भुगाव ते पिरंगुट वाहतुक समस्या बिकट, उपाययोजनांची अत्यावश्यकता

0
1412

स्वराज्यनामा ऑनलाईन : मुळशी तालुक्यातील भुगाव-भुकूम-पिरंगुट गावच्या हद्दीत रोजच वाहतुकीचा मोठा खोळंबा होत आहे. त्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले असून आता यावर पुणे जिल्हा पोलिस प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून उपाययोजना अंमलात आणण्याची मागणी होत आहे. युद्धपातळीवर या उपाययोजना अंमलात आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

             पुणे-कोलाड महामार्गावरील रस्त्याचे नुतणीकरणाचे काम सध्या चालू आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मात्र रस्ता नुतणीकरण हे केवळ वाहतुक खोळंब्याचे कारण नाही. तर भुगाव सारख्या पुणे शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गावामध्ये रस्त्यांचा अरुंदपणा, मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालयं असल्याने गाजावाजात होणारी अनेक लग्नं, वाहनचालकांचा उद्दामपमा, मोठी रहदारी, खड्डे आणि जीव टाकणारी वाहनं मध्येच बंद पडत असल्याने हा सर्व प्रकार राजरोसपणे चालत असल्याचे दिसत आहे. या सर्व कारणांवर लवकरात लवकर प्रभावी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.

भुगाव-भुकूम-पिरंगुटला वाहतुक खोळंब्याचे काय आहे कारण?

             पिरंगुट एमआयडीसी, लवासा-उरावडेकडे वाढत जाणारी वस्ती, कासारआंबोली-पौड मध्ये विस्तारत जाणारं नागरीकीकरण, घोटवडे-रिहे खोरं-हिंजवडी-माण या भागात वाढत जाणारी प्रगती हा असा एकंदरीत शहराकडे वाटचाल करत असलेला हा प्रदेश शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळं समस्यांच्या विळख्यात असलेला दिसत आहे. त्यामुळे भुगाव-भुकूम-पिरंगुट परिसरात वाहतुकीचा चक्का जाम गेल्या दहा वर्षांपासूनही अधिक काळापासून दिसत आहे. येथे कोणत्याही उपाययोजना शासनाकडून राबवल्या गेल्या नाहीत. प्रवाशांची प्रचंड वर्दळ, सार्वजनिक दळणवळण सक्षम नसणे, बेशिस्त खाजगी प्रवासी वाहतुक करणारे, रस्त्यांवर विक्री करणारे व्यावसायिक, लग्न समारंभ, फिटनेस नसलेली वाहनं किंवा नादुरूस्त वाहनं रस्त्यावर चालवणे, ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यानं रस्त्यांवर पडलेले खड्डे या सर्व कारणांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

वाहतुक खोळंब्यावर काय उपाययोजना करता येऊ शकतात? स्वराज्यनामाचा कानमंत्र!

  1. अतिक्रमणं काढून रस्ता रूंद करणे (सध्या फक्त घाटात रस्तारूंदीकरण चालू आहे, त्यामुळे इतर ठिकाणीही युद्धपातळीवर होणे गरजेचे आहे.)
  2. साईड गटारं काढून सांडपाण्याचा निचरा करणे ज्यामुळे रस्त्यांवर पाणी येऊन रस्ते खराब होणार नाहीत व त्यावर खड्डेही पडणार नाहीत,
  3. प्रवासी वाहनांची संख्या वाढवणे व सार्वजनिक दळणवळणासाठी सक्षम वाहनं उपलब्ध करून देणे.
  4. बस व एस.टी. साठी स्वतंत्र थांबे अशा ठिकाणी उभारणे की ज्यामुळे वाहतुक खोळंबणार नाही.
  5. खाजगी वडाप वाहतुकीला शिस्त लावून चाप लावणे, त्यांना प्रवासी घेण्यासाठी मुख्य रस्त्याऐवजी बस व एसटी थांब्यांच्या मागे वा पुढे उभे राहण्यास सांगणे.
  6. योग्य त्या ठिकाणी छोटे ओव्हरब्रीज उभारणे, ज्यामुळे मुख्य रस्त्यावरून गावात गाडी वळताना मागच्या गाड्या जागेवर थांबण्याऐवजी त्या ओव्हरब्रीजवरून निघून जातील, वाहतुक खोळंबणार नाही.
  7. रस्त्याच्या दुतर्फा खाजगी वाहनांना उभे राहण्यास मज्जाव करणे.
  8. खाजगी व्यावसायिक, बॅंका, हॉटेल्स, दुकानं यांच्याकडे येणार्या गाड्या रस्त्यावर उभ्या न करण्याची सक्त ताकीद देऊन त्यावर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.
  9. पोलिसांना वाहतुक सुरळीत करण्यासाठी एक स्वतंत्र पेट्रोलिंग चारचाकी गाडी असावी, ज्यामधून ध्वनिक्षेपकावर लोकांना सुचना देऊन वाहतुकीस अडथळा दुर करता येईल. एक चारचाकी किंवा दोन दुचाकी असल्या तरी चालतील.

वाहतुक खोळंब्यामुळे काय काय प्रश्न निर्माण होतायत?

             सर्वात महत्वाची समस्या म्हणजे रूग्णवाहिका या वाहतुक खोळंब्यात अडकून रूग्णाच्या जीवाला मोठा धोका होत आहे. भुगाव सारख्या ठिकाणी वारंवार होणारा वाहतुक खोळंबा नेहमीच रुग्णवाहिकेला त्रासदायक ठरत आहे. दुसरी समस्या शाळकरी विद्यार्थ्यांना होणारा त्रास. भुगाव येथे काही दिवसापुर्वी लग्न समारंभामुळे झालेल्या वाहतुक खोळंब्याने शाळकरी मुलांचे प्रचंड हाल झाले. साडेपाच ते सहा वाजेपर्यंत शाळेतून सुटलेली ही चिमुकली शाळकरी मुलं वाहतुक खोळंब्यातून अडकून रात्री साडेनऊला घरी पोहोचली. एवढ्या वेळात त्या चिमूकल्या जीवांनी काय त्रास सहन केला असेल त्यांच्या पालकांनाच माहिती. तीच परिस्थिती ज्येष्ठ नागरीकांचीही झाली होती. शरीर प्रकृती साथ देत नाही, त्या वयात त्यांना वाहतुकीत अडकून पडावे लागले आणि त्रास सहन करावा लागला.

             चाकरमान्या गृहीणी देखिल घरी वेळेत न पोहोचल्याने त्यांच्या घरचे सगळे वेळापत्रक कोलमडले. त्यांच्या कुटुंबियांनाही मनस्ताप सोसावा लागला. वाहतुक खोळंब्याने भुगाव सारख्या ठिकाणी काही तासांत प्रदुषण मात्र मोठे वाढले. त्यामुळे येथील नागरीकांना प्रदुषणाचा सामना करावा लागून आरोग्यावर परिणाम होईल असा प्रभाव नक्कीच जाणवला. त्यामुळे वाहतुक समस्या सोडवण्यासाठी आता लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरीक यांनी एकत्र येऊन उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेल पंप ते गारवा हॉटेलपर्यंतची चारी त्वरित बुजवा – पत्रकार विनोद माझिरे

             भुकूम, ता.मुळशी येथील शेल पेट्रोल पंप ते भुगाव तलावाजवळच्या हॉटेल गारवा येथे 15 फुट चारी खणलेली आहे. ती चारी खणल्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. सध्या या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम चालू आहे. मात्र सदर नूतनीकरण करत असताना ही चारी नीट बुजवली गेली नाही, ती अर्धवट बुजवली गेली असल्याने रस्ता अरूंद झाल्याने वाहतुक खोळंब्यात भर पडत आहे. ती चारी त्वरित बुजवावी असे मत मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे यांनी मांडले आहे.

खासदार सुप्रिया सुळे व आमदार संग्राम थोपटे लक्ष घालणार का?

             भुगाव, ता.मुळशी येथील खड्ड्यांचा सेल्फी काढून खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील खड्डेयुक्त रस्त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यावर बरंच राजकीय आकांडतांडव झालं. आता राज्यातलं सरकार बदललं, सत्तेत राष्ट्रवादी पक्षही सामिल आहे. त्यामुळे खासदारांनी आता खड्ड्यांच्या समस्येबरोबर वाहतुक खोळंबा या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तो सोडवण्यास दोन पावले पुढे यावे ही जनतेची अपेक्षा आहे.

             आमदार संग्राम थोपटे यांनीही मुळशीतल्या रस्त्यांसंदर्भात वेळोवेळी शासकीय अधिकार्यांसोबत बैठका घेतल्या आहेत, त्यांच्यासोबत चर्चाही केल्या आहेत. पुणे-कोलाड महामार्गावरील समस्या मुळशी तालुक्यात प्रचंड प्रमाणात आणि गेल्या दहा वर्षांहुनही अधिक काळ जाणवत आहेत. कॉंग्रेस पक्षही सध्या राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. योगायोगाने विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या चालू असून आमदार थोपटे यांनी भुगाव वाहतुकीचा प्रश्न अधिवेशनात मांडून तो सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी नागरीकांची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here