शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुळशी तालुका प्राथमिक शिक्षक संघ आग्रही

0
492

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात मुळशी तालुका प्राथमिक शिक्षक संघ आग्रही झाला आहे. ठोस मार्ग निघावा यासाठी नुकतीच तालुका प्राथमिक शिक्षक संघाने मुळशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार व विस्ताराधिकारी सुदाम वाळुंज साहेब यांची सखोल मुलाखत घेतली. यामध्ये शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे.

            शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष शहाजी मारणे यांनी प्रलंबित देयके, जिल्हा परिषद भविष्य निर्वाह निधीतील अनागोंदी, प्रलंबित सेवा पुस्तक नोंदी, विलंबाने होणारे मासिक वेतन, लिपिकांची कार्यपद्धती आदी प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर गटविकास अधिकारी जठार यांनी शिक्षकांची सर्व देयके मार्चमध्ये काढण्यात येतील असे आश्वासन दिले. तर भविष्य निर्वाह निधीतील चुकांबाबत संबंधित लिपिकांना धारेवर धरले जाईल. सेवापुस्तकातील नोंदी अद्ययावत करण्यासाठी पुढील दोन आठवड्यात कॅम्प लावले जातील असे सांगितले.

            त्याचप्रमाणे शिक्षण विभागातील प्रत्येक प्रत्येक लिपिकाने त्यांच्या कामाचा जॉब चार्ट त्यांच्या आसनाच्या पाठीमागे भिंतीवर लावावा, अशा सूचना दिल्या. तसेच सेवा हमी कायद्यानुसार रजा या सात दिवसांत मंजूर केल्याच पाहिजेत असे सांगितले. तसेच पर्यवेक्षण यंत्रणेने शाळांना भेटी देऊन शिक्षकांना मार्गदर्शन करावे व गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले, शिक्षकांचे वेतन हे वेळेवरच झाले पाहिजे. वेतनाच्या विलंबास कारणीभूत घटकांवर कारवाई केली जाईल असेही स्पष्ट केले. यावर्षी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील शिक्षकांनी चांगल्या प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे यावर्षी आपल्या तालुक्याला भरघोस यश मिळेल अशा अशा व्यक्त केल्या.             

            मुळशी जत्रा उपक्रमात शिक्षकांनी हिरिरीने सहभाग घ्यावा असेही सांगितले. शिक्षकांच्या एकंदरीत कामाबद्दल गटविकास अधिकारी जठार यांनी समाधान व्यक्त केले. मुळशी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस संतोष गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी गटविकास अधिकारी संदीप जठार, विस्ताराधिकारी सुदाम वाळुंज, मुळशी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शहाजी मारणे, कार्याध्यक्ष विजय भरम, सरचिटणीस संतोष गावडे, कोषाध्यक्ष विपिन निकम, कक्ष अधिकारी संगिता करंजकर, लिपिक सुवर्णा धोत्रे, शिवाजी चवले, पल्लवी गायकवाड, राजेंद्र भरम, रियाज शेख आदि मान्‍यवर उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here