पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून ६५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपुर्द

0
601

पुणे : येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश देताना संस्थेचे मानद सचिव अ‍ॅड.संदीप कदम, अजय कदम, महेंद्र अवघडे, रविंद्र लाड.

सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीनेही ५ लाख रुपयांची मदत

स्वराज्यनामा ऑनलाईन : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एक दिवसाच्या वेतनाचा ६५ लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री, संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. यावेळी सेवक सहकारी पतसंस्थेच्यावतीनेही ५ लाख रुपये देण्यात आले. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून संस्थेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या या मदतीचे पवार यांनी कौतुक केले आहे.

             पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेली ७९ वर्षांपासून पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी विविध प्रकारचे शिक्षण घेतात. संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा हातात घेतल्यानंतर अजित पवार यांनी ग्रामीण भागातील शाळा इमारतींचा कायापालट केला. अत्याधुनिक स्वरूपाच्या भौतिक सुविधा विद्यार्थी, शिक्षकांना पुरविल्या. अध्यापनाबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही विधायक उपक्रम राबविले. त्यामुळे संस्थेच्या सर्व शाळांचा दहावी, बारावीच्या गुणवत्तेचा आलेख दरवर्षी चढता असतो. यावर्षी संस्थेचा दहावीचा निकाल ९८.२२ टक्के लागला असून २५ शाळांचे निकाल शंभर टक्के आहे. बारावीचा निकाल ९३.९३ टक्के आहे. तसेच इतर क्षेत्रातही संस्थेचा विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपले कौशल्य दाखवित आहेत.

             यावर्षी कोरोना महामारीचा संपूर्ण जग सामना करत आहे. शाळा बंद असल्या तरी संस्थेतील शिक्षक ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. कोरोनामुळे राज्यात मोठी गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अ‍ॅड.संदीप कदम, खजिनदार अ‍ॅड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे आवाहन केले. कर्मचाऱ्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

             त्यामुळे संस्थेतील सर्व अशासकीय अनुदानित, विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन संस्थेकडे जमा केले. या वेतनातून ६५ लाख रूपये जमा झाले. संस्थेचेच उपांग असलेल्या सेवक सहकारी पतसंस्थेनेही पाच लाख रूपये दिले. हे दोन्ही धनादेश अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मानद सचिव अ‍ॅड.संदीप कदम, संस्थेच्या नियामक मंडळाचे सभासद अजय कदम, पतसंस्थेचे अध्यक्ष महेंद्र अवघडे, सचिव रविंद्र लाड आदि उपस्थित होते.

             कोरोनाच्या वैश्विक महामारीचा सामना करताना सामाजिक बांधिलकीतून संस्थेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे. कोरोनाच्या काळात शिक्षकही प्रशासनाला विविध प्रकारचे सहकार्य करीत आहेत. तसेच सध्या शाळा बंद असल्या तरी युट्यूब, मायलिन, झूम, गुगल मीट, व्हॉटस अपग्रुपच्या माध्यमातून शिक्षक व्हिडीओ, पीपीटीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.

अ‍ॅड.संदीप कदम (मानद सचिव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे)

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here