गुरूजनांच्या आशिर्वादा सोबतच रंगणार आठवणींची मैफल

0
455

महात्मा गांधी अध्यापक विद्यालयातील माजी छात्र अध्यापकांचा रविवारी स्नेहमेळावा

बंडू दातीर, पुणे

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  समाजातील पिढ्यांना शिक्षित आणि संस्कारित करण्याचे मोलाचे काम शिक्षक करत असतात. या शिक्षकांना घडविणाऱ्या पुण्यातील अरण्येश्वरच्या महात्मा गांधी अध्यापक विद्यालयातील माजी छात्र अध्यापकांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दि. २३ फेब्रुवारी अरण्येश्वरच्या सातव हॉलमध्ये होणाऱ्या या मेळाव्यात गेल्या सात दशकातले छात्र अध्यापक सहभागी होणार आहेत. हा एक अनमोल असा क्षण ७८ वर्षामध्ये पहिल्यांदाच घडणार आहे. यानिमित्त शिक्षक घडविणाऱ्या गुरूजनांचा आशिर्वाद घेण्याची संधी माजी विद्यार्थ्यांना मिळणार असून कडू-गोड आठवणींचीही मैफल ही रंगणार आहे.

            श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या अरण्येश्वर येथील अध्यापक विद्यालयाची जून १९४२ मध्ये स्थापना झाली. तेव्हापासून आतापर्यंत छात्र अध्यापकांच्या माध्यमातून शिक्षक घडविण्याचे काम हे अध्यापक विद्यालय करते. या विद्यालयात शिकून आज अनेक छात्र अध्यापक जिल्हा परिषद त्याचप्रमाणे नामवंत खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये ज्ञानदान करत भारताची भावी पिढी सक्षमतेने घडविण्याचे काम करत आहेत.

            तसेच यातील अनेकांनी पंचायत समितीपासून ते राष्ट्रपती पदक गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळविण्यापर्यंत धडक मारली आहे. तर अनेक छात्र अध्यापक स्पर्धा परीक्षा देवून वेगवेगळ्या अधिकारी पदावर कार्यरत आहेत. राज्यशासनाच्या जबाबदारीच्या विविध पदावर काम करीत असताना महात्मा गांधीच्या अध्यापकांनी दिलेले संस्कार आजही कुणी विसरले नाही.

            संस्कारशील सर्वांगपूर्ण छात्र अध्यापक घडविणाऱ्या महात्मा गांधी अध्यापक विद्यालयाला तब्बल ७८ वर्षाची गौरवशाली परंपरा आहे. पुण्यासारख्या चोखंदळ विद्येच्या माहेरघरात या विद्यालयाचा गुणवत्तेत आणि अध्यापनेत्तर उपक्रमात आदरयुक्त दरारा आहे. एमजीतील शिक्षक म्हंटल की त्याच्याकडे आदरांने पाहिले जाते. हा सर्व मान आणि संस्कार ज्यांच्यामुळे मिळाला, त्या अध्यापकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी २३ फेब्रुवारी रोजी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात विद्यालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंत शिकलेले सर्व माजी छात्र अध्यापक सहभागी होणार आहे.

            एकाच बेंचवर बसलेले, प्रसंगानुरूप विनोद केलेले, खोड्या काढलेले, आपल्या कलाकौशल्य आणि गुणवत्तेतून इतरांच्या लक्षात राहिलेले सवंगडी अनेक वर्षानंतर भेटणार असल्याने सर्वांनाच या मेळाव्याची उत्सुकता लागली आहे. त्याचप्रमाणे ज्या अध्यापकांनी आपल्याला शिक्षकाची पात्रता मिळवून देण्यासाठी त्यागीवृत्तीने ज्ञानामृताचे धडे दिले, त्या गुरूवर्यांचाही आशिर्वाद घेण्याची नामी संधी या निमित्ताने चालून आली आहे. त्या काळातल्या कडू-गोड आठवणींनाही उजाळा मिळणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात आसू आणि हासू यांचा मिलाफही पहावयास मिळणार आहे.

            सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या स्नेहमेळाव्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी छात्र अध्यापकांचीच संयोजन कमिटी गेली तीन महिन्यापासून मेहनत घेत आहेत. मेळाव्याचे अगदी सूक्ष्म नियोजनही संयोजन कमिटीने केले आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी त्याकाळात काढलेले फोटो ओव्हरहेड प्रोजेक्टरद्वारे मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

            छात्र अध्यापकातीलच गुणवान शिक्षक, अधिकारी यांचा गौरव होणार आहे. आपल्याला शिकविणाऱ्या गुरूवर्यांचे मौलिक संदेश ऐकावयास मिळणार आहे. हा मौलिक क्षण याची देही याची डोळा पाहण्याची पुन्हा संधी मिळेल की नाही हे सांगता येत नाही, त्यामुळे या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here