खारावडे परिसरातील ३०० कामगारांना अन्न धान्य व फळांचे वाटप

0
340

तहसिलदारांसह मुळशीतील समाजसेवक राजकीय पदाधिकार्यांचा सहभाग

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  लॉकडाऊनच्या महाभयंकर परिस्थितीतही गरजवंतांना मदतीचा हात देऊन आपले दातृत्वही हे समाजसेवक दाखवून देत आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी मुळशी तालुक्यातील उरावडे ते खारावडे खोर्यातील स्थित परराज्यातील व स्थानिक मजूर अशा ३०० कामगार लोकांना योग्य ती काळजी घेवून व सुरक्षित अंतर ठेवून अन्न धान्याची पाकिटे व फळाचे वाटप करण्यात आले आहे.

            कोरोनाचे हे झंझावते वादळ वेगाने वाढत असले तरीही याचे रूपांतर चक्रीवादळात होऊ नये यासाठी प्रशासन व सर्व नागरिक सर्वतोपरी आटोकाट प्रयत्न करत आहेत. कोरोनाचे हे वादळ शमवण्यासाठी शासनाने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला असतानाच कलियुगातील जनतेचे हरण होऊ न देता कोरोना नावाच्या या महाभयंकर राक्षसाचा वध करण्यासाठी लक्ष्मणरेषा आखून दिली. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या घराची लक्ष्मणरेषा ओलांडू नये असे आवाहन शासनाने जनतेला केले असले तरीही या मागासवर्गीय, भटक्या जाती जमातीतील मजूर यांनी त्यांची भूक शमवावी कशी? असा गहन प्रश्न या गोरगरीबांना भेडसावत असतानाच अन्नछत्राची शिदोरी घेऊन बरेच पुढारी, जनसेवक, समाजसेवक, हितचिंतक मदतीचा हात घेऊन पुढे आले.  

            अन्न, वस्त्र व निवारा या मनुष्याच्या मूलभूत गरजा आहेत व मजूरांची रोजी-रोटी ठप्प झाल्याने या गोरगरीब, गरजू लोकांच्या मूलभूत गरजा तरी भागल्या पाहिजेत या निरपेक्ष भावनेनेच मुळशीतील कार्यकर्त्यांनी मदत देण्याचे सेवाभावी काम चालू ठेवले आहे.

            मुळशी तालुक्याचे तहसिलदार अभय चव्हाण, मुळशीचे भाजपाचे कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल, माजी आदर्श सरपंच निलेश दगडे, कॉंग्रेसचे युवा नेते मधुर दाभाडे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष अमोल शिंदे, माजी सभापती महादेवराव कोंढरे, युवा नेते सुहास दगडे, सकाळचे पत्रकार बंडू दातीर व मित्रपरिवार यांच्या तर्फे वातुंडे, भोंडे, जातेडे, भरेकर वस्ती, आंदगाव, कोंढुर, कातकरी वस्ती आदी गावातील अत्यंत गोरगरीब व गरजू अशा परप्रांतीय, परराज्यातील व स्थानिक मजूर अशा 300 कामगार लोकांना हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य ती काळजी घेवून व सुरक्षित अंतर ठेवून अन्न धान्याची पाकिटे व फळाचे वाटप करण्यात आले. कोरोनाचे वादळ जरी अद्याप शमले नसले तरी या अन्नछत्राच्या वाटपाने गोरगरीबांची भूक शमवणारे हे हात नक्कीच देवदूत ठरत आहेत.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here