी मदत मिळत आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here