मुलींना शिकवण्याच्या प्रतिज्ञेसह पालकांनीही केला महाभोंडला साजरा

0
591

भादस (ता.मुळशी) येथील जिल्हा परिषद शाळेत मुलींना शिकवण्याच्या प्रतिज्ञेसह पालकांनी महाभोंडला साजरा केला.

स्वराज्यनामा ऑनलाईन :  मुलींना शिकवून कर्तृत्ववान करावं, त्यांचं शिक्षण खंडित करू नये असा संदेश देत भादस, ता.मुळशी येथील जिल्हा परिषद शाळेत महाभोंडला साजरा करण्यात आला. भोंडल्याची गाणी, दांडिया, गरबा यांनी सम्पूर्ण मैदान सकारात्मक ऊर्जेने आणि आनंदने भरून गेले होते.

           ग्रामीण भागात काही मुलींचे शिक्षण पूर्ण होत नाहीत, कारण म्हणजे पालकांची मानसिकता आड येते. म्हणून नवरात्र निमित्त आयोजित महाभोंडला कार्यक्रमात पालक मातांनाही सहभागी करून घेतले. त्यांना 9 कर्तुत्ववान महिलांची माहिती सचित्र सांगितली. यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वराज्यजननी जिजाऊ माता, भारतरत्न मा.लता मंगेशकर, अंतराळवीर कल्पना चावला,  धावपटू पी.टी.उषा, बॅडमिंटनपटू  पी.व्ही.सिंधू, पहिली महिला डॉक्टर आनंदी गोपाळ, पहिली महिला आयपीएस किरण बेदी, अभिनेत्री माधुरी दीक्षित या नामांकित कर्तृत्ववान महिलांबद्दल माहिती देण्यात आली.

           जर मुलगी शिकली तर ती स्वतःचे अस्तित्व तर सिद्ध करतेच पण ती आई वडिलांचे नाव मोठे करते, देशाचे नाव मोठे करू शकते, हे माता पालकांना पटवून दिले. त्यानंतर सर्व माता पालकांनी प्रतिज्ञेसह निर्धार केला की, आम्ही आमच्या मुलींचे शिक्षण थांबू देणार नाही. यावेळी गावातील उज्वला गणपत जोरी व आरती माणिक जोरी यानी त्यांचे शिक्षण पूर्ण केले म्हणून या दोघींचा सन्मान करण्यात आला.  त्यांच्यामुळे इतर मुलींना प्रोत्साहन मिळेल.

           गावडेवाडी शाळेच्या अम्बिका उंबरजे मँडम, शिळेश्वर शाळेच्या अंजली लोहार मँडम, भादस शाळेच्या प्रिया दसगुडे व दोन्ही शाळेचे सर्व विद्यार्थी या भोंडल्यात सहभागी झाले होते. मुलींनी आनंदाने हसतखेळत महाभोंडला साजरा केला. पालकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्व पटवून दिल्याने एक आगळे वेगळे सिमोल्लंघन झाल्याचे शिक्षिका दसगुडे यांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here