राडारोड्यामुळे सुस-नांदे रस्ता ठरतोय जीवघेणा, प्रशासन घालतंय ठेकेदाराला पाठिशी?

0
1394

स्वराज्यनामा ऑनलाईन : सुस-नांदे रस्ता राडारोड्यामुळे वाहतुकीस अतिशय धोकादायक झाला आहे. धोकादायक रस्त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला असून प्रशासन डोळे झाकून गप्प आहे. विशेष म्हणजे संबंधित रस्ता गेल्या दोन वर्षांपासून प्रस्तावित असताना अजुनही पुर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला प्रशासन पाठिशी घालतंय असं चित्र दिसत आहे. सुस ग्रामपंचायतने प्रशासनाला पत्र देऊनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने धोकादायक रस्त्यावर होणाऱ्या अपघाताला प्रशासनच जबाबदार राहणार आहे.          

            पुणे शहराच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सुस गावापासून नांदे गावाकडे जाणारा रस्ता ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अतिशय धोकादायक झाला आहे. हनुमंत चौक, घोटवडे ते मूलखेड-चांदे-नांदे-सुस मार्गे मुंबई पुणे हायवे पर्यंत १२ किलोमीटर रस्ता प्रस्तावित असून गेले २ वर्षांपासून याचे काम अद्याप पूर्णत्वाकडे गेलेले नाही, अशी ठेकेदाराची मनमानी चालू आहे. नवीन रस्त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा टाकलेली खडी पावसामुळे रस्त्यावर आल्याने वाहनांच्या अपघातांना आयते निमंत्रण मिळत आहे. रोज किमान १०-१५ ते कमाल २०-२५ छोटे मोठे अपघात यामुळे घडत आहे. प्रशासनही याकडे कानाडोळा करत असल्याने संबंधित ठेकेदाराला पाठिशी घालण्याचे काम सार्वजनिक बांधकांम विभागाकडून होताना दिसत आहे.

             सुस नांदे रस्त्यावर बरेच मोठे खड्डे पडले असून त्यामुळे अपघात होत आहेत. सुस नांदे गावच्या शिवेजवळ रस्त्याची साईडपट्टी पूर्ण वाहून गेली असून २-३ फूट खोल चारी पडली आहे. रात्रीच्या वेळी ही चारी दिसून येत नसल्याने फारच धोकादायक असून मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सनीज वर्ल्डपाशी रस्त्यावर खडी आल्याने मोठी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. सुस गाव स्मशानभूमीपाशी रस्त्यावरच्या दोन्ही बाजूंची गटारं बुजली असून त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन वाहतुकीला अडथळा ठरत आहे, तसेच त्यामुळे रस्त्याची हानी होत आहे. यामुळे सुस, नांदे, लवळे, चांदे, मूलखेड ग्रामस्थ, हिंजवडी आयटी कडे जाणारे प्रवासी या सर्वांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने हा बेजबाबदारपणा करणारा प्रशासन वर्ग मात्र मूग गिळून गप्प आहे.

              याबाबतीत प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येत असून प्रशासन लोकांना सुविधा निर्माण करण्यासाठी की लोकांच्या सुविधांमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी असते असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा कारभार हा भ्रष्ट असल्याची नागरिक चर्चा करत आहेत. तर मनमानी कारभार करणारा ठेकेदार प्रशासनाला जुमानत नसल्याचेही दिसत आहे, त्यामुळे त्याचे लागेबांधे वरपर्यंत असल्याची चर्चा जोरात रंगत आहे. ठेकेदाराला व प्रशासनाला वठणीवर आणण्याचे काम लोकप्रतिनिधीही करू शकत नसल्याने लोकप्रतिनिधीही या भ्रष्ट कारभारात सहभागी होतात की काय हे आता लोकांना प्रथमदर्शनी वाटू लागले आहे. जर लोकप्रतिनिधी भ्रष्ट कारभारात सहभागी होत नसतील तर मग विकास कामात ते पाठपुरावा करत नसावेत असेही मानून लोकं आपले परिस्थिती सहन करत आहेत. लोकप्रतिनिधी काय फक्त मग मिरवायला असतात का, असा प्रश्न आता पडला आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here