मुळशीतील २ शेतकऱ्यांची दानत, लाखोंचे भाडे माफ करून केला आदर्श निर्माण

0
4311

कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटातही या शेतकऱ्यांच्या कृतीने मिळाली दिलासादायक बातमी

स्वराज्यनामा ऑनलाईन :   कोरोनाचा कहर जगावर उमटला असताना इथला प्रत्येक घटक मोठ्या धैर्याने या संकटाचा सामना करत आहे. अनंत अडचणी प्रत्येकाच्याच आहेत, मात्र तरीही माणूसकीला जागणार्या आणि स्वहितापेक्षा समोरच्याच्या हिताचा विचार करणारी माणसेही तशी दुर्मिळच आहेत. मुळशी तालुक्यातील भुकूम गावच्या मोहन करंजावणे व शंकर मारुती भरतवंश या दोन शेतकऱ्यांनी तब्बल लाखोंचे भाडे माफ करत दातृत्वाचे मोठे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. ही दानत फक्त शेतकरीच दाखवू शकतो, हे यातून सिद्ध झाले आहे.

संपूर्ण इमारतीतल्या भाडेकरूंचे भाडे माफ, मोहन करंजावणे यांचे दातृत्व

            थोडथोडके नव्हे तर संपुर्ण महिन्याचे तेही तब्बल ७५ कुटूंबांचे जवळपास २ लाखांच्या वर असणारे घरभाडे माफ करणारे भुकूम, ता.मुळशी येथील मोहन करंजावणे हे व्यवसायाने शेतकरी आहेत. ते येथील तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष असून त्यांची पिरंगुट जवळील लवळे फाटा येथे स्वतःची ईमारत आहे. येथे बाहेरील जिल्ह्यातील अनेक कामगार व नोकरदार वर्ग राहतो.

            लॉकडाऊनमुळे सर्वांच्याच रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला. मायबाप सरकार मात्र गोरगरीबांना मोठ्या सवलतीत अन्नधान्य पोहोचवण्याचा प्रयत्न करतंय. पण कामं ठप्प झाल्याने सर्वांना पगार मात्र मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे करंजावणे यांनी आपल्या भाडेकरूंना एक महिन्याचे भाडे माफ करत या समाजाचे काही देणे लागतो, ते पुर्ण करायचा प्रयत्नं मात्र नक्कीच केला आहे.

गाळेधारकांचे भाडे पुर्ण लॉकडाऊनपर्यंत माफ करणारे शंकर मारूती भरतवंश

            भुकूम येथीलच शंकर मारुती भरतवंश यांनी त्यांच्या गाळेधारकांचे लॉकडाऊन असे पर्यंतचे कोणतेही भाडे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. लाखाच्या वर भाडे माफ करून आपल्या माणुसकीचा सिद्धांत खरा करून दाखवला आहे. लॉकडाऊन मध्ये ना कोणता व्यवसाय चालवता येत ना कोणी खरेदीसाठी येत. त्यामुळे छोट्या छोट्या दुकानदारांचे १०० टक्के नुकसान होत आहे. वर भाडेही द्यावे लागणार असल्याने मोठी आपत्ती त्यांच्यावर आली आहे. ही आपत्ती सावरण्याकरीता आपल्या मालकीच्या गाळ्यांचे भाडे माफ करणारे भरतवंश शेतकरी या भारतवर्षात देखील आदर्शच ठरतात.

            या दोघांचा आदर्श घेत सध्याच्या वातावरणात समाजात जागा मालकांनी, फ्लॅट मालकांनी किंवा गाळा मालकांनी अशा अशाप्रकारे जर सवलत दिली तर सर्वच सर्वसामान्य नागरिकांना दिलासादायक असे वातावरण होईल. या आपत्तीमधून सावरायला मोठी मदत होईल. करंजावणे व भरतवंश या दोघांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

शेतकरीच दाखवू शकतो अशी दानत… आहे का दुसरं कोणी?

            शेतकरी स्वतः कितीही कष्ट करत असला, रात्रंदिवस राबून, लाखोंचा खर्च करून, घाम घाळून त्याच्या शेतात पिकवत असला तरी तो त्याची दानत कधीच सोडत नाही. पाऊस पडो वा न पडो, शेतकऱ्याला फायदा होवो ना होवो, तो त्याची माणुसकी त्याच्या बांधावर जाणाऱ्याला दाखवतोच. त्याला तो कधीच खाली हात जाऊ देत नाही. त्याच्या सोबतीला तो शेतातील भाजीपाला, काहीही असेल तो ते नक्कीच देत असतो. सुगीच्या दिवसातही तो आप्तस्वकीयांना स्वतःहुन शेतातील पिक आवर्जुन देत असतो. शेताजवळून जाणारा ओळखीचा कोणीही दिसला की, त्यालाही हाक मारून स्वतःहून शेतातलं पिक देत असतो.

            हा असा जगातला एकमेव व्यापारी अर्थात उत्पादक असावा की जो एवढ्या प्रतिकूल परिस्थितही दानत मात्र राखून ठेवतो. भुकूम, ता.मुळशी येथील करंजावणे व भरतवंश या दोन शेतकऱ्यांनी हीच दानत जपत एक सध्याच्या परिस्थितीवर एक आशेचा दिशादर्शक मार्ग दाखवून दिला आहे. त्यावर चालणे हे आता ज्याच्या त्याच्या विचारांवर अवलंबून असले तरी माणुसकीसाठी ते आवश्यकच आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here