कोरोना मुळशीच्या वेशीवर? चोरपावलांनी करू शकतो प्रवेश!

0
2907

विजय वरखडे, संपादक

स्वराज्यनामा ऑनलाईन : मुळशी तालुका कोरोनामुक्त झाल्याचा आनंद नक्कीच आहे. तो तसाच टिकावा यासाठी सर्वच मुळशीकरांचं योगदान हवं आहे. मात्र मुळशीकरांची बेफिकीरी याला सुरूंग लावू शकते. त्यामुळे नियमाची पायमल्ली करत स्वतःला हुशार आणि चाणाक्ष समजणारे, प्रतिबंधित क्षेत्रात किंवा क्षेत्रातून मुळशीत लिलया संचार करणारे नागरिकच याला जबाबदार ठरू शकतात. त्यामुळे समस्त मुळशीकर नागरिकांनो आता तुम्हीच ठरवा, कोरोनाला मुळशीच्या वेशीच्या बाहेरच रोखायचे आहे की आतमध्ये येऊन द्यायचे आहे ?

            प्रशासन जीव ओरडून सांगतंय की घराच्या बाहेर पडू नका, अतिशय महत्वाचं काम असेल तरच बाहेर पडा. विनाकारण घराबाहेर पडू नका. याचं जवळपास सर्वच नागरिक काटेकोरपणे पालन करत आहेत. मात्र काही नागरिक अक्कल हुशारीने नियंमांचा दाखला देत प्रतिबंधित क्षेत्रात, त्याच्या जवळ किंवा त्या आणि त्याच्या जवळच्या क्षेत्रातून मुळशी तालुक्यात संचार करत आहेत. अशा नागरिकांना पोलिस प्रशासन तरी कसे रोखणार हा प्रश्नच आहे. मात्र यावर एक उपाय आहे, तो बातमीच्या उत्तरार्धात पहा.

काय आहेत पळवाटा, कसे काय नागरिक प्रतिबंधित क्षेत्रात संचार करत आहेत…?

            देशात व राज्यात सर्वत्र कडक लॉकडाऊन चालू आहे. मात्र यातून काही गोष्टिंना सूट देण्यात आली आहे. त्या म्हणजे अत्यावश्यक सेवा–वैद्यकीय क्षेत्र, मेडीकल्स, किराणा, भाजीपाला, दूध, पोलिस व प्रशासन, पत्रकार–मिडीया यांनाही सुट देण्यात आली आहे. मग वैद्यकीय सेवा आणि क्षेत्र, पोलिस व प्रशासन हे सोडले तर बाकीच्या क्षेत्रात आपल्याला सामावून किंवा त्या क्षेत्रातली लोकं प्रशासनाकडून मंजूरी घेऊन प्रतिबंधित क्षेत्रात किंवा त्याच्या जवळच्या क्षेत्रात प्रवेश करत आहेत.

            यासाठी सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे भाजीपाला विकणे, किराणा मालासाठी व्यापारी पुण्यात जाणे हे असून हे सहज शक्य आहे. अत्यावश्यक म्हणत भाजीपाला वाहतुक करत पुण्यातही जाणारी मंडळी हळूहळू तयार होऊ लागलेत. आणि किराणा आणायच्या नावाखालीही बर्‍याच मंडळींची हॉटस्पॉट असलेल्या पुणे शहरात ये-जा आहे. मग त्यामुळे प्रश्न असा पडतो, लॉकडाऊन कशासाठी आहे. 10 लोकं इकडे तिकडे फिरली काय आणि हजार लोकं इकडे तिकडे फिरली काय, विषाणू कसाही पसरणारच. फक्त तो थोडासा हळू पसरणार, हाच तो काय लॉकडाऊनचा फायदा, बाकी व्यर्थ.

कधीच नाही विकली भाजी, लॉकडाऊनमध्ये मात्र व्यवसायात आमचीच बाजी !

            आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या महाशयांनी कधीच भाजी विकली नाही, असे बहाद्दरही आता या व्यवसायात उतरले आहेत. त्यामुळे अशा नव जोशातील व्यावसायिकांना मात्र मोठा हुरूप आलेला दिसतोय. अख्खं जग घरात बसलंय, सगळ्यांचे रोजगार बुडालेत. कित्येकांना एक रुपयाचाही इनकम मिळेना. मग हे नव भाजी व्यावसायिक मोठ्या जोमाने आणि दिमाखात फार मोठ्या तोर्‍यात प्रशासनाकडून परवानगी मिळवत भाजीपाला विकण्यासाठी पुण्यातील सोसायट्या गाठत आहेत.

            एकतर हे लोकं स्वतःच्या शेतातील उत्पादन, जे पुर्वी थेट मार्केटयार्डात विकले जायचे ते आता स्वतः विकत आहेत. आणि काही तर शेतकर्यांकडून स्वस्तात घेऊन दुसरीकडे विकत आहेत. त्यामुळे अनाहुतपणे कोरोनाला आमंत्रण मिळत आहे.

काय करता येऊ शकतात उपाय, प्रशासन करू शकते का ही कारवाई?

            अनाहुतपणे कोरोनाला आमंत्रण देणार्‍या अशा भाजी विकणार्‍यांवर बंधनं घालणं प्रशासनाचं काम आहे. कारण हे जर प्रतिबंधित क्षेत्रात किंवा त्याच्या आसपास व्यवसाय करत असतील तर ते नकळतपणे कोरोना विषाणूचे वाहक बनू शकतात. म्हणजे लॉकडाऊन वर पाणी फिरवण्यासारखेच आहे. यांना जर खुपच हौस असेल प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन भाजी विकायची तर यांना विशेष अशा रंगाचा पास द्यावा. यांनी शेतातून थेट प्रतिबंधित क्षेत्रात जावे, तिथून पुन्हा थेट घरी यावे. त्याने व त्याच्या कुटूंबानेही गावातील इतर कोणासही भेटू नये. गावातील लोकांनीच त्यांच्यापासून योग्य सोशल डिस्टंस ठेवावे. तसेच किराणा दुकानदार जे पुण्यात किराणासाठी जात असतील त्यांनीही सॅनिटायझर तसेच योग्य सुरक्षा यंत्रणा वापरून अधीमधी कुठेही न थांबता प्रवास करावा. जिथे माल घेणार आहे तिथे सुरक्षा योजना कटाक्षाने वापराव्यात.

मुळशीकरांचं काय योगदान महत्वाचं ठरू शकतं ?

            मुळशीकरांनो तुम्हाला कोरोनाला लवकर हरवायचं असेल तर तुम्ही या गोष्टी कराच. प्रत्येक गावात ऑनलाईन दक्षता कमिटी नेमा. गावातील अत्यावश्यक सेवेत काम करणारांची माहिती नमूद करा आणि ती सार्वजनिक करा. कारण एखादा बाहेर जात असेल आणि त्याचं नाव यादीत नसेल तर त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी न कचरता ते सांगावेत. तसेच जे लोकं अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जातात, त्यांची रोज माहिती घ्या. जमले तर त्यांचं तापमानही मोजत जा.

            जे लोकं अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडतात, त्यांना एक वही सोबत ठेवायला सांगा. ते रोज कोणाकोणाला भेटले, किंवा किमान त्या व्यक्तिंचे फोन नंबर आणि जमलं तर नावही लिहून ठेवण्यास प्रवृत्त करा. शक्यतो यांना मध्ये सोशल डिस्टंसिंगचं काटेकोरपणे पालन करायला सांगा. कमीतकमी 6 फुट किंवा 2 मीटर अंतरावरून सर्वांशी यांनी संपर्कात या. शक्यतो यांनी आणि त्यांच्या घरच्यांनीही होम क्वारंटाईन रहा.

            जर या गोष्टि पुढील काही आठवडे किंवा एखाद दोन महिने असे केल्यास कोरोनाला मुळशीत येण्यापासून आपण वाचवू शकतो. विनाकारण मुळशीतून बाहेर फिरणारांनाही चाप लागेल. जे बाहेर जातात, त्यांना कामाचा तपशीलही दक्षता कमिटीस दिला तर योग्यच होईल. असा स्वसंरक्षणात्मक दक्षतेचा पॅटर्न मुळशीतील प्रत्येक ग्रामपंचायतने पाळल्यास मुळशीकर कोरोनाला हरवू शकतील, हे नक्कीच.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here