स्वराज्यनामा ऑनलाईन  :   कुठलाही सण असो, समारंभ असो पोलीस मात्र नेहमीच रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी कर्तव्य बजावताना दिसतात. मात्र बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा वाढदिवस जर पोलीस दलाच्या कुटुंबप्रमुखाच्या उपस्थितीत साजरा झाला तर? पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील किवळे फाटा येथे कर्तव्य बजावणारे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांना हे भाग्य लाभलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाल्याने श्री. जाधव भारावले.

            गृहमंत्री अनिल देशमुख  काल पुणे येथे दौऱ्यावर होते. आज सकाळी पुण्यावरुन मुंबईला येताना एक्सप्रेस हायवेवर थोडा वेळ थांबून त्यांनी किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पोलिसांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, अडी-अडचणीं बाबत चर्चा केली. या चर्चे दरम्यान त्यांना समजले की बंदोबस्तासाठी असलेले पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस असूनही कुटुंबापासून दूर आपले कर्तव्य  बजावणाऱ्या श्रीकांत जाधव यांचे गृहमंत्र्यांना कौतुक वाटले. केवळ कौतुकच नव्हे तर  राज्याचा गृहमंत्री पण पोलीस विभागाचा कुटुंब प्रमुख या नात्याने गृहमंत्री श्री.देशमुख पोलीस उपनिरीक्षकाच्या आनंदात सामील झाले. त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आणि मुंबईकडे मार्गस्थ झाले.

            दस्तुरखुद गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा होत आहे. हे पाहून श्री. जाधव व तेथील उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी आनंदले. अशा प्रकारे साजरा केलेला हा वाढदिवस श्री. जाधव यांच्या कायम स्मरणात राहील. कोरोनाच्या काळात योद्ध्याच्या रूपात काम करणारे पोलीस यानिमित्ताने मात्र सुखावले असून त्यांचे मनोधैर्य वाढण्यास नक्कीच हातभार लागेल.

            आज सकाळी बंदोबस्ताच्या ड्यूटीवर असताना, गृहराज्य मंत्री अनिल देशमुख साहेबांना वाढदिवस असल्याचे समजताच त्यांनी आवर्जून गाडी थांबवून केक कापल्यानंतर स्वतःच्या हाताने भरवला, ही आयुष्यातली खुप मोठी गोष्ट असून त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. यामुळे आम्हा पोलिसांचे मनोबल वाढून त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे.

– श्रीकांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक, पौड पोलीस स्टेशन, मुळशी, पुणे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here