कमिन्स इंडियाच्या पुढाकाराने निर्माल्यापासून कंपोस्ट खत बनवून शेतकर्‍यांना मोफत वाटप

0
259

कंपोस्ट खताचे मोफत वितरण करताना पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया फाऊंडेशन, गोविज्ञान संशोधन संस्था, थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच, स्वच सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी.

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  निर्माल्यापासून ५५ टन कंपोस्ट खत तयार करून मुळशी तालुक्यातील १०० शेतकर्‍यांना मोफत वाटण्यात आले आहे. कमिन्स इंडिया फाऊंडेशनने हा उपक्रम राबवला. यासाठी पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया फाऊंडेशन, गोविज्ञान संशोधन संस्था, थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच, स्वच सेवा सहकारी संस्था यांनी गणपती उत्सव काळात ३५० टन निर्माल्य गोळा केले होते. तर गोविज्ञान संशोधन संस्थेने गोमय वापरून या निर्माल्यापासून ५५ टन कंपोस्ट खत तयार केले.

            पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे येथे हा खत वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी कमिन्सचे सौमित्र मेहरोत्रा, सौजन्या वेगुरु, अवंती कदम, संदिप क्षिरसागर, प्रशांत चितळे, आय.एस. इनामदार, डॉ.घाडगे, गोविज्ञान संशोधन संस्थेचे बापु कुलकर्णी, अनिल व्यास, सतिश पारखी, प्रमोद कुलकर्णी, प्रशांत करमरकर, गोआधारीत शेती तज्ञ राजेंद्र सांबरे, थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचाचे अध्यक्ष प्रशांत अवचट तसेच स्वच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

            रासायनिक खतांच्या वापरामुळे पीक उत्पादनात वृध्दी होते हे जरी खरे वाटत असले तरी अशा प्रकारचे अन्न सेवन केल्याने मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे. जमिनी नापीक होऊन प्रदुषित होत आहेत. यावर उपाय म्हणून शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीकडे वळले पाहिजे. तसेच गणेश उत्सव काळातील प्रसाद रुपी निर्माल्याचे रूपांतर काळया सोन्यात करून शेतकऱ्यांना देण्याचा हा उपक्रम कमिन्स इंडिया सर्वांना बरोबर घेऊन दर वर्षी सातत्याने पार पाडत असून कुठलेही काम सी एस आर मार्फत कसे करावे याचे उदाहरण कंपनीने घालून दिले आहे असे मत पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी केले.

            सौमित्र मेहरोत्रा यांनी गोविज्ञान व कमिन्स यांच्याकडुन प्रास्तावित पुण्यातील मंदिरातील दररोज जमा होणाऱ्या निर्माल्य संकलित करुन त्यापासुन कंपोस्ट खत तयार करण्याची संकल्पना महानगरपालिकेकडे मांडली. यासंदर्भात उपायुक्त मोळक यांनी दुजोरा देऊन सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासन दिले.

            पुण्यातील मंदिरातून ५०० किलो निर्माल्य संकलित करुन त्यापासुन बांबुविरहित पर्यावरणपुरक अगरबत्तीचे उत्पादन हिम्मत शाळा, अंबडवेट येथे चालु असुन त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अशी माहिती कमिन्सचे सौमित्र मेहरोत्रा यांनी दिली.

            या कार्यक्रमावेळी प्रशांत चितळे व संदिप क्षिरसागर यांनी चालु असलेल्या उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. गोविज्ञान संशोधन संस्थेचे गोआधारीत शेती तज्ञ राजेंद्र सांबरे यांनी ‘गोआधारीत शेती ‘या विषयावर मार्गदर्शन करुन खत कसे वापरावे याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल व्यास यांनी केले, सुत्रसंचालन प्रशांत करमरकर यांनी केले तर आभार अनिल कुलकर्णी यांनी मानले.

            या संपुर्ण उपक्रमात प्रदिप पाटील, प्रशांत पाटील, गोरख माझिरे, बाळासाहेब ढोरे, लक्ष्मण बनसोडे यांनी कंपोस्ट खत तयार करणे व वितरण करणे यासाठी विशेष परिश्रम घेतले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here