पिरंगुटच्या जगदीश्वर मंदिराच्या खोदकामात मिळाली शिवकालीन नाणी

1
1703

स्वराज्यनामा ऑनलाईन  :   पिरंगुट, ता.मुळशी येथील सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची समाधी व जगदीश्वर मंदिर यांच्या संवर्धनाच्या कामात शिवकालीन तांब्याची नाणी सापडली आहेत. ही नाणी इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यासक डॉ नंदकिशोर मते यांच्यामार्फत डेक्कन कॉलेजच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहेत. त्यातील एक शिवराई व एक बहामनी कालीन असल्याचे प्रथमदर्शनी जाणवले आहे.

            स्वराज्याचे सरनौबत पिलाजीराव गोळे यांच्या ऐतिहासिक पराक्रमाला अनुसरून पिरंगुट, ता.मुळशी येथे त्यांची ऐतिहासिक समाधी आहे. समाधीस्थळाच्या संवर्धनासाठी खोदकाम करताना विठ्ठल गोळे यांना जमिनीखाली चार नाणी मिळाली. ती त्यांनी नंदू गोळे यांच्यामार्फत इतिहास संशोधक व दुर्ग अभ्यासक अ‍ॅड.मारुती गोळे यांच्याकडे सुपूर्त केली. अ‍ॅड.गोळे यांनी त्यातील एक नाणे शिवराई असल्याचे सांगितले होते.

            त्यानंतर ही नाणी इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यासक डॉ.नंदकिशोर मते यांच्यामार्फत डेक्कन कॉलेजच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आली. डॉ.सचिन जोशी यांनी या नाण्यांना शास्त्रीय पद्धतीने साफ करुन त्यांचा अभ्यास केला. त्या चार नाण्यांपैकी एक नाणे हे शिवराई आहे. दुसऱ्या नाण्यावर पुसटसा फार्सी मजकूर आहे. हे नाणे बहामनी काळातील असावे, असे म्हटले जातेय. शिवराईच्या नाण्यावर एका बाजुला पहिल्या ओळीत श्री,  दुसर्‍या ओळीत राजा, तिसर्‍या ओळीत शिव तर दुसर्‍या बाजुला पहिल्या ओळीत छत्र व दुसर्‍या ओळीत पति असा उल्लेख आहे.

            याबाबत डॉ.जोशी यांनी सांगितले की, शिवराईचे हे नाणे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकापासून चलनात आले आणि पुढे ते १९ व्या शतकापर्यंत वापरले जात होते. ब्रिटीशांना हे नाणे चलनातून रद्द करण्यासाठी मोठे कष्ट झेलावे लागले होते. रायगडवरील उत्खननात अशी नाणी मिळालेली आहेत.

            डॉ.नंदकिशोर मते यांच्या म्हणण्यानुसार सुरत लूट करून राजगडाकडे जाताना शिवाजी महाराजांनी याच जगदीश्वर मंदिरात अभिषेक केला होता. त्यामुळे ही नाणी फार महत्त्वाची आहेत. तसेच येथील परिसर व जगदीश्वर मंदिराचा अधिक अभ्यास होणेही गरजेचे आहे. शिवराई हे तांब्याचं नाणं अजूनही बर्‍याच ऐतिहासिक ठिकाणी सापडते. सिंहगडावरही ते मिळाले होते.

            ज्या ज्या प्रदेशात जी जी राजवट होती, त्या त्या ठिकाणी त्या राजवटीची नाणी जमिनीत मिळण्याची दाट शक्यता असते. याशिवाय व्यापारानिमित्त काही नाण्यांची देवाणघेवाण होऊन एक ठिकाणची नाणी दुसर्‍या ठिकाणीही मिळू शकतात. काही नाणी राजवटी संपल्या तरी तत्कालीन लोकांकडे पाहायला मिळतात. त्यादृष्टीने पिरंगुट येथील सापडलेली नाणी ही सरनौबत पिलाजीराव गोळे यांच्या पराक्रमाला उजाळा देणारी आहेत.  

            इतिहास संशोधक अशोक सरपाटील म्हणाले, ४ फेब्रुवारी १६६४ ला सुरत लूट करून लोहगडाकडे जलद गतीने जाताना त्यांना छत्रपती शहाजीराजेंच्या निधनाची वार्ता समजली. तेव्हा आई जिजाऊ सती जाणार होत्या. शिवाजी राजांनी पिरंगुट येथील जगदीश्वर मंदिरात अभिषेक घालून जिजाऊ सती जाऊ नये, यासाठी जगदीश्वराला साकडे घातले होते. हेच मंदिर पुढे २५ एप्रिल १६६५ ते ५ मे १६६५ च्या दरम्यान मिर्झाराजे यांच्या दाऊदखान, कुतूबुद्धिनखान व लोधीखान या तीन सरदारांनी पाडले.

            अ‍ॅड.मारुती गोळे म्हणाले, जगदीश्वर मंदिर अन समाधीस्थळ पूर्ण झाल्यावर या ठिकाणी सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे स्मारक व संग्रहालय होणार आहे यात ही अतिप्राचीन नाणी ठेवणार आहे.

पिरंगुट, ता.मुळशी, जि.पुणे येथील ऐतिहासिक जगदीश्वर मंदिर

ही बातमी शेअर करा :

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here