लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक किरण दगडे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
स्वराज्यनामा ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील जिम तसेच स्पर्धा परिक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू कराव्यात यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने पाऊल उचलले आहे. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तसेच बाधवन-कोथरूड प्रभाग क्र.१० चे विद्यमान नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना निवेदन दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जिम पूर्णतः बंद अवस्थेत आहेत. व्यायामशाळा चालक, मालक, प्रशिक्षक, सफाई कर्मचारी, योग शिक्षक, झुंबा शिक्षक, आहारतज्ञ, न्यूट्रिशियन असे अनेक पूरक व्यवसायाचे कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे या फिटनेस उद्योगाला आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला असून जिल्ह्यातील जिम व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी त्वरित जिम सुरू करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा २० सप्टेंबर रोजी होणारी परिक्षा तुर्तास पुढे ढकलली असून ती लवकरच होईल असे चित्र आहे. तर जेईई व नीट या परीक्षाही सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात घेण्याचा आदेश मा.सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परंतु गरीब व गरजू विद्यार्थ्यांना या परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारी जागा आणि पुस्तकेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील अभ्यासिका खुल्या करण्यात याव्यात, अशी मागणीही किरण दगडे पाटील यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.
राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतला गेल्यास जिमचे बॉडी बिल्डर आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भाजप युवा मोर्चातर्फे जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील यांनी दिला आहे.