प्लॅस्टिक मुक्तीसाठी महाश्रमदानातून विद्यार्थ्यांकडून १३ पोती प्लॅस्टिक गोळा

0
794

पाबे (ता.वेल्हे): महाश्रमदानातून विद्यार्थ्यांनी १३ पोती प्लॅस्टिकचा कचरा गोळा केला.

स्वराज्यनामा ऑनलाईन : पाबे (ता.वेल्हे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत ‘ प्लॅस्टिक मुक्तीसाठी महाश्रमदान’  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावातील १३ पोती प्लॅस्टिक गोळा केले.

     महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये प्रभातफेरी, प्लास्टिक मुक्तीची शपथ, गावातील सर्व  सार्वजनिक ठिकाणे, पाण्याचे स्त्रोत,  ओढे,  नाले यांच्या किनाऱ्यावरील स्वच्छता करण्यात आली.

     त्याचबरोबर स्वच्छतेची सवय अंगी रुजवण्यासाठी ‘स्वच्छतेतील श्रीमंत कोण?’ या नाविण्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये गावाचे पाच प्रभाग पाडून प्रभागनिहाय विद्यार्थी व शिक्षकांचे गट तयार करण्यात आले. दिलेल्या वेळेत सर्वाधिक प्लास्टिक गोळा करणारा गट ‘श्रीमंत’ गट म्हणून घोषित करण्यात आला. या स्पर्धेत शिक्षिका कविता साळुंके यांच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावित ‘स्वच्छतेतील श्रीमंत गट’ ठरला. ग्रामसेवक पी.एस.भालेराव यांच्या गटाने द्वितीय तर सहशिक्षिका मनिषा महाले यांच्या गटाने तृतीय क्रमांक मिळविला.

    अभियानातून गोळा झालेला प्लास्टिकचा कचरा शासनाच्या माध्यमातून पुनर्वापर प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार असल्याचे दापोडे केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप राजगुरू यांनी सांगितले.

    या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी विशाल शिंदे, गटशिक्षणाधिकारी संजय तांबे यांनी मार्गदर्शन केले. अभियान यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुरेश कोळी, मनिषा महाले, कविता साळुंके, नितीन सलगरे, ग्रामसेवक पी.एस. भालेराव, अंगणवाडी सेविका कुसुम मरळ, मीराबाई पवार, रंजनाताई कांबळे, ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here