मुळशीत नवविवाहित दाम्पत्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाखाची मदत

0
3159

यावेळी डावीकडून सरपंच कौशल्या गायकवाड, अभिनेते विक्रम गोखले, वधू अक्षदा, वर तुषार, तहसिलदार चव्हाण, नायब तहसिलदार पाटील इ.

स्वराज्यनामा ऑनलाईन : माले, ता. मुळशी येथे पार पडलेल्या मारणे आणि वाघिरे परिवारातील नवविवाहित दाम्पत्याने आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाखांची मदत केली. मदतीचा धनादेश मुळशी तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडे प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या उपस्थितीत देण्यात आला. मुळशी तालुक्यात नवदाम्पत्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

            मुळशी तालुक्यातील माले येथील अक्षदा अनंता मारणे या वधूचा पिंपरी चिंचवड परिसरातील तुषार बाळासाहेब वाघिरे याच्याशी विवाह आज पार पडला. या विवाहात मुलीचे मामा नानेगावचे माजी सरपंच यशवंत गायकवाड व मामी नाणे गावच्या सरपंच कौशल्या गायकवाड यांनी मुलीस कन्यादान म्हणून १ लाख रुपये दिले. त्यांच्याच कल्पनेतून हा १ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला आहे.

            यावेळी प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, तहसिलदार अभय चव्हाण, नायब तहसिलदार भगवान पाटील, नानेगावच्या सरपंच कौशल्या गायकवाड, माजी सरपंच यशवंत गायकवाड, मधूर दाभाडे, पत्रकार जितेंद्र गोळे, विजय वरखडे आदि उपस्थित होते.

            यावेळी अभिनेते विक्रम गोखले म्हणाले की, कोरोनाचे महाभयंकर संकट आले असताना सर्वांनी त्यात हातभार लावणे गरजेचे आहे. गरीबांसाठी साठी गरीबच जास्त मदत करत असल्याचे दिसत आहे, शहरी भागातील लोकांनीही त्यात सहभागी झाले पाहिजे. आपल्या परिवारातील कार्य, तसेच उत्सव टाळून मदतीच्या कार्यात शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून भाग घेतला पाहिजे. या विवाह सोहळ्यातील वधू वरांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जी मदत केली ती नक्कीच कौतुकास्पद आहे. त्याचंच अनुकरण इतरांनी करावं.

            सरपंच कौशल्या यशवंत गायकवाड म्हणाल्या की, या महासंकटात सावरण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. त्यात माझी भाची अक्षदा हिचा विवाह सोहळा हा मोजक्या लोकांमध्ये शासकीय नियमानुसार पार पडला. त्यातला खर्च वाचल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देऊन समजाप्रती एक ऋण व्यक्त करण्याची संधी आम्हा सर्व परिवाराला मिळाली आहे. यानुसार इतर बंधू भगिनींनीही अनुकरण करत सणवार, उत्सव, कार्यक्रम थाटामाटात न करता समाजाला मदत करावी.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here