पुणे-कोलाड महामार्गाचे त्रुटीयुक्त नुतनीकरण धोकादायक, गंभीर दखल गरजेची

0
1903

विजय वरखडे – संपादक

स्वराज्यनामा ऑनलाईन    :    पुणे-कोलाड राष्ट्रिय महामार्गाचे नुतनीकरण सध्या चालू आहे. मात्र यात मुळशी तालुक्यातील रस्त्यांमध्ये अनेक त्रुटी ठेवल्याने हा महामार्ग धोक्याचा बनणार आहे. त्यामुळे भविष्यकाळात अनेक प्रवाशांचे जीव टांगणीला लागणार असल्याचे दिसत आहे. तसेच त्रुटींमुळे बर्याच ठिकाणी वाहतुक खोळंबाही होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

             गेल्या १० ते १२ वर्षांपासून रूंदीकरणाची गरज असलेला पुणे-कोलाड महामार्ग आताशी कुठे नुतनीकरण करण्यास सुरवात झाली आहे. कोलाड महामार्गावरील रस्त्याचे काम गेले वर्षभरापासून जोरात सुरू आहे. मात्र मुळशीतील कामाने मागील एका महिन्यापासून वेग घेतला आहे. भुकूम गावच्या हद्दीत घाटापासून हे काम सुरू झाले असून जसजसे हे काम होऊ लागले आहे, तसतसे त्यातल्या त्रुटी मात्र समोर येऊ लागल्या आहेत. सदर रस्त्याचे काम सुरू करण्यापुर्वी सर्व्हे करणार्यांनी यात त्रुटी ठेवल्या की काम करणार्या कंपनीने या त्रुटी ठेवल्या आहेत, हे काय स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र या त्रुटींवर तोडगा तत्परतेने काढणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण याचा शोध घ्यायची वेळ येऊ शकते.

भुकूम घाटात म्हसोबा मंदिर खिंडीतला टापू न काढल्याने अवजड वाहनं येथे टाकणार जीव

             वळणावळणाचा आणि खुप मोठा असलेला पिरंगुट-भुकूम मार्गावरील घाटरस्ता प्रवासासाठी मोठा आव्हानात्मक ठरणार असल्याचे दिसत आहे. अनेक वळणं धोकादायक परिस्थितीत येथे आहेत. अनेक अपघातांचा साक्षीदार हा घाट ठरला आहे. तसेच खुपच लांब असल्याने अनेक अवजड वाहनं येथे जीव टाकणार असल्याचे दिसून येत आहे.

             घाटातील म्हसोबा मंदिराची खिंड जरा अवघड आहे. म्हसोबा मंदिराकडून भुकूमकडे येताना एक मोठा टापू या खिंडीत आहे. या टापूमुळे पिरंगुटकडून येणारी अवजड वाहनं नेहमी बंद पडत असतात. सार्वजनिक दळणवळणाची पीएमटी जुनी असेल तर ती १०० टक्के येथे बंद पडते, त्यामुळे भविष्यात वाहतुक खोळंबा होण्याची शक्यता आहे. तसेच या टापूमुळे समोरून येणार्या गाड्या लगेच दिसत नाहीत, अचानक समोर आल्यावर दिसतात. त्यामुळे अपघाताला आयते आमंत्रण दिल्यासारखे आहे. या गोष्टिंची दखल घेऊन म्हसोबा मंदिर ते टीटू पेट्रोल पंप दरम्यान असलेला हा टापू शक्य तेवढा कमी करून रस्ता सरळ करण्याची गरज आहे. यासाठी सर्व जनतेने ठामपणे शासन दरबारी हरकत घेऊन शासनाला हा बदल करण्यास भाग पाडले पाहिजे.

हाच तो पिरंगुट-भुकूम मार्गावरील वाहनांचा जीव टाकून ती बंद पाडणारा व धोकादायक ठरणारा टापू, जो त्वरित काढणे आवश्यक आहे.
हाच तो पिरंगुट-भुकूम मार्गावरील वाहनांचा जीव टाकून ती बंद पाडणारा व धोकादायक ठरणारा टापू, जो त्वरित काढणे आवश्यक आहे.

घातक वळणं तसेच ठेवल्याने ते मृत्यूचे सापळेच ठरणार

             पुणे-कोलाड महामार्गावरील चांदणी-चौक ते पौड या रस्त्यावरील घातक वळणं प्रशासनाने नुतणीकरणामध्ये आहे तशीच ठेवल्याचे दिसत आहे. त्यामुळे मृत्यूला आमंत्रण देणारे सापळे घेऊन यमराज येथे अनपेक्षितपणे उभे राहणार असल्याचे दिसत आहे. चादंणी चौकातून अंब्रोशियाकडे जाताना घाट उताराला एक घातक वळण आहे. ते आता धोकादायक नसले तरी नवीन रस्ता झाल्यावर मात्र मोठे घातक ठरणार आहे. शेजारचा डोंगर फोडून हे वळण काढता येऊ शकते. तसे करणे फारच आवश्यक आहे. त्यामुळे वाहतुक खोळंबा व अपघात टळू शकतील.

             भुगावचा मानस तलावाचा घाट रस्ता वर चढून आल्यानंतर शेल पेट्रोल पंपाकडे जाताना एक जोरदार घातक वळण लागते. हे वळण नुतन महामार्गावर असणे फारच धोकादायक असणार आहे. लागलीच हे वळण काढून सरळ रस्ता करणे गरजेचे आहