पवार साहेबही उतरणार भोरच्या रणसंग्रामात, थोपटेंसाठी घेणार जाहिर सभा

0
2909

स्वराज्यनामा ऑनलाईन :  राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे भोर विधानसभेचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी आज सकाळी माजी कृषिमंत्री शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी पुणे येथे भेट घेतली. पवार साहेबांचे आशिर्वाद घेऊन संग्राम थोपटे यांनी त्यांच्याशी अर्धा तास प्रदीर्घ चर्चाही केली. पवार साहेबांनी भोरच्या रणसंग्रामात थोपटे यांना निवडून आणण्यासाठी सर्व ताकद पणाला लावणार असल्याचेही सांगितले.

              राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी झाली आहे. पूर्ण पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असून भोर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचेही प्राबल्य आहे. विधानसभेला मात्र भोर विधानसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला झालेला आहे. भोर विधानसभेची सन २००९ च्या निवडणुकीवेळी पुनर्रचना झाल्यानंतर काँग्रेसकडून संग्राम अनंतराव थोपटे हे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झालेली नसतानाही थोपटे यांनी भोरचा गड निर्विवाद राखला. यावेळेस आघाडी झाल्याने थोपटे यांना मताधिक्य किती मिळणार यावरच सगळीकडे चर्चा चालू असतात.

              दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील भोरच्या रणसंग्रामात उतरणार असून दिनांक १९ ऑक्टोंबर रोजी साहेबांची जाहीर सभा भोर तालुक्यातील हरिश्चंद्री, कापूरहोळ येथे जाहीर सभा होणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीने भोर मध्ये धुराळा उडणार असल्याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या एकत्री करणामुळे दिसत आहे. त्यामुळे थोपटे यांचे पारडे निश्चितच जड असून विकासाच्या जोरावर आणि आघाडीच्या बळावर मोठ्या मताधिक्क्याने बाजी मारतील अशी चिन्हं आहेत.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here