कॉंग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे येथे तोडफोड करण्यात आल्यानंतर अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू
स्वराज्यनामा ऑनलाईन : भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपदासाठी डावलल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी संतप्त होत पुण्यातील कॉंग्रेस भवन तोडफोड करून फोडले. सलग तिसर्यांदा आमदार म्हणून निर्विवाद वर्चस्व गाजवून गेले 45 वर्ष कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहणार्या थोपटे घराण्याला प्रामाणिकतेचं फळ असं मिळाल्याने कार्यकर्ते कालपासूनच अनावर झाले होते. त्याची परिणती आज कॉंग्रेस भवनच्या तोडफोडीमध्ये होण्यात झाली.
राज्यात सत्तास्थापनेनंतर महाविकास आघाडी काल मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसला उचित स्थान न दिल्याचे मेसेज काल दिवसभर वायरल होत होते. प्रणिती शिंदे व संग्राम थोपटे यांना डावलल्यामुळे हा सुर उमटत होता. तर पुणे जिल्ह्यात कॉंग्रेस जीवंत ठेवण्याचं काम ज्यांनी केलं त्या थोपटेंना असं डावलल्यामुळे भावनिक झालेले कार्यकर्ते संतप्त होत होते.
त्यामुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी काल दिवसभर राजीनामा सत्र ठेवले होते. एका कार्यकर्त्याने तर चक्क मुंडन केले होते. काहींनी पक्षाच्या पदावरील निवडीचे पत्रही फाडून फेकले होते. तर कॉंग्रेस भवन वर येऊन काहीतरी मोठं करायची कार्य़कर्त्यांची काल चर्चा चालू होती. तसेच आज भोर येथे मुळशी-भोर-वेल्हा आदि तालुक्यांच्या कॉंग्रेस पदाधिकार्यांची यासंदर्भात तातडीची बैठकही पार पडली होती. मात्र यानंतर संध्याकाळच्या सुमारास पुण्यातील शिवाजीनगर येथील कॉंग्रेस भवन कार्यकर्त्यांनी शेवटी फोडलेच. पोलिसांचा ताफाही घटनास्थळी जमा झाला आहे.
मुळशी तालुका कॉंग्रेस कमिटी बरखास्त – अध्यक्ष गंगाराम मातेरेंची माहिती.
संग्राम थोपटे यांना मंत्रीपदासाठी डावलल्याने मुळशी तालुका कॉंग्रेस कमिटीने याचा निषेध म्हणून कॉंग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मुळशी तालुका कॉंग्रेस कमिटी, युवक कॉंग्रेस व महिला कमिटी यातील सर्व पदाधिकार्यांनी राजीनामे दिले असून संग्रामदादा हाच आमचा पक्ष असल्याचे भोर-वेल्ह्यासह मुळशी तालुका कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी दाखवून दिले आहे. या सर्व कमिट्या बरखास्त केल्याची माहिती अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी दिली.