भोर विधानसभेसाठी 13 उमेदवारांचे 22 अर्ज दाखल

0
1752

स्वराज्यनामा ऑनलाईन : भोर विधानसभेसाठी 13 उमेदवारांनी 22 अर्ज दाखले केले आहेत. 2 दिवस छाननी नंतर शनिवार दि. 7 ऑक्टोंबर रोजी कोण कोण माघार घेणार याच्या आता भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यात चर्चा रंगल्या आहेत.

           काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनी व त्यांच्या पत्नी स्वरूपा संग्राम थोपटे यांनी प्रत्येकी एक अर्ज असून संग्राम थोपटे यांचे दोन अपक्ष असे एकुण तीन अर्ज आहेत. भारतीय जनता पक्षाकडून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक किरण दत्तात्रय दगडे यांनी एक व अपक्ष एक असे एकुण दोन अर्ज भरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनिल प्रकाश मातेरे यांचा एक व अपक्ष एक असे दोन अर्ज आहेत.

           दत्तात्रय राघुजी टेमघरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संभाजी बिग्रेडही यंदा रिंगणात उतरली असून पंढरीनाथ संपत सोंडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कुलदीप सुदाम कोंडे यांनी शिवसेनेचा अधिकृत एक व अपक्ष एक असे एकुण दोन अर्ज भरले आहेत. तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आत्माराम(नाना) जयवंत कलाटे यांनी शिवसेनेचा एक व अपक्ष एक असे दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत.

           बहुजन समाज पार्टीचे सिद्धराम जयवंत वाघमारे, वंचित बहुजन विकास आघाडीकडून भाऊ पांडुरंग मगरळे, डॉ.यशराज हिरामण पारखी (अपक्ष), सुनिल दिनकर गायकवाड (अपक्ष), मानसी सुरेश शिंदे (अपक्ष 4 उमेदवारी अर्ज) दाखल केले आहेत.

           कॉंग्रेसकडून संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करून थोपटे यांना पाठिंबा दर्शवला. अर्ज भरल्यानंतर सभाही घेण्यात आली होती.

           नगरसेवक किरण दगडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज सादर केला. तर कुलदीप कोंडे यांनीही मोठ्या जोशात, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. तर अनिल मातरे यांनीही तरूण कार्यकर्ते व पदाधिकारी घेऊन अर्ज सादर केला.

           मतदारसंघातील ज्येष्ठ नागरीक यांच्या आशिर्वादावर आणि मुळशी तालुक्याच्या अस्मितेसाठी लढणार असल्याचे माजी पोलिस अधिकारी असलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्तात्रय टेमघरे यांनी सांगितले. तर आता कोणत्याही परिस्थितीत लढायचंच हा निर्धार घेऊन आत्मारामनाना कलाटे यांनी रणशिंग फुंकले आहे.

           शिवसेना भाजपची युती झाल्याने तसेच मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने भाजपचे नगरसेवक काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मनसेच्या अनिल मातेरे या युवकाला युवकांची साथ लाभणार असून त्यांच्या जोरावरच भोर विधानसभा मतदारसंघात उतरलो असल्याचे मातेरे यांनी सांगितले. वंचित बहुजनांचा आवाज विधानसभेत पोहोचावा यासाठी उमेदवारी अर्ज भरल्याचे मरगळे यांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here