कोरोनाकाळात कौतुकास्पद कामगिरी करणार्या सर्व महिलांना पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीतर्फे गौरविण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर साहेब, संगिता पवळे व मान्यवर.
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीतर्फे पिरंगुटला विविध कार्यक्रम
स्वराज्यनामा ऑनलाईन : महिलांनी सामर्थ्य ओळखून वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी पिरंगुट, ता.मुळशी येथे व्यक्त केले. हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी तर्फे पिरंगुट येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
मिर्लेकर पुढे म्हणाले की, आपण समाजाचं देणं लागतो याची जाणीव मनात ठेऊन काम करणं ही आदरणीय बाळासाहेबांची शिकवण आहे. महिलांना पुरुषाच्या बरोबरीने संधी देण्यासोबतच त्यांचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे. महिला आता सबला झाल्या आहेत, त्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी हे या राज्य सरकारचं धोरण असल्याचं मत रविंद्र मिर्लेकर यांनी मांडल. महिला बचत गटांनी मार्केटचा शोध घेऊन तिथे उत्पादनांची विक्री केली तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ते महत्वाचे पाऊल ठरेल असेही ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळी यांनी महिला कौशल्य विकास व उद्योग सखी यांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासन अनुकूल झाले असून त्याकरिता नेहमीच प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. महिलांना स्वयंरोजगारित व सक्षम बनवण्यासाठी कौशल्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्यावतीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिरंगुट येथे दरवर्षी मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी आरोग्य शिबीर यामध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी, अस्थीरोग व दंतचिकित्सा, बचत गटांच्या विविध वस्तू विक्रीचे प्रदर्शन व विक्री, १० वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांसाठी पाककला स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन, खेळ पैठणीचा हा महिलांचा विशेष आवडीचा कार्यक्रम, महिलांसाठी हळदी कुंकू, शिलाई मशीन वाटप असा भरगच्च कार्यक्रम २ दिवस राबवण्यात आला होता. यासोबतच आशा-अंगणवाडी, वर्कर पासून ते पत्रकार, ग्रामपंचायत कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी पत्रकार, प्रशासन यांचा कोरोना योध्दे म्हणून सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिवसेना पुणे जिल्हा महिला संघटिका संगिता पवळे यांनी पुढाकार घेतला.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख सत्यवान उभे, जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे, बारामती लोकसभा सहसंपर्क संघटिका किर्ती फाटक, माजी सभापती बाळासाहेब पवळे, मा. जिल्हाध्यक्ष दत्तात्रय टेमघरे, संगिता पवळे, भोर विधानसभा प्रमुख प्रकाश भेगडे, जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, तालुका प्रमुख संतोष मोहोळ, ज्येष्ठ नेते बबनराव दगडे, पिरंगुट माजी सरपंच बाळासाहेब गोळे, भानुदास पानसरे, सरपंच चांगदेव पवळे, तृष्णा विश्वासराव, सविता मते, संगीता ठोसर, नाना शिंदे, राम गायकवाड, अविनाश खैरे, दीपक करंजावणे, ज्ञानेश्वर डफळ, संतोष तोंडे, ज्योती चांदेरे, सचिन खैरे, रविकांत धुमाळ, ज्ञानेश्वर पवळे, रामदास पवळे, महेश वाघ, राहुल पवळे, सुरेखा संभाजी पवळे व विविध पदाधिकारी, पिरंगुट ग्रामपंचायत सर्व आजी माजी सदस्य व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिलावर्ग उपस्थित होते.
नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटपाचा २५० लोकांनी लाभ घेतला. रक्तगट तपासणीचा १०० महिलांनी लाभ घेतला. तर अस्थिरोग तपासणी ५० जणांनी करून घेतली. बचत गट वस्तू विक्रीसाठी २५ स्टॉल्स उपलब्ध होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना महिला जिल्हा संघटिका संगिता बाळासाहेब पवळे यांनी केले होते.

