पोलीस पाटील जबाबदारीच्या तुलनेत शासन दरबारी उपेक्षित…

0
2649

पौड  :  संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूजन्य रोगाने आपले उग्र रूप धारण केले आहे. शासनाकडून या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. शहरी भागात रोजगारासाठी गेलेली अनेक कुटुंब आता कोरोनाच्या  दहशतीने ग्रामीण भागात आपल्या मूळ गावी आली आहेत. त्यामुळे गाव पातळीवर काम करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात जबाबदारी व ताण निर्माण झालेला आहे‌. यामध्ये खरी कसोटी गावपातळीवर काम करणाऱ्या पोलीस पाटील यांचीच आहे.

            कोरोना संदर्भात गावातील बाहेरून आलेल्या लोकांची माहिती गोळा करणे, त्यांना आरोग्यविषयक सुविधा बाबत माहिती देऊन तपासणी करून घेणे. तसेच आणखीन इतर घडामोडी ज्या गावात घडत आहेत त्यांची इत्थंभूत माहिती पोलीस पाटील यांना घ्यावी लागत आहे. अनेक गावे क्षेत्रफळाने प्रचंड मोठी असून त्या तुलनेने प्रशासकीय यंत्रणेचा पडणारा ताण हा आणखीनच मोठा आहे. वास्तविक पाहता कोरोनाच्या विरोधात असणारा ग्रामीण भागातील हा लढा पोलीस पाटील यांच्या पासून सुरु होतो. गावातील वाड्या-वस्त्या, प्रत्येक घर, कुटुंब ते उंबऱ्यापर्यंत यांना लक्ष द्यावे लागते.

            मुळशी तालुक्याचा विचार करता १४२ महसुली गावं, ९५ ग्रामपंचायती, तर १०१ च्या आसपास पोलीस पाटील असुन यामध्ये अनेक पोलीस पाटील या महिला आहेत. तरिही त्या प्रशासनाच्या इतर घटकांसोबत खांद्याला खांदा लावून कोरोनाशी दोन हात करताना दिसत आहेत. मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये असलेल्या दुर्गम गावांमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रशासन पोहचत नसल्याने खूप समस्यांना पोलीस पाटलांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये पोलीस पाटलांना बऱ्याच वेळा ग्रामस्थांचा विरोध सहन करावा लागत आहे‌.

            आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन आदेशाची अंमलबजावणी करताना, मुळशी तालुक्यातील गावोगावच्या सर्व यात्रा-जत्रा, उरूस रद्द करण्यासाठी पोलीस पाटलांनी ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन करून रद्द केले आहेत. मंदिर,  मस्जिद, चर्च आदी धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद करण्यासाठी पोलीस पाटलांनी मोठी तत्परता दाखवली आहे. त्याचप्रमाणे लग्न, वास्तुशांती बाबत सर्व ग्रामस्थांना शक्यतो ते घरच्यांच्या उपस्थितीमध्ये करण्याच्या सूचना देऊन त्यांनी शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात योगदान दिले आहे.

            शासनाकडून ग्रामस्तरावर कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती यांच्यासह पोलीस पाटील यांची समिती नेमलेली आहे. या सर्व घटकांची तुलना करताना गावातील कायदा, शांतता व सुव्यवस्था ची जबाबदारी असणाऱ्या पोलीस पाटील यांच्यावर आणखीनच जास्त जबाबदाऱ्या पडत आहेत. अत्यल्प मानधनात काम करणारे आणि सर्वात जास्त अपेक्षा याच पोलीस पाटील यांच्याकडून नागरिकांना व शासनाला आहेत. गावपातळीवर काम करताना स्थानिक रोष घेऊन पोलीस पाटलांना काम करावे लागते.

            पोलीस पाटील गाव पातळीवर थेट जनतेत जाऊन काम करतो. परंतु त्यांना चांगल्या दर्जाचा मास्क हात देण्यासाठी कुठलेही साहित्य पुरवठा केला गेलेला नाही. तरी शासनाने पोलीस पाटील यांचा आरोग्य विमा तत्काळ घोषित करावा. मुळातच पोलीस पाटील यांना कमी मानधन मिळत आहे, ग्रामीण भागात काम करणे सोपे नसल्यामुळे तीन महिन्याचे अतिरिक्त वेतन घोषित करावं, हे अपेक्षित आहे.

            पोलीस पाटलांच्या व्यथा मायबाप सरकार ऐकेल का? शासन दरबारी पोलीस पाटलांचं महत्वं अधोरेखित होऊन त्यांना न्याय व योग्य मोबदला व सोयीसुविधा मिळतील का? ग्रामीण जनता आणि प्रशासनाची नाळ जोडणारा पोलीस पाटील समाधानी होईल का? याचं उत्तर लवकरात लवकर मिळो हीच अपेक्षा…!!

रामदास मानकर पाटील

पोलीस पाटील – वातुंडे, तालुका मुळशी, जि.पुणे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here