शौर्य गाजविण्यासाठी भीतीवर मात करा – भूषण गोखले

0
320

भानुप्रताप बर्गे यांना श्री स्वामी समर्थ औंध पुरस्कार प्रदान करताना भूषण गोखले

स्वराज्यनामा ऑनलाईन : नवरसात भीती बरोबर शौर्य हाही गुण आहे मात्र शौर्य गाजविण्यासाठी याच भीतीवर मात करावी लागते, असे मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केलं. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘श्री स्वामी समर्थ औंध पुरस्कार’ निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांना देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मानपत्र सन्मानचिन्ह, तुळशीचे रोप आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
            औंधमधील मंगेश सोसायटीच्या पटांगणात झालेल्या या कार्यक्रमात विश्व फौंडेशनचे राहुल उरणकर, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड.श्रीकांत पाटील उपस्थित होते. गोखले म्हणाले, ‘मनातल्या क्रोधाचा आक्रोश होऊन रक्त सळसळते, तोच क्षण शौर्याचा असतो. मनात भीतीचा जराही अंश उरत नाही, तेव्हाच यश साकार होते. 
            कोणतेही यश मिळवण्यासाठी भीतीवर मात करावी लागते, हाच संदेश स्वामी समर्थ यांनी दिला आहे. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हे वाक्य शौर्य गाजविण्यासाठी प्रवृत्त करणारे आहे. मागच्या वर्षी पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने केलेल्या बालाकोट येथील सर्जिकल स्ट्राईक या घटनेचा संदर्भ देत गोखले पुढं म्हणाले, शूरतेबरोबर शस्त्राचीही आवश्यकता असते. भारतीय सैनिकांचे हेच शौर्य वाढण्यासाठी निर्भया नावाचे क्रूझ मिसाईल विकसित करण्यात येत आहे. शूरतेला शास्त्राची आणि शस्त्रांची जोड असेल तर आत्मविश्वास आणि बळ वाढते.
            बर्गे म्हणाले, भक्तिभाव ही फार महत्वाची गोष्ट आहे. करत असलेल्या प्रत्येक कामात भक्तिभाव जपला गेल्यास ते काम अधिक चांगले होते. आपल्या कामावर आपली श्रद्धा असेल तर त्यातून सुख-समाधानाची निर्मिती होते. हजारो आक्रमणे आपल्या देशावर झाली मात्र तरीही भारत सामर्थ्यशाली राहिला तो भक्तीमुळेच. शास्त्र आणि शस्त्रांची सांगड घालत आपल्याला भारताला समाधानी बनवायचे आहे.
            पाटील म्हणाले, शौर्य ही संकल्पना घेऊन यंदाच्या सांस्कृतिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सात्विकता न सोडता जगणारा सामान्य माणूसही शूरच असतो. स्वतःतील शूरत्व जागृत करण्यासाठी ‘मी कोण’ हा शोध घेणे महत्त्वाचे आहे.
            पुरस्कार सोहळ्याआधी सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राहुल उरणकर यांनी अग्निहोत्राचे महत्व समजावून सांगितले. मानपत्राचे वाचन सुनीता पाटील यांनी केले. निवेदन गंधाली भिडे यांनी केले तर आभार दिलीप वाणी यांनी मानले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here