पुणे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायच्या उद्देशाने भाजपची ग्रामीण कार्यकारिणी जाहीर

0
914

पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदाचे पत्र खासदार गिरीश बापट यांच्याकडून स्विकारताना नगरसेवक किरण दगडे पाटील, व्यासपीठावर आमदार भीमराव तापकीर, माजी मंत्री बाळा भेगडे, योगेश गोगावले, शरद ढमाले, गणेश भेगडे, रवि अनासपुरे, जालिंदर कामठे व मान्यवर

युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक किरण दगडे, तर महिला आघाडी अध्यक्षपदी कांचन कूल यांची निवड

स्वराज्यनामा ऑनलाईन :  पुणे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा हे ध्येय ठेवत ‘एकला चलो रे’ ची भुमिका घेत भाजपची पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी नगरसेवक किरण दगडे तर भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षपदी दौंडच्या कांचन कूल यांची निवड झाली आहे. बावधन, ता.मुळशी येथे पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये जम्बो कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणीची विविध पदं, युवा मोर्चा, महिला, विविध क्षेत्रातील आघाड्या यांची जम्बो कार्यकर्त्यांची फौज भाजपकडून तयार करण्यात आली आहे.

            यावेळी खासदार गिरीश बापट, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार राहुल कूल, आमदार भीमराव तापकीर, जिल्हा प्रभारी योगेश गोगावले, माजी आमदार शरद ढमाले, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, रवि अनासपुरे, जालिंदर कामठे, नगरसेवक बापू मानकर, नगरसेवक अमोल बालवडकर, सरपंच पियुषा दगडे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

            खासदार गिरीश बापट म्हणाले की, पुणे जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा उभारायचा असून कार्यकर्त्यांनी त्यासाठी आतापासूनच तयार व्हावे. पुणे जिल्ह्यात भाजपकडे एकही नगरपालिका नव्हती, प्रयत्न केले तर 4 नगरपालिका ताब्यात आल्या. त्या 8 झाल्या पाहिजेत, त्यासाठी कार्यकर्ते महत्वाच्या भुमिकेत असतील. कार्यकर्त्यांनी कामातून ठसा उमटवत कार्य चालू ठेवावे. जो काम करतो त्याची दखल जनता घेतेच. त्यामुळे नुसतं प्रसिद्धीच्या मागे न लागता सर्वसामान्यांच्या व्यथांना सोडवणारा म्हणजे भाजपचा कार्यकर्ता अशी ओळख निर्माण करावी व पक्षाला पुढील यशापर्यंत न्यावे असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

            यावेळी बोलताना भाजपाचे पुणे जिल्हा प्रभारी गोगावले म्हणाले की, राज्यात असणारे इतर पक्षांची अवस्था बिकट आहे ती केवळ प्रशिक्षित कार्यकर्ते नसल्यामुळेच. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रशिक्षित असेल, त्याला पक्षाचं मुळ आणि पक्षाची विचारसरणी आत्मसात असेल. तो तळागाळातले प्रश्न सोडवेन, सर्वसामान्यांना तो नक्कीच न्याय देईल. त्यासाठी प्रशिक्षणाची तयारी चालली असून त्याला पक्षाच्या केंद्रप्रणित यंत्रणेतून मंजूरी मिळाल्यावर ऑनलाईन प्रशिक्षण देणार आहोत.

            मुळशी तालुक्यामध्ये कार्यक्षम असलेले नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मुळशीतील भाजपचे कट्टर समर्थक गोरख दगडे यांची ग्रामविकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून मयुर कांबळे यांची अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याने मुळशीत भाजपची 3 जिल्हाध्यक्षपद देण्यात आली आहेत. तर युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदी हिंजवडीच्या जीवन साखरे यांची निवड झाली आहे.

            किरण दगडे पाटील हे मुळशीतील बावधन गावचे रहिवासी असून पुणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दमदारपणे मोठे मताधिक्य घेत नगरसेवक पदावर निवड़ून येत आपली चुणूक दाखवली होती. त्यातच पुणे शहराच्या सिमेवर असलेल्या बावधन गावच्या मोठ्या प्रतिष्ठेच्या सरपंच पदावर महाराष्ट्रातील पहिलाच लोकनियुक्त सरपंच म्हणून पत्नी पियुषा दगडे यांना निवडून आणले. मोठी ग्रामपंचायत असल्याने इथे प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती. तसेच बहुचर्चित असा प्रविण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचे ते निर्माते असून राजकारणापलिकडील एक विशेष ओळख आहे.

            युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या किरण दगडे यांनी बावधन व मुळशी परिसरात एका मोठा आदर्श असा दगडे पॅटर्न तयार केला आहे. सुसज्ज, संपन्न असा बावधन ग्रामपंचायतचा परिसर ग्रामपंचायत व महानगरपालिकेच्या मदतीने घडवून आणला आहे. ग्रामपंचायत परिसरात विकास कामांचा मोठा धडाका असून मुळशी तालुक्यातही कोरोना काळात प्रत्येक गाव-वाडी-वस्त्यांमध्ये मास्क, होमिओपॅथी औषधं, सॅनिटायझर आदी वस्तू वाटपाच्या निमित्ताने दगडे यांचे कार्य तालुक्यात पोहोचले आहे. मुळशीकरांना जिल्ह्यामध्ये नेतृत्व लाभलेला एक नवा उगवता राजकीय चेहरा दगडे यांच्यानिमित्ताने मिळाला आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here