कोरोनाला रोखण्यासाठी पिरंगुट ग्रामपंचायतीचा ‘आत्मनिर्भर पॅटर्न’

0
1129

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  कोरोना हा कदाचित या जगातून नाहीसा न होणारा विषाणूचा आजार ठरतोय की काय अशी परिस्थिती आता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे त्याचा सामना प्रत्येकाला ज्याचा त्याचा करावा लागणार आहे. पिरंगुट, ता.मुळशी ग्रामपंचायतीने हेच जाणून ‘आत्मनिर्भर’ तेकडे पाऊल टाकून कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना राबवायला सुरवात केली आहे. त्यामुळे पिरंगुट ग्रामपंचायत याबाबतीत आदर्श उदाहरण ठरली असून त्याची कार्यवाही इतर सर्व ग्रामपंचायतींनीही करणे गरजेचे आहे.

            पिरंगुट ग्रामपंचायतीच्या हद्दीत परगावाहुन आलेल्या व्यक्तिंची ग्रामपंचायत कार्यालयात माहिती देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यानुसार त्या व्यक्तिंना १४ दिवस घरीच क्वारंटाईन करण्यात येत असून त्यांची आधी जरी वैद्यकीय तपासणी केली असेल तरीही ग्रामपंचायत पुनः त्यांची वैद्यकीय तपासणी ग्रामपंचायत कार्यालयात करत आहेत. तसेच या नागरिकांनी स्वतःला १४ दिवस घरच्यांपासूनही विलगीकरण राखूनच राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेरून अनाहुतपणे येणारा कोरोनाचा विळखा रोखण्याच्या दृष्टीने ही पध्दत अतिशय योग्य व नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टिने प्रभावी ठरणार आहे.

            शासनाने टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन शिथिल करताच विविध कंपन्या, कारखाने, विविध व्यावसायिक दुकाने चालू झाली आहेत. तसेच विविध नागरीकांना त्यांच्या मुळ गावी जाण्याची मुभाही देण्यात आली आहे. त्यामुळे स्थलांतराचे मोठे प्रमाण वाढले असून अनेक नागरीक रेड झोन मधूनही आपापल्या मुळ गावी येत आहे. मुंबई, पुणे सारख्या अतिदक्षता विभागातूनही लोकं गावाला सर्रास येत आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्यास आता ग्रामीण भागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा ग्रामीण भागालाही त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच पिरंगुट ग्रामपंचायतीने उचललेले पाऊल महत्वाचे आहे.

काय आहे पिरंगुट ग्रामपंचायतीचा ‘आत्मनिर्भर पॅटर्न’

            ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र कोरोना कक्ष उभारून तेथे परगावाहून आलेल्या नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन व सूचना करण्यात येत आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ९ या वेळेत या चौकशी कक्षात ग्रामपंचायतीचे राम गोळे व राहुल जाधव यांच्याकडे माहिती संकलित करण्यात येत आहे. तसेच परगावाहून आलेल्या व्यक्तिची पुनः वैद्यकिय तपासणी डॉ. मेघना पवार यांच्याकडून ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात येत आहे. थर्मल गनने तपासणी करून तसेच इतर सविस्तर माहितीही कार्यालयातील संगणकावर नोंदली जात आहे.

            परगावावरून आलेल्या व्यक्तिच्या घराच्या दरवाजावर क्वॉरन्टाईन पत्र लावण्यात येणार आहे. त्या व्यक्तिस व त्याच्या कुटूंबियांनाही १४ दिवस कोणालाच भेटता येणार नाही. तसेच क्वॉरन्टाईन व्यक्ती १४ दिवसात गावात फिरल्यास किंवा आढळून आल्यास जागरूक नागरिकांनी ग्रामपंचायतकडे अथवा पोलिस स्टेशनला पुराव्यासह तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तिवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. क्वॉरन्टाईन व्यक्तीस आरोग्य सेतू डाऊनलोड करुन घेण्याचे बंधन राहणार आहे. परगावाहून आलेल्या व्यक्तीच्या खाजगी वाहनाला ग्रामपंचायत कार्यालय येथे निर्जंतुकीकरण करुन घेण्याचे बंधन राहनार आहे. संबंधित व्यक्तीस क्वॉरन्टाईनचे (विलगीकरणाचे) पत्र देण्यात येईल व ते मुख्य दरवाज्यावर लावण्याचे बंधन राहिल. पुढील काळात आजाराची लक्षणे आढळल्यास त्यांनी तत्काळ संपर्क करणे अपेक्षित असल्याचे ग्रामपंचायतने म्हटले आहे.

एकमेका साह्य करु, अवघे धरु आरोग्याचा सुपंथ

            याप्रकारे क्वॉरन्टाईन कुंटुंब व आजुबाजुचे रहिवाशी यांनी काळजी घेतल्यास कोणाच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही व गावामध्ये घबराटीचे वातावरण राहणार नाही. त्यामुळे ज्यांच्या कोणाच्या आजू-बाजुला परगावाहुन व्यक्ति आल्या असतील त्या लोकांनीही जागरूकपणे ग्रामपंचायतीला कळवले पाहिजे. कारण एकमेकांनीच आता स्वतःच्या व गावच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर आणि तरंच कोरोनाला हद्दपार करता येऊ शकतं. एकमेका साह्य केल्यानेच आरोग्याचा सुपंथ धरता येणार आहे.

            बाहेरून आलेल्या नागरिकांच्या तपासणीवेळी सरपंच चांगदेव पवळे, ग्रामविकास अधिकारी भोजने, मा.उपसरपंच रामदास गोळे, महादेव गोळे, डॉ.मेघना पवार, श्री शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पवळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवळे, विकास पवळे आदि उपस्थित होते.

पिरंगुट ग्रामपंचायतीचा हेल्पलाईन संपर्क क्रमांक 7083664766

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here