सिंबॉयसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय नटराजन यांनी मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांची भेट घेतली
कोरोना काळात सिंबॉयसिस हॉस्पिटलने अतिशय उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देत मुळशीकरांना प्राधान्य दिले तसेच माफक दर लावून मुळशीकरांचे मन देखील जिंकले. त्यामुळे मुळशीकरांना सिंबॉयसिस हॉस्पिटलबद्दल एक सकारात्मक आश्वासकता निर्माण झाली आहे. लवळे, ता.मुळशी येथे 15 एकरमध्ये हे हॉस्पिटल साधारण 1 वर्षापुर्वी सुरू झाले. मोठ्या स्वरूपात 300 बेडच्या जवळपास क्षमता असल्याने पुणे व पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील नामांकीत हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध झाले आहे. कोरोना काळात 500 पेक्षा जास्त बेड उपलब्ध करून हॉस्पिटल प्रशासनाने मोठ्या प्रयत्नांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.
स्वराज्यनामा ऑनलाईन : सिंबॉयसिस हॉस्पिटल मुळशीकरांना सदैव माफक दरातच वैद्यकीय सेवा देणार असल्याचे हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय नटराजन यांनी सांगितले. त्यांनी आज मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी चव्हाण यांना चर्चेद्वारे आपले मनोगत सांगितले. कोरोना काळात मुळशीकरांना प्राधान्य देत, उत्कृष्ट व माफक दरात सिंबॉयसिस हॉस्पिटलने सेवा उपलब्ध करून दिली. तोच धागा मुळशीकरांसाठी यापुढेही कोविड व्यतिरिक्त आजारांसाठीही सदोदीत जोपासला जाईल, अशी ग्वाहीच डॉ.नटराजन यांनी सिंबॉयसिस प्रशासनाच्या वतीने समस्त मुळशीकरांना दिली आहे.
सिम्बॉयसिस रुग्णालय प्रशासनाने प्राधान्याने मुळशी तालुक्यातील नागरिकांना सर्व आजारांसाठी शासकीय आणि माफक दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. प्राधान्याने मुळशीकरांना सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार असून हॉस्पिटल प्रशासन या भावनांची कदर करते आणि त्यासाठी हॉस्पिटल सदैव प्रयत्नशील राहील, असे डॉ.विजय नटराजन यांनी तहसिलदारांशी बोलून दाखविले.
तालुक्यातील 95 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये हॉस्पिटल प्रशासनाची ही भूमिका पोहोचणे व या गावांतील नागरिकांना हॉस्पिटल स्तरावर वेळेत व चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याकरिता व तशी जनजागृती करण्यासाठी प्रशासनाची मदत होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी नोंदविले. पुर्वी 27 गावांत जाऊन हॉस्पिटलच्यावतीने नागरिकांच्या तपासण्या व किरकोळ उपचार असतील तर जागेवरच केले जात होते. ते आता संपुर्ण मुळशी तालुक्यात राबवणार असल्याची माहितीही डॉ.नटराजन यांनी दिली.
मुळशीकरांच्या सेवेत दाखल झालेल्या सिंबॉयसिस रुग्णालयाने मुळशीकरांना माफक दरात उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून दिल्याने मुळशीकरांसाठी हे रुग्णालय वरदान ठरले आहे. मुळशीच्या विकासात भर घालणारं हे रुग्णालय मुळशीकरांच्या हिताचाच सदैव विचार करेल अशी आशा व्यक्त करत तहसिलदार अभय चव्हाण यांनी सिंबॉयसिस प्रशासनाचे आभार मानले.
यापुढे मुळशी तालुक्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाकडून विविध आरोग्य शिबिरं राबवली जाणार असून त्यासाठी गावोगावी जाऊन हॉस्पिटल त्याचे आयोजन करणार आहे. किरकोळ आजारांसाठी जागेवरच उपचार केले जाणार आहेत. तर हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करायला लागणार असेल तेव्हा पंतप्रधान आयुषमान योजना, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनांसारख्या शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ देऊन मुळशीकरांवर उपचार केले जाणार आहेत. तर माफक दर देखील योजनेत न बसणारांसाठी असणार आहेत, असे यावेळी झालेल्या चर्चेतून निष्पन्न झाले.