स्वराज्यनामा ऑनलाईन : आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपदावरून डावलल्यामुळे त्याचे पडसाद 203 भोर मतदारसंघात उमटले आहेत. भोर-वेल्हे-मुळशी करांचं नेतृत्वं आघाडी सरकारने डावलणार्या तसेच पुणे जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाला एकही मंत्रीपद देऊ न शकलेल्या कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा यानिमित्ताने निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राजीनामे, मुंडन, फलक जाळणे, काळ्या फिती लावणे असे वेगवेगळ्या प्रकारे निषेध चालू आहेत.
संग्राम थोपटे हे पुणे जिल्ह्यातून सलग तिसर्यांदा आमदारपदी कॉंग्रेस पक्षातून निवडून आलेले एकमेव आमदार आहेत. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे ते सुपुत्र असून पुर्ण पुणे जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाशी थोपटे घराणे एकनिष्ठ राहून पक्षाला संजीवनी देत राहण्याचं काम केलं आहे. मात्र त्याचं फळ म्हणून की काय थोपटे यांना डावलल्याची चर्चा तिन्ही तालुक्यात रंगली आहे. कार्यकर्त्यांच्या मनात मात्र तीव्र संताप उफाळला असून अनेकानेक मार्गांनी ते निषेध करत आहेत.
अनेक पदाधिकार्यांनी आपले राजीनामे दिले असून कॉंग्रेस भवन, मुंबई येथे कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलनाची तयारी चालवली असल्याची व्हॉट्स अप ग्रुपवर चर्चा रंगली आहे. थोपटे यांच्या समर्थकांनी भोर येथे कॉंग्रेस पक्षाचा निषेध लिहलेला काळा फलक जाळला आहे. तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. भोर नगरपरिषदेचे नगरसेवकही याचा निषेध करत आहेत.
वेल्हे तालुका कॉंग्रेस सरचिटणिस शंकर रेणुसे यांनी चक्क मुंडन करत कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहिर केले आहे. भोर मतदारसंघ युवक कॉंग्रेस अध्यक्ष राहुल जाधव यांनी आपल्या युवक पदाचा राजीनामा दिला आहे. भोर तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष नितिन सदाशिव दामगुडे यांनी आपल्या पद निवडीच्या पत्र फाडून निषेध केला आणि राजीनामाही दिला आहे.
अमित जांभुळकर : अध्यक्ष-मुळशी ता. कॉंग्रेस सोशल मिडीया, अभिमन्यू कोंढाळकर : सरचिटणिस – भोर युवक कॉंग्रेस, अक्षय कदम : सोशल मिडीया सेल-भोर शहर कॉंग्रेस, सिद्धार्थ कंक : अध्यक्ष – भोर तालुका विद्यार्थी कॉंग्रेस, सतिश ढेबे : उपाध्यक्ष – भोर तालुका विद्यार्थी कॉंग्रेस, मुळशी सेवादल कॉंग्रेसचे संतोष गायकवाड यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. अनेक पदाधिकारीही राजीनामे देत आहेत.
कॉंग्रेस पक्षाने संग्रामदादांना डावलणे म्हणजे पुणे जिल्हा कॉंग्रेससाठी हा निर्णय दुर्दैवी आहे. संग्राम थोपटे हे अभ्यासू आणि मंत्रीपदासाठी सक्षम ठरू शकणारे आमदार आहेत. महाराष्ट्राला एक अभ्यासू मंत्री मिळाला असता, मात्र महाराष्ट्रातील जनता अशा अभ्यासू मंत्र्यापासून मुकली आहे. उद्या तिनही तालुक्यातील पदाधिकार्यांची महत्वाची बैठक भोर तालुक्यात होत असून त्यात जो निर्णय होईल, तो आम्ही सर्व पदाधिकारी पाळणार आहोत – गंगाराम मातेरे, अध्यक्ष – मुळशी तालुका कॉंग्रेस कमिटी