दि.७ नोव्हेंबर २०२० रोजी राजस्थान मधील मेहरानगड दुर्ग सर करून १००० दुर्ग अभ्यास मोहीम पूर्ण केल्याचा आनंद व्यक्त करताना मारूती गोळे व मित्र परिवार.
स्वराज्यनामा ऑनलाईन : स्वराज्यातील मावळा शिलेदार, वंशज मारूती गोळेंनी १ हजारहुन अधिक दुर्ग सर करत मुळशी आणि गोळे घराण्याची मान उंचावली आहे. छत्रपती शिवरायांच्या पायदळातील सरनौबत नरवीर पिलाजी गोळे घराण्यातील पिरंगुट, ता.मुळशी, जि.पुणे येथील मावळा वंशज अॅड.मारूती गोळे यांनी गेल्या ८ वर्षात दुर्ग अभ्यासाचा छंद जोपासला आहे. सन २०१२ पासून आत्तापर्यंत त्यांनी देशविदेशातील १ हजारहुन अधिक दुर्ग सर केले आहेत. सिंहगड तर त्यांनी ५०० पेक्षा अधिक वेळा सर करून एक विक्रमच केला आहे. हा ध्येयवेडा मावळा दुर्ग सर करण्याची अखंड प्रेरणा म्हणून सिद्ध झाला आहे.
सन २०१२ मध्ये मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर भटकंतीस गेलेल्या अॅड. मारूती गोळे यांना त्यादिवसापासून किल्ल्यांबद्दल प्रचंड ओढ निर्माण झाली. ती इतकी की दुसऱ्या दिवशीही त्यांची पावले आपोआप सिंहगड दुर्गाकडे फिरली. ती ओढ इतकी घट्ट होत गेली की सलग ४२ दिवस सिंहगड दुर्ग सर करण्याची त्या ओढीने किमया करून दाखवली. मनात दुर्गांविषयी प्रचंड आस्था निर्माण झाल्याने त्यांनी दुर्गाभ्यास करण्याचे ठरवले. ते आजतागायत ५०० पेक्षा अधिक वेळा सिंहगड करत देश-विदेशातील १ हजार ६ दुर्ग सर केले आहेत. तर १ लाख ६५ हजारहुन अधिक छायाचित्र यानिमित्ताने जमवली असून त्यातील अनेक सोशल मिडीयात उपलब्ध करून दिली आहेत.
या प्रवासात अनंत अडचणींचा सामना करत जिद्दीने व ध्येयाने ही सहस्त्रदुर्ग मोहीम फत्ते करण्यात अॅड.मारूती गोळे यांना यश आले आहे. त्यांची ही कहानी तितकीच प्रेरणादायी, थरारक आणि रोमांचपुर्ण आहे. त्यांच्या या यशात पत्नी स्वाती गोळे आणि मुलगा यांची साथही तितकीच महत्वाची आहे. पत्नी सरदार मारणे घराण्यातील असून त्यांनीही सव्वाशेहुन अधिक दुर्ग सर करण्यात सहभाग नोंदवला आहे तर मुलगाही उत्तम गिर्यारोहक आहे. दुर्गप्रेमी मित्रपरिवारामुळे या मोहिमेला खऱ्या अर्थाने मुर्त रुप देताना अनमोल साथ लाभली.
काय आहे अॅड.मारूती गोळे यांचा ऐतिहासिक वारसा?
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील पायदळाचे प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे होते. गोळे घराणे महाराजांशी सदैव एकनिष्ठ राहिले. १६८९ साली गोळे घराण्याला पायदळ प्रमुख हा किताब मिळाला. अॅड.मारूती गोळे हे त्यांचे थेट १४ वे वंशज आहेत. वारशाने जी शस्त्रे आली आहेत, त्या शस्त्रांची वाढत्या कुटुंबाबरोबर वाटणी होत गेली. त्यामुळे आज यांच्या कुटुंबाकडे चार ऐतिहासिक तलवारी, जुन्या लाकडी वीरगळी आहेत. त्यांचे काळजीपूर्वक जतन केले जात आहे. जुन्या मूर्तींचे, जुन्या साहित्याचे जतन करून ठेवले आहे.
आग्रा ते राजगड पायी वारी, मारूती गोळे यांची ऐतिहासिक कामगिरी
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्य्राहून सुटका होण्याच्या विलक्षण घटनेला १७ ऑगस्ट २०१७ रोजी ३५१ वर्ष पूर्ण झाली होती. त्यानिमित्त आग्य्राहून ज्या मार्गे महाराज राजगडावर पोहोचले होते, त्याच मार्गे दुर्गप्रेमी मारुती गोळे यांनी पदभ्रमण मोहीम हाती घेतली होती.
या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, पराक्रमाचा जागर करावा हा उद्देशही होता. आग्रा ते राजगड या प्रवासात उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांतून सुमारे १२५३ किलोमीटरचा पायी प्रवास केला. ग्वाल्हेर, धुळे आदी संस्थानांकडून गोळे यांचे भव्य आणि अतिशय जोरदार असे स्वागत झाले.
