मुळशिकरांच्या नशिबी खड्डेयुक्त रस्त्यांचा अमरपट्टा, ठेकेदारच खड्डे सम्राट

0
987

–  विजय वरखडे, संपादक

              मुळशी तालुक्यात सध्या अनेक रस्ते तयार करण्याचे काम चालू आहे. तथापि गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता जेवढे रस्ते झाले ते केवळ ठेकेदारांमुळे निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे मुळशीकरांना प्रवास करताना खराब रस्त्यामुळे अनेक यातना सहन कराव्या लागल्या आहेत. मुळशीच्या पर्यटनाला येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागला आहे. आता असे होऊ नये यासाठी सर्वच ठेकेदारांना त्या त्या भागातील नागरीक, पुढारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी अंकुश ठेवणे गरजेचे आहे. मुळशीकरांच्या नशिबातील खड्डेयुक्त रस्त्यांचा अमरपट्टा नाहीसा व्हावा त्यासाठी हो लेखनप्रपंच येथे मांडला आहे.                                           

स्वराज्यनामा ऑनलाईन   :   निसर्ग संपन्न आणि समृद्ध मुळशी तालुक्याला खड्डेयुक्त रस्त्यांचा अमर पट्टा लाभल्याचे मागील १२ ते १५ वर्षात प्रकर्षाने पहायला मिळाले आहे. यासाठी हे रस्ते तयार करणारे ठेकेदार सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्या भ्रष्टाचार युक्त कारभारामुळेच मुळशीकरांना या यातना भोगाव्या लागल्या आहेत.

              मागील एक तप कालावधीत एकच रस्ता २-३ वेळा करूनही केवळ २ ते ६ महिन्यातच त्या रस्त्यांची रया जात असल्याचे मुळशिकरांनी अनुभवले आहे. त्यामुळे खड्ड्यांच्या साम्राज्यातून प्रवास करणे ही काळ्या पाण्याची शिक्षा असल्यागत मुळशीकर नागरिक सहन करत आहेत. एवढे असूनही या ठेकेदारांवर कोणतीही कारवाई न झाल्याने ठेकेदारांची हिम्मत अधिकच वाढली आहे.

             मनमानी कारभार, हवे तेव्हा आणि जमेल तसे काम करणे, उडवा उडवी ची उत्तरं देणे, लोकांना तांत्रिक अडचणी सांगून दिशाभूल करणे, भ्रष्टाचाराला खतपाणी घालत प्रस्तावित कामामध्ये काटछाट करून सदोष पद्धतीने कामं करणे ही मुळशीतील ठेकेदारांची कृती आता सर्रास निर्ढावलेली दिसतेय. विशेष म्हणजे लोक प्रतिनिधी यांना काहीही बोलत नसल्याने शासकीय अधिकाऱ्यांसोबत यांचेही चांगलेच फावले आहे. काही लोकप्रतिनिधी निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबाबत आवाज उठवतात, मात्र ती वेळ मारून नेण्यात हे ठेकेदार यशस्वी होताना दिसले आहेत. लोकप्रतिनिधींनी कठोर आवाज उठवत रस्त्यांच्या दर्जाबाबत पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

का होतात मुळशीतले रस्ते खराब?

             मुळशी तालुका निसर्ग संपन्न तालुका आहे. जोरदार अतिवृष्टी तालुक्यात होत असते. पुणे जिल्ह्याचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाणारे ताम्हिणी आगार तर चेरापुंजीचे विक्रमही मोडीत काढल्यासारखी परिस्थिती यावर्षी पहायला मिळाली आहे. मात्र त्याची नोंद वा जाहिर वाच्यताही झाली नाही.   

             मग ज्यावेळी मुळशी तालुक्यात कोणताही नवीन रस्ता केला जातो, तेव्हा या गोष्टिंकडे साफ दुर्लक्ष केले जाते. पावसाचा कालावधी विचारात घेतला जात नाही. अनेक ठेकेदार हे पावसाच्या अगदी तोंडावरच एप्रिल-मे मध्ये रस्ते तयार करतात. अर्थात त्यांच्या चालढकल कामामुळे प्रस्तावित वेळेपेक्षा अधिकच उशिराने काम पुर्ण होते. त्यामुळे पुरेसं ऊन न लागलेल्या डांबराला पर्जन्यमय वातावरणामुळे मृदूपणा येतो. त्यामुळे केलेला रस्ता महिन्या – दोन महिन्यातच उखडू लागतो. घोटवडे फाटा ते हिंजवडी या रस्त्याच्या बाबतीत असेच दोन-तीनदा झाले होते. त्यामुळे गेले १२ वर्षाहुन अधिक काळ हा रस्ता खड्ड्यांच्या साम्राज्यातच आहे.

             रस्ता करताना ठेकेदार योग्य त्या तांत्रिक आणि अभियांत्रिकी गोष्टिंचा अंतर्भाव करत नाहीत. म्हणजे जेथे रस्त्यावर पाणी येऊ शकते, तेथे मोर्या टाकणे, रस्ता समतल न बनवणे, साईडपट्टया न बनवणे, तसेच शेतकर्यांनी वा ग्रामस्थांनी पाण्याच्या पाईपलाईनसाठी रस्ता मधोमध खणणे, रस्त्याच्या मध्यभागातून दोन्ही बाजुकडे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी उतार बनवताना तो अधिकच बनवणे व त्यामुळे अवजड वाहनांनी लवकरच त्याची वाट लागणे अशी सगळी अवस्था रस्त्यांची पहायला मिळते. त्यामुळे हे ठेकेदार रस्ता बनवताना अभियांत्रिकीचा सुमार दर्जा आणि खर्च बचतीसाठी कामामध्ये काटछाट करून रस्ता बनवत असल्या कारणाने सर्व रस्ते लवकरच खराब होऊ लागून दयनीय अवस्थेमध्ये जातात. यांवर लोकप्रतिनिधीही आवाज उठवत नाहीत आणि शासकीय अधिकारीही त्यांना पाठीशी घालतात.

             भरे फाटा-दारवली-पौड रस्ता याचीही बिकट दशा पहायला मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १०-१२ वर्षापुर्वी झालेला हा रस्ता काहीच दिवसात खराब झाला. त्यानंतर भरे फाटा ते दारवली येथील फुटबॉल मैदानापर्यंत झालेला रस्ता मात्र तालुक्यातला सर्वात जास्त दर्जेदार रस्ता झाला. मात्र त्याच्या पुढे केवळ मलमपट्टी युक्त रस्ता एकाचवेळी झालेला दारवलीकरांनी अनुभवलंय. त्यामुळे मैदानापर्यंतचा प्रवास गेले ६-७ वर्ष सुखकर आहे, मात्र तिथुन पुढे दारवली गाव ते पौड रस्ता अनेक वर्ष बिकट अवस्थेत पहायला मिळाला. सध्या या रस्त्याचे काम चालू असून ते दर्जेदार करणे गरजेचे आहे, अन्यथा मागचेच दिवस पुढे येणार असल्याचे चित्र दिसत आहे.   

             चांदे-नांदे फाटा ते सुस रोड हा रस्ता पण अनेकदा केला गेला आहे. पुर्वी तो सारखाच खराब व्हायचा. कारण त्या परिसरात माती वाहणार्या ट्रकांची जास्त ये जा असायची. तसेच रस्ता करताना निकृष्ट काम केले जायचे. यांवर तत्कालीन सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जाधव यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी हसू येईल असे उत्तर दिले होते. ते म्हणाले की, नदीलगत हा असल्याने येथील मृदा भुसभुशीत आहे, त्यामुळे येथे रस्ता टीकत नाही. त्यांच्या या अकलेचे तारे तोडणे म्हणजे मुळशीकरांची शुद्ध फसवणूक होती. त्यानंतर काही वर्षांनी येथे दर्जेदार रस्ता झाला व इतक्या वर्षांनीही आज तो सुस्थितीत आहे. त्याचप्रमाणे मुळशीतील रस्ते जे आता चालू आहेत ते होणे अपेक्षित आहेत.

ठेकेदारांवर हवा कारवाईचा बडगा, नाहीतर रस्त्यावर पुन्हा येईल खड्डा

             जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, राज्य शासन, केंद्र शासन यांच्या माध्यमातून जी कामं चालतात त्या सर्व ठेकेदारांना कायद्याचा धाक असणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उभारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कमिशनसाठी लोकप्रतिनिधींनी कधीही प्रयत्न करू नयेत. शासकीय अधिकारीही या ठेकेदारांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात ते कशासाठी हे जनतेला सांगायला नको.

             एखादे काम सुरू करण्यापुर्वी त्या कामाचे स्वरूप, खर्च, कालावधी असा सगळा तपशीलवार मजकूर असलेला फलक लावणे गरजेचे असते. मात्र असे क्वचितच झालेले दिसते. त्यामुळे या ठेकेदारांचे चांगलेच फावते. काम कोणतेही असो, त्यासाठी हे फलक लागतील याची खात्री लोकप्रतिनिधींनी घ्यावी. त्यामुळे ते काम वेळेत करण्याचे बंधन संबंधित ठेकेदारावर येते. तसेच ते कामही मग वेळेत झाल्याने त्याचे पावसामुळे नुकसान होण्याचे टळू शकते.

             कामामध्ये काटछाट करून निकृष्ट माल वापरून रस्ता करणार्यांचे पितळही उघडे पाडले पाहिजे. क्वचित वेळा असे घडले आहे. मात्र असे घडेल याची धास्ती ठेकेदाराला पडल्याशिवाय तो उत्कृष्ट माल वापरण्याची तसदी घेणारच नाही. तीच बाब संबंधित ठेकेदाराच्या अभियांत्रिकी ज्ञानाची. तो खरंच हुशार अभियांत्रिक असेल तर रस्ता नक्कीच दर्जेदार होईल. यासाठी अनुभवी व चांगले रस्ते करणार्यांनाच प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यामुळे ठेकेदार हा सर्व बाजूंनी केवळ दर्जेदार कामांचाच विचार करणारा असावा, ज्यामुळेच मुळशीतील रस्त्यांना अच्छे दिन येतील व खड्डेयुक्त रस्त्यांचा अमरपट्टा गायब होऊन जाईल.

आमचं फेसबुक पेज लाईक करा.          http://fb.com/swarajyanama

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here