तलाठ्यांनी नेमणुकीच्या गावातूनही कामकाज करावे

0
410

तलाठ्यांनी नेमणुकीच्या गावातूनही कामकाज करावे
मुळशी तालुका पत्रकार संघाची मागणी : ग्रामस्थांची गैरसोय टळणार

हिंजवडी, दि. २७ (वार्ताहर)  :  तलाठ्यांनी नेमून दिलेल्या गावामध्ये आठवड्यातून किमान दोन दिवस कामकाज करावे, अशी मागणी मुळशी तालुका पत्रकार संघाने केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांची तलाठी दफतरी कामकाजासाठी होणारी गैरसोय टळली जाणार आहे. तहसिलदार अभय चव्हाण यांनी याबाबत अंमलबजावणी करून आदेश देण्याचा शेराही मारला आहे.
          शासन आपल्या दारी सारख्या योजना राबवून शासन लोकांना जास्तीत जास्त सुविधा देऊन योजना पोहोचवण्याचे काम करत असते. त्यामुळे लोकांची कामे वेळेत होऊन योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. ही एक चांगली बाजू समोर असताना दुसरीकडे काही शासकीय अधिकारी त्यांना नेमून दिलेल्या गावी मात्र फिरकतच नसल्याचे चित्र पुढे आले आहे.  त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यन्त पोहोचवण्यात त्रुटी निर्माण होत आहेत. यामध्ये तलाठी वर्ग हे आघाडीवर असून नेमून दिलेल्या गावी काही तलाठी फिरकतच नाही.
         त्यामुळे शेतकरी वर्ग या तलाठ्यांना भेटण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जातात. तेथेही हे तलाठी वेळेवर भेटतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे कामात खोडा होतोच व वेळही वाया जातो. जमिनीचे सातबारे काढण्यासाठीही पौड या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे ग्रामस्थानीही हे तलाठी गावात उपलब्ध व्हावेत अशी आशा व्यक्त केली आहे.
            तहसीलदार चव्हाण यांनी या मागणीचे पत्र स्वीकारले असून त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल असा शेराही मारला आहे. मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, सचिव विजय वरखडे, कार्याध्यक्ष प्रवीण सातव, खजिनदार दीपक सोनवणे, सदस्य गोरख माझिरे आदी पत्रकारांनी हे निवेदन दिले आहे. 
फोटो ओळ : तलाठ्यांनी नेमणुकीच्या गावात आठवड्यातुन किमान दोन दिवस कामकाज करावे यासाठी मुळशी तालुका पत्रकार संघाने तहसीलदार चव्हाण यांना लेखी पत्र दिले. 

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here