३५ दिवसांचा खडतर प्रवास करून गोळे जेव्हा राजगडला पोहोचले, तेव्हा त्यांच्या स्वागताला ६ हजाराचा जनसमुदाय जमला होता. खुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गोळे यांचा सत्कार केला. हा त्यांच्या आयुष्यातला सर्वांत मोठा अविस्मरणीय क्षण होता.
आत्तापर्यंत राजगड १०४ वेळा, तोरणागड ४२ वेळा सर केला आहे. सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाडा-रायगड असे ६८ किलोमीटरचे अंतर कापून एकाच दिवशी पाच गड १६ तास ५५ मिनिटांत सर करण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्र, गोवा, जम्मू, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांतील सर्व गड पाहून झाले आहेत. २०२४ पर्यंत भारतातील सर्व गड सर करण्याचा गोळे यांचा मानस आहे.
या दुर्ग अभ्यास मोहिमेतून काय शिकावे ?
”दुर्गभ्रमंतीकडे केवळ पर्यटन म्हणून पाहू नये, तर इतिहास जिवंत ठेवण्यासाठी याची आवश्यकता आहे. शिवाय सदृढ, निरोगी शरीरासाठी दुर्गभ्रमंतीचा निश्चितच उपयोग होतो. ज्या मातीला, ज्या गडांना छत्रपती शिवाजी महाराजाच्या पावलांचा स्पर्श लाभला आहे अशा सर्व गडांना भेट दिली पाहिजे. त्यांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. भ्रमंती करण्याआधी गडाशी संबंधित इतिहासाचे, महापुरुषांच्या चरित्राचे वाचन करावे. त्यांचा पराक्रम अभ्यासावा. या संदर्भात समाजमाध्यमात जे अभ्यासपूर्ण आणि संतुलित लेखन येते त्याचे वाचन करावे, त्याचा संग्रह करावा. त्याचबरोबर या विषयातल्या अभ्यासकांशी संवाद साधावा. आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष गडभ्रमंती करताना, त्या ठिकाणाचे महत्त्व लक्षात घेऊन परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी.”
आपल्या या छंदासाठी कोणाकडूनही आर्थिक मदत न घेता अॅड.मारूती गोळे यांनी अविरतपणे भटकंती चालू ठेवली आहे. पोटापाण्यासाठी छोटासा व्यवसाय स्विकारत त्यातून ते योग्य नियोजन करून दुर्ग भ्रमंती व उदरनिर्वाह करत असतात. आजपर्यंत अनेक पुरस्कार, सन्मान त्यांना मिळाले आहेत.
दुर्ग अभ्यास मोहिमेतून काय साध्य होतेय ?
महाराष्ट्रातले अनेक अपरिचित गडकोट आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शासन केवळ परिचित गडाचे संवर्धन करते. मात्र या दुर्लक्षित गडांचेही संवर्धन करायला हवे. गड संवर्धनाच्या कामात स्थानिक लोकांचा सहभागी करून घेतला पाहिजे. त्यामुळे ऐतिहासिक मोल असलेल्या या स्थळाविषयी स्थानिकांच्या मनात आदरभाव दृढ व्हायला मदत होईल. आज राज्यातील बहुतांश गड केंद्र शासनाच्या आधिपत्याखाली आहेत. या गडांचा विकास करण्यासाठी असे गड राज्य शासनाकडे सुपुर्द करणे आवश्यक आहे, असे अॅड.मारूती गोळे यांचे म्हणणे आहे.
दुर्ग अभ्यास मोहिमेतून गडांची रचना, बांधणी, आतील व्यवस्था यांचा सखोल अभ्यास करता आला. महाराष्ट्रातील दुर्ग स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून वेगळया पाषाणात बांधलेले आहेत. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या धावपळीच्या कालखंडामध्ये यातील बहुतेक गडकोट बांधलेले आहेत. राजगड आणि रायगड हे दोन गड तर संपुर्ण जगाला प्रभावित करण्याइतके उत्कृष्ट आहेत. परदेशात वेगळ्या धाटणीचे गड पहायला मिळतात.
१ हजारावा दुर्ग सर केल्यानंतर अॅड.मारूती गोळे यांनी फेसबुकद्वारे व्यक्त केलेली भावना
आजचा दिवस हा माझ्यासाठी आमच्या गोळे घराण्याच्या इतिहासात नोंद व्हावी असा उजडला, सन २०१२ ला सुरू केलेली दुर्ग भटकंती आज १ हजारला येऊन पोहोचली, अनेक आव्हाने, यश अपयश, चांगले वाईट अनुभव, जीवाला जीव देणारे मित्र असे बरेच काही या प्रवासात मिळाले. जवळपास १ लाख ६५ हजार गड छायाचित्रे जमा झाली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशिर्वाद तसेच कुटुंबाचा, गोळे घराण्यातील १५३ गावातील सरनौबत गोळेंचा, जिवलग दुर्ग मित्रांचा सर्वांच्या प्रेरणेने तब्बल १००० गडांच्या मातीला स्पर्श आणि दरवाजाला माथा टेकवता आला हे माझे भाग्यच समजतो…!!!!!