मुळशी सभापतीपदी पांडुरंग ओझरकर तर उपसभापती पदी विजय केदारी बिनविरोध

0
965

मुळशीच्या सभापती पदी निवड झाल्यानंतर निवडीचे पत्र स्विकारताना पांडूरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी व मान्यवर.

स्वराज्यनामा ऑनलाईन  :   मुळशी पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादीचे पांडुरंग ओझरकर आणि उपसभापती पदी लवळे गावचे विजय केदारी यांची निवड झाली आहे. आधी उपसभापती असलेले पांडूरंग ओझरकर आता सभापती पदी विराजमान झाल्याने कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष पौड, ता.मुळशी येथे पहायला मिळाला. तर शिवसनेच्या विजय केदारी यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून उपसभापती पदाची माळ गळ्यात पाडून घेतली.

              यावेळी झालेल्या सत्कार समारंभास ज्येष्ठ नेते रामचंद्र ठोंबरे, जिल्हा परिषद पुणे मा.सभापती मंगलदास बांदल, बाळासाहेब सणस, राजाभाऊ हगवणे, माजी सभापती बाबा कंधारे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, बाळासाहेब सणस, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, अंजलीताई कांबळे, माजी सभापती व पंचायत समिती सदस्य राधिका कोंढरे, कोमल वाशिवले, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अंकुश मोरे, माजी गटनेते शांताराम इंगवले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अमराळे, दगडूकाका करंजावणे, सुनिल चांदेरे, योगेश ठोंबरे, विलास अमराळे आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

              मुळशी पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. 6 पैकी 4 सदस्य राष्ट्रवादीचे तर 2 सदस्य शिवसेनेचे होते. 6 पैकी 3 महिला तर 3 पुरूष सदस्य आहेत. याआधी सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला पदासाठी असल्याने राष्ट्रवादीच्या कोमल वाशिवले, कोमल साखरे आणि राधिका कोंढरे यांना सभापती पदाचा मान मिळाला होता. तर अडीच वर्ष ओझरकर उपसभापती होते. आताचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी पडल्याने ओझरकरांचीच सभापती पदी वर्णी लागणार हे निश्चितच झाले होते. फक्त उपसभापती पदाची चुरस होणार होती.

              शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले विजय केदारी यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. मात्र त्यांना उपसभापती पद देण्यावरून राष्ट्रवादीत एकमत होत नव्हते. तरी त्यांना उपसभापती पदी विराजमान करण्यात शेवटी राष्ट्रवादी पक्षातून हिरवा कंदील मिळाला. सभापती पदासाठी ओझरकर आणि उपसभापती पदासाठी केदारी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांनी दोघांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. या निवडीवेळी राष्ट्रवादीच्या सदस्यांसह सेनेचे सचिन साठे उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्यावतीने दोघांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची मोठी उधळण झाली.

              पाडुरंग ओझरकर यांनी आयटीनगरीतील आयटी व्हिलेज माण गावचे माजी उपसरपंच म्हणून काम केले आहे. आयटीनगरीला त्यांच्या रुपाने सभापती मिळाला आहे. जगात प्रसिद्ध असलेल्या माण गावाला प्रथमच सभापतीपदाची संधी मिळाली आहे. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवकच्या तालुका अध्यक्षपदावरही काम केले आहे. तर माजी सभापती (कै.) पांडूरंग राऊत आणि (कै.) माऊली सातव यांच्यानंतर बावीस वर्षाने लवळे गावाला उपसभापतीपदाचा मान मिळाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी इतर सदस्यांच्या सहकार्याने भरीव काम करत राहणार असल्याचे ओझरकर व केदारी यांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here