तरूणांना व्यावसायिक प्रोत्साहनासाठी मराठा बिझनेस असोसिएशनची पुण्यात स्थापना

0
421

स्वराज्यनामा ऑनलाईन : तरुणांना व्यवसाय चालू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून मराठा बिझनेस असोसिएशनची (एम.बी.ए.) स्थापना करण्यात आली आहे. पुण्यातील मराठा व्यावसायिक तरुण यासाठी एकत्र आले आहेत. मराठा तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी प्रवृत्त करुन त्यांना प्रोत्साहन देणे, नवीन व्यावसायिकांना सरकारच्या योजनांची माहिती करुन देऊन त्याचा पुरेपुर लाभ मिळवून देणे, हा या नवीन व्यासपीठाचा मुख्य उद्देश आहे.

नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर (ता.१) सकाळी १०.३० वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा बिझिनेस असोसिएशनची स्थापना झाल्याची घोषणा करण्यात आली.

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक माऊली दादा टिंगरे, अरविंद फाजगे पाटील, गणपती सावंत, विश्वास गुळणकार, विनायक मुळे, ह.भ.प. राजाराम कड, अविनाश दिघे, दीपक कोंडे, संग्राम जगताप, माधव पवार, विजय गुंजाळ, अनिल सुरवसे, जय पाटील, पांडुरंग रानवडे, योगेश उबाळे, किरण नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठा समाजाला व्यावसायिक पार्श्वभूमी नसल्याने व्यावसायिक तरुणांना व्यवसाय करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, या सर्व अडचणी सोडविण्यासाठी हे व्यासपीठ विनामूल्य मदत करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह राज्याच्या बाहेर देखील या व्यासपीठाची व्याप्ती राहणार आहे.

प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावागावात स्वयंसेवक असणार आहेत. हे स्वयंसेवक गावपातळीवर व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी विनामूल्य मदत आणि मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती सदर व्यासपीठाचे स्वयंसेवक उद्योजक संदीप पाटील यांनी दिली.

ज्या प्रकारे मराठ्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी रणभूमी गाजवली तशीच आता हे नवउद्योजक मराठे उद्योगाची बाजारपेठ गाजवतील असे प्रतिपादन अरविंद फाजगे पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी पुण्यातील डॉक्टर, वकील, पत्रकार, शिक्षक उद्योजक, विध्यार्थी तसेच परिसरातील नागरिक या आगळ्या-वेगळ्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

उपस्थितांनी सदर व्यासपीठाचे कौतुक करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या, आणि जमेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजक संदीप पाटील यांनी केले व स्वप्नील पाटील आणि विनायक मुळे यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले, आणि शरद कात्रजकर यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here