भोरसाठी शिवसेना ईच्छुकांची मुंबईत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक चालू

0
3655

मातोश्री भवन (कलानगर, मुंबई) येथे आज विधानसभा ईच्छुक उमेदवारांच्या समर्थकांची बाहेर झालेली गर्दी.

स्वराज्यनामा ऑनलाईन :  भोर विधानसभेसाठी शिवसेना पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून ईच्छुकांनी आज मुंबई येथे मो्र्चेबांधणी केली. मातोश्री भवन येथे सर्वांची पक्षश्रेष्ठींसोबत बैठक चालु असून या सर्वांमधून एखादा उमेदवार निश्चित केला जाऊ शकतो.

          भोर विधानसभा मतदारसंघ हा युतीमध्ये शिवसेनेचं प्राबल्य असलेला मतदारसंघ आहे. युती होणार की नाही याबाबत अजुनही साशंकता मनात असल्याने भाजप व शिवसेनेचं भोर विधासभेतलं गणित नक्की काही कळेना. अशातच आज मातोश्री येथे भोर विधानसभेसाठी ईच्छुक उमेदवार हे आपापली बाजू पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजले आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळासाहेब चांदेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, माजी जिल्हाप्रमुख दत्तात्रय टेमघरे, राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आत्मारामनाना कलाटे आणि राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित असल्याचे समजते आहे.

           एकंदरीतच शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. सेना उमेदवारच विद्यमान कॉंग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना शह देऊ शकतो, हे गणित नक्की आहे. मात्र बंडखोरी वा इतर पक्षांचे उमेदवार शिवसेना उमेदवाराची डोकेदुखी वाढवणार हे निश्चितच आहे. कॉंग्रेससाठी हा मतदारसंघ सुरक्षित असून कोणतीही बंडाळी नसल्याने तसेच कॉंग्रेस मतदारांचा पॅटर्न निश्चित असल्याने कॉंग्रेस आणि संग्राम थोपटे हे हॅटट्रिकसाठी सज्ज झाले आहेत.

शिवसेना उमेदवारीस उशिर, हे तर कॉंग्रेसच्या पथ्यावरच

          भोर विधानसभेची जागा युतीमध्ये शिवसेनेला असल्याने शिवसेना उमेदवार येथे लवकर जाहिर होणे गरजेचे होते. मात्र तसे होत नसल्याने हे विद्यमान कॉंग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या पथ्यावरच पडल्याचे दिसत आहे. थोपटे यांचा विधानसभेचा दौराही झालेला आहे. त्यामुळे शिवसेना उमेदवार महाराष्ट्रातील सर्वात जास्त दुर्गम असलेल्या भोर विधानसभेच्या गावागावात प्रत्यक्ष कसा पोहोचणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आणखीन किती उशीर करणार, असा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. भोर विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना पक्षश्रेष्ठींना मोठी कसरत करावी लागणार आहे. बंडाळी रोखण्याबरोबरच शिवसेनेतील सर्वांनी एकजुटीने काम करावे लागणार, तरच शिवसेना संग्राम थोपटे यांचा वारू रोखू शकणार आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here