पौड, भोर, राजगड, वेल्हे पोलिसांना निवासस्थानांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचीही गृहमंत्र्यांकडे थोपटेंची मागणी
स्वराज्यनामा ऑनलाईन : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात मुळशीतली गावं घेऊ नये म्हणून आमदार संग्राम थोपटे यांनी प्रयत्न चालू केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांना यासंबंधी पत्रव्यवहार करून मुळशीतली संबंधित गावं वगळण्यासाठी विनंती केली आहे. तसेच पौड, भोर, राजगड, वेल्हे पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी निवासस्थान इमारत उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठीही थोपटे यांनी देशमुख यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. यासंबंधी थोपटेंकडून पूर्ण प्रयत्न चालू असल्याची माहिती मुळशी तालुका काँग्रेस अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी माहिती दिली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाची हद्द नव्याने जाहीर करण्यात आल्यानंतर त्यात मुळशीतल्या काही गावांचा समावेश केला आहे. भुगाव, भुकूम, पिरंगुट, लवळे, चांदे ही गावं जी पूर्वी पाषाण पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारित्यात येत होती ती नव्याने पिंपरी चिंचवड आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात घेण्यात आल्याने नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाषाण कार्यालय नागरिकांना तसे जवळ असल्याने ती पूर्वी प्रमाणेच असावीत अशी मागणी थोपटेंनी पत्राद्वारे केली आहे. या मागणीसोबतच संबंधित गावांनी तयार केलेले ठरावांची पत्रं देखील जोडण्यात आले आहेत.
पौड पोलिसांना निवासस्थानासाठी दारवलीत जागा उपलब्ध करून द्यावी – थोपटे
पौड पोलिसांसाठी १०० निवासस्थानं उभारण्यासाठी दारवलीत जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील आमदार संग्राम थोपटे यांनी केली आहे. दारवली येथील सरकारी गायरानामधील गट क्र. ४५९ मधील ५ एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंतीही पत्राद्वारे केली आहे. पौड पोलीस निरीक्षकांनीही यासंबंधी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे २९ जानेवारी २०१७ रोजी प्रस्ताव दाखल केला आहे. तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानेही १६ डिसेंबर २०१७ रोजी अप्पर सचिव, गृहविभाग – मंत्रालय, मुंबई यांना प्रस्ताव पाठवला आहे. यावर आता आमदारांनी देखील मागणी केल्याने लवकरच प्रश्न मार्गी लागेल अशी आशा निर्माण झाली आहे. याचप्रकारे भोर, राजगड व वेल्हे पोलिसांच्या निवासस्थानासाठी मागणी करण्यात आली आहे.