भाजप सरकारकडून गोबेल्स नीतीचा वापर- माजी खासदार नवलेंचा घणाघात

0
1524
पौड, ता.मुळशी येथील कॉंग्रेस भवन येथे प्रचारार्थ बोलताना आघाडीचे उमेदवारसंग्राम थोपटे

पौड, ता.मुळशी येथील कॉंग्रेस भवन येथे प्रचारार्थ बोलताना भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे

आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस व राष्ट्रवादीची संयुक्त बैठक पौड, ता.मुळशी येथे संपन्न

स्वराज्यनामा ऑनलाईन : खर्याला खोटं आणि खोट्याला खरं दाखवायची जुनी गोबेल्स नीती आहे. ती आजच्या भाजप-शिवसेनेच्या सरकारने चालवली असल्याची टीका माजी खासदार विदूरा उर्फ नाना नवले यांनी कॉंग्रेस भवन, पौड, ता.मुळशी येथे केली. आघाडीचे भोर विधानसभेचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळेस ते बोलत होते.

             यावेळी व्यासपीठावर माजी खासदार अशोक मोहोळ, विद्यमान आमदार व आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता दगडे, युवा नेते राजाभाऊ हगवणे, ज्येष्ठ नेते रामचंद्र ठोंबरे, राष्ट्रवादी अध्यक्ष महादेव कोंढरे, गंगाराम मातेरे, शिवाजी जांभुळकर, शिवाजी बुचडे, अंकुश मोरे, संतोष साखरे, दादाराम मांडेकर, लक्ष्मीताई सातपुते, राहुल जाधव, सुहास भोते, अंकुश वाशिवले, किसन नागरे, मधूर दाभाडे, उज्ज्वला पिंगळे, जितेंद्र इंगवले, योगेश ठोंबरे, निलेश पाडाळे, दिग्विजय हुलावळे, सागर धुमाळ, प्रविण धनवे आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

             नवले पुढे म्हणाले की, आताचं सरकार नुसत्या घोषणाबाजी करतं पण लोकाभिमुख कामं करत नाहीत. अच्छे दिन कुठे आहेत?  ते आलेच नाहीत. खेड्यापाड्यातली गोरगरिबांची मुलंदेखील आमदार, खासदार झाली ती काँग्रेसच्या काळात. सोयरीक करताना जसं बारीक पाहिलं जातं, तसं मतदान करताना बारीक पाहून विकास खरे करणाऱ्यांना मतदान केलं पाहिजे.

             माजी खासदार अशोकआण्णा मोहोळ म्हणाले की, जी आज पिरंगुट इंडस्ट्री दिसते ती मामासाहेब मोहोळ यांच्या प्रयत्नातून मोहन धारीया यांच्या मंत्रीपदाच्या काळात झाली. बालेवाडी क्रीडा संकुल, हिंजवडी आयटी पार्क हे शरद पवार साहेबांमुळे झालेय. आज तिथली नोकरी करणारी मुलं-मुलींना हे माहित नसतं, त्यामुळे ती आपल्याला विसरली आहेत, त्यांना हे समजावून सांगितली पाहिजे. शेतकऱ्यांना आजही चांगले दिवस (अच्छे दिन) आलेले नाहीत. शेती, उद्योगधंदे, नोकरदार, दुकानदार सगळे व्यथित आहेत.

             आमदार व आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे म्हणाले की, आजची मानसिकता लक्षात घेतली असता सरकारवर लोकं खुश नाहीत, लोकं पिचलेली आहेत. मुळशीचा माणूस, आपला माणूस असा विरोधक इथे प्रचार करत आहेत, कारण त्यांना दुसरे मुद्देच शिल्लक नाहीत. परंतु भोर किंवा वेल्ह्यापेक्षा काकणभर जास्त कामं मुळशीत केलेली आहे, कोणताही दुजाभाव केलेला नाही. उलट जे लोकं हे मुद्दे रेटत आहेत, ते काय इतर पक्षांमध्ये काही समाजसेवा करायला गेलेले नाहीएत. धरणभागात दौरा पूर्ण केला असून त्यास  भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.

             माजी सभापती, राष्ट्रवादी अध्यक्ष महादेव कोंढरे म्हणाले की, मुळशी तालुक्यात एकुण १९५ बूथ आहेत. लोकसभेला आपण कुठे कमी पडलो, जिथे अधिक मतदान जिथं झालं तिथे कोण काम करत होते हे पाहणे गरजेचे आहे. सुप्रियाताई याना ४१ हजार, विरोधी उमेदवाराला ३९ हजार व वंचित ला ८ हजर मतदान होते. पूर्व पट्ट्यात शहरीकरण जास्त आहे, त्यामुळे मताधिक्य कमी होते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तिथे पोहोचलो तर तिथेही आघाडी मिळेल. राष्ट्रवादी पक्ष एकदिलाने काम करेल. चुकीचे मेसेज सोशल मीडियावर पसरले जातील, तर त्याबद्दल अफवा पसरवू नका.

             पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रजचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रामचंद्र ठोंबरे म्हणाले की, ज्या उमेदवाराला आपण पाहिलं पण नाही त्याला ३९ हजार मत देणं ही आपली मोठी चूक आहे. पूर्वी गावे ही विचारधारेवर चालायची, गावचा नेता सांगेल तिकडेच मतदान व्हायचे. प्रत्येकाने आपलेच गाव व्यवस्थितरित्या जबाबदारीने पाहण्याची गरज आहे. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदच्या तयारीने इच्छूकाने आताच गावं फिरण्याची गरज नाही.

              यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सविता दगडे, भोर विधानसभा राष्ट्रवादी अध्यक्ष सुनिल चांदेरे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक गंगाराम मातेरे यांनी तर आभार प्रदर्शन मधूर दाभाडे यांनी केले.

काँग्रेसने केलं देशासाठी : अशोक मोहोळ

              कॉंग्रसने देशासाठी काय केलं हे सांगताना माजी खासदार अशोक आण्णा मोहोळ म्हणाले की, नेहरूंनी गोवा भारतात घेतला, लाल बहादूर शास्त्री यांच्या काळात कराची अवगत केलं. पण आंतरराष्ट्रीय दबावाखाली माघार घ्यावी लागली. इंदिरा गांधींनी बांग्लादेश वेगळं केलं. देशात संगणक आणायचं काम राजीव गांधींनी केलं. राजीव गांधींनंतर नरसिह राव यांनी आंतरराष्ट्रीय धोरण स्विकारलं.

              जगभरात मंदी असताना तिची झळ बसू न देण्याचं कौशल्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जगाला दाखवून दिलं. त्यामुळे नुसत्या भाषणबाजीला न भुलता कोणी कामे केली यावर मतदान करावं.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here