पुणे जिल्हा परिषदेचं पहिलं हायस्कूल, १० वीचा निकाल १०० टक्के – मुळशीतल्या नांदे गावची यशकथा

0
952

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  जिल्ह्यातील पहिल्या-वहिल्या पुणे जिल्हा परिषदेच्या नांदे, ता.मुळशी येथील शाळेने पहिल्याच वर्षी निकालात १०० टक्क्यांची बाजी मारली आहे. इयत्ता नववी व दहावीसाठी पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेली एकमेव शाळा असून पहिल्याच वर्षात घवघवीत यश मिळवून शाळेने इतिहास निर्माण केला आहे. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सुनिल कुर्‍हाडे यांनी या यशाबद्दल शाळेचे कौतुक केले आहे. शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांसह सर्वच ग्रामस्थं, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे हे यश नक्कीच प्रेरणादायी आहे.

            या शाळेमधून कु. हर्षदा सचिन डांगे व वैष्णवी संभाजी रानवडे दोघी ५०० पैकी ४२७ गुण (८५.४ टक्के) मिळवत प्रथम आल्या आहेत. तर द्वितीय क्रमांक मोक्षदा शत्रुघ्न ससार हिने ८४.६ टक्के गुण मिळवून पटकावला आहे. तर स्वाती दत्ता गोरे हिने ८२ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच सर्वच विद्यार्थ्यांनी ५० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळावीत यशस्वी झाले आहे. सर्व मुलांनी भरघोस गुण मिळवत यश संपादन केले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व ग्रामस्थं व सरपंच प्रशांत रानवडे यांनी अभिनंदन केले आहे.

            या शाळेला जिल्हा परिषदेने स्वयंआर्थिक सहाय्याने चालवली जाणारी शाळा म्हणून सन २०१८-१९ ह्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता नववी व दहावीचे वर्ग चालविण्यास परवानगी दिली. जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष विश्वासनाना देवकोते व उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती विवेक वळसे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी ही मंजूरी देऊन शाळा व्यवस्थापन समिती, नांदे व राजमाता संस्कार प्रतिष्ठान, नांदे यांच्यावर शाळा चालवण्याची जबाबदारी सोपवली. आज त्यांनी घेतलेला निर्णय अतिशय सार्थ ठरवत शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

            जिल्हा परिषदेद्वारा शाळा सुरू करण्याचा एकच उद्देश होता, तो म्हणजे गावातील शाळा इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच होती. पुढील वर्ग नसल्याने व दुसरीकडे जाण्या-येण्याची व्यवस्था नसल्याने गावातील व परिसरातील मुलींचे पुढील शिक्षण जवळपास बंदच होत होते. पालकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच तसेच त्याचबरोबर आपल्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांच्या मनात भिती होती. त्यामुळे अनेक मुलींना शिकण्याची इच्छा असूनही पुढे शिकता येत नव्हते.

            या गोष्टिंचाच विचार करून सरपंच प्रशांत रानवडे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन डांगे, विजय डांगे यांच्या नेतृत्वाखाली पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांची मिळून बैठक झाली. पालकांच्या विनंतीचा व मुलींच्या शिक्षणाचा विचार करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदे येथे इयत्ता आठवी, नववी, व दहावीचे वर्ग जोडण्याची तयारी केली आणि आज इयत्ता दहावीचे पहिलेच वर्ष होतं. त्या पहिल्या वर्षात पहिल्याच वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. पहिल्याच वर्षात घवघवीत यश संपादन केल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सरपंच सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे. यात मुलींनी ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरविला असून आपला यशाचा ठसा उमटविला आहे.

            या संपूर्ण यशामध्ये गावचे सरपंच प्रशांत रानवडे, उपसरपंच किरण ओव्हाळ व मा. सरपंच मारुती रानवडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील दत्तात्रय रानवडे, मा.सरपंच विट्ठल रानवडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन डांगे, विजय डांगे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष रानवडे, अविनाश करंजावणे, सुनिल जाधव, मारुती मारणे, भानुदास करंजावणे, संतोष ढमाले, सुदाम रानवडे, रोहिदास रानवडे, गुलाब ढमाले, आनंद रानवडे व सर्व सदस्य यांचे खूप मोठे योगदान आहे. इयत्ता आठवी, नववी, दहावीचे वर्ग सुरू करण्यामध्ये राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवाजी सोनवणे यांचा ही खूप मोलाचा सहभाग आहे. त्याचबरोबर इयत्ता नववी आणि दहावीच्या मुलांची तयारी करून घेण्यासाठी विशेष अशी धडपड करणाऱ्या शुभांगी पिंगळे मॅडम यांचे मोलाचे योगदान आहे. त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली भंडारी यांचेही मोठे सहकार्य मिळाले आहे.

लोकसहभागातून स्वयंआर्थिक खर्चावर शिक्षकांची नेमणूक, सामाजिकतेचं एक आदर्श उदाहरण

            नांदे येथील शाळा सध्या नववी व दहावीसाठी अनुदानित नाही. त्यासाठी ग्रामशिक्षण समिती, ग्रामस्थं यांनी पुढाकार घेतला आहे. या शाळेत सध्या ३ शिक्षक असून नववीत ४१ तर दहावीत २७ विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. ग्रामस्थांनी ल्युपिन रिसर्च सेंटर, नांदे यांना यासंदर्भात प्रस्ताव दिलेला तो प्रस्ताव ल्युपिन फाऊंडेशनने तत्काळ स्विकारत २ शिक्षकांचे मानधन देण्याची जबाबदारी स्विकारली आहे. उर्वरीत एका शिक्षकाचे मानधन मात्र ग्रामस्थं देत आहेत. हे असे एक आदर्श उदाहरण आहे.

सरपंच प्रशांत रानवडे

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here