गरजूंसाठी ‘एक हात मदतीचा’ उपक्रमातून पिरंगुट ग्रामपंचायतीचा ३०० कुटूंबांना आधार

0
487

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  कोरोनाचा सामना करण्यासाठी लॅाकडाऊन सुरू आहे. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन पिरंगुट, ता.मुळशी येथील ग्रामपंचायत व पिरंगुट व्यापारी महासंघ यांच्या पुढाकाराने परिसरातील अतिशय गरजू असलेल्या ३०० कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे या कुटूंबांना मोठा आधार मिळाला आहे.

            प्रत्येकी पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ,  एक किलो तूर डाळ, एक किलो गोडेतेल, एक किलो साखर, अर्धा किलो मीठ, चहा पावडर, दोन साबण तसेच अन्य खाद्य पदार्थ वाटप करताना गावातील प्रत्येक वॅार्डनिहाय गरजूंचा विचार करण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वॅार्डमध्ये जाऊन अत्यंत गरजू असून ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखिची आहे, त्यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन राहिलेले नाही अशा कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे ही मदत थेट गरजू कुटुंबांनांच मिळाली आहे. विशेषतः कातकरी बांधव, रस्त्यावर काम करून पोट भरणारे, परिसरात झोपडीमध्ये राहणारी कुटूंबे, मजूर नाक्यावर उभे राहून काम मिळवणारी कुटूंबे आदींचा त्यात समावेश आहे.

            मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण, पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या हस्ते या मदतीचे वाटप करण्य़ात आले. यावेळी सरपंच चांगदेव पवळे, उपसरपंच प्रविण कुंभार, पोलीस पाटील प्रकाश पवळे, ग्रामविकास अधिकारी डी.डी.भोजने, माजी उपसरपंच रामदास गोळे, रेश्मा पवळे, छाया पवळे, अश्विनी निकटे, पिरंगुट व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य राहुल पवळे, ग्रामपंचायत सदस्य विकास पवळे, महेश वाघ, सुरेखा पवळे, सारिका गोळे, सुवर्णा नवाळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गजानन पवळे, कोतवाल संघटनेचे अध्यक्ष संतोष मंडले, वातुंडे ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल शिंदे, बावधनचे माजी सरपंच निलेश दगडे, चंद्रकांत चोरगे, मधुर दाभाडे, बजरंग गोळे, संतोष चंद्रंकात पवळे तसेच ग्रामस्थं उपस्थित होते.

            ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व गावातील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने या उपक्रमाला साथ दिल्याने मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू झाला होता. पिरंगुट परिसरातील कारखानदार, व्यापारी वर्ग, हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये, विविध संघटना तसेच तरुणांनी या मदत कार्यात मोठया प्रमाणात सहभाग घेऊन मदतीचा हात पुढे केला. आर्थिक स्वरूपात तसेच धान्य स्वरूपात अशा दोन्ही प्रकाराने मदत करण्यात आली.

          धान्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंगणवाडीमध्ये संकलन केंद्र करण्यात आले होते.  एकूण एक लाख तीस हजार रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली होती. या रकमेतून आणि संकलित केलेल्या धान्यामधून अडीचशे जीवनोपयोगी वस्तूंच्या अडीचशे पिशव्या बनविण्यात आल्या. आर्थिक रक्कम स्विकारताना ऑनलाईन, रोख तसेच चेक आदी सर्व प्रकार उपलब्ध केले होते.

            यापुढेही ही मदत चालूच राहणार असल्याने पिरंगुट व्यापारी वर्गातील किराणा दुकानदारांच्या माध्यमातून मदत म्हणून आणखी शंभर पॅकेट्स तयार करण्यात येणार असल्याचे सरपंच चांगदेव पवळे व पिरंगुट व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य राहुल पवळे यांनी सांगितले. उपसरपंच प्रवीण कुंभार यांनी सांगितले की, जास्तीत जास्त गरीब कुटूंबांना याचा फायदा कसा होईल आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये परिसरातील गोरगरिबांची रोजीरोटी कशी भागेल हा उद्देश समोर ठेवून हा उपक्रम चालूच राहणार आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here