अकोले, ता.मुळशी येथे गावठी बॉम्बच्या स्फोटात मृत्युमुखी झालेले कुत्रे.
स्वराज्यनामा ऑनलाईन : शिकारीसाठी ठेवलेला गावठी बॉम्ब तोंडात फुटल्याने कुत्र्याचा मृत्यू झाला. अकोले, ता.मुळशी येथील डोंगरावर मंगळवारी ही घटना घडली आहे. पाळीव कुत्र्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अज्ञात व्यक्तिंनी जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी हा बॉम्ब ठेवला होता. बॉम्ब कुत्र्याने तोंडात घेतल्याने त्याचा स्फोट झाला. कुत्र्याच्या जीवावर बेतले ते पाळीव गाय, म्हैस, बैल अथवा शेतकरी किंवा शेतमजूर यांच्या जीवावरही हे बेतू शकले असते.
मुळशी तालुक्यातील अकोले गावात राष्ट्रीय कबड्डी खेळाडू नरेंद्र शेडगे यांचे बालाजी फार्म हाऊस आहे. येथे गाय, म्हैस, बैल, कुत्रे, मांजर, कोंबडी असे पाळीव प्राणी-पक्षी आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या जनावरांची शेडगे हे या फार्म हाऊसमध्ये जपणूक करतात. जवळच अकोले गावचा डोंगर असून या डोंगरावर रोज सकाळी आणि संध्याकाळी जनावरे चरण्यासाठी रानात जात असतात. सायंकाळी डोंगरावर जनावरे चरण्यासाठी गेली असता नेहमी प्रमाणे या जनावरांबरोबर त्यांचा गवारी आणि एक कुत्रा पण होता. या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींनी शिकारीसाठी गावठी बॉम्ब ठेवला होता. त्याच्या वासाने कुत्रा त्याठिकाणी गेला. त्यांने तो तोंडात घेतल्यानंतर तो फुटला व दुर्दैवाने कुत्रा जागीच ठार झाला.
यदाकदाचित तोच बॉम्ब गाय, म्हैस, बैल, शेळ्या-मेंढ्या यांनी खाल्ला असता तर खूप मोठे नुकसान झाले असते. तसेच सध्या शेतीची कामे चालू आहेत. एखादा शेतकरी, ट्रॅक्टर चालक किंवा बैलगाडी त्यावरून गेली असती तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. जिवीतहानी सुद्धा होऊ शकली असती. यापुर्वी सुद्धा जनावरांच्या शिकारीसाठी लावले जाणाऱ्या गावठी बॉम्बमुळे मुळशी तालुक्यात पाळीव प्राणी, जनावरे यांना मृत्यूशी सामना करावा लागला आहे.
लाडक्या कुत्र्याच्या मृत्यूमुळे नरेंद्र शेडगे व त्यांच्या फार्म हाऊसवर असणारे कामगार हे खूप दुखी झालेली आहेत. या कुत्र्याने मरतानाही बलिदान देत गाय, म्हैस, बैल आणि कामगार यांचा मात्र जीव वाचवला आहे. स्वतःचे बलिदान दिले पण दुसऱ्यांवर आलेले संकट स्वतःवर ओढवून घेऊन या कुत्र्याने प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे. त्यामुळेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावठी बॉम्ब ठेवणारांवर सक्त कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मुत्यूमुखी कुत्र्याला शेतात मुठमाती देण्यात आली असून मालक नरेंद्र शेडगे यांना तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. प्राळीव प्राण्यांवर त्यांचा खूप जीव आहे. ८ ते १० कुत्री, दूधासाठी गाय-म्हशी, शेतीसाठी बैल त्यांनी जोपासले आहेत. हा कुत्रा त्यांना परिवारातील सदस्यापरी प्रिय असल्याने त्यांनी घडलेल्या घटनेची योग्य ती चौकशी करून दोषींना परत असे कृत्य करता येणार नाही अशी कारवाई करण्याची मागणी केली आहे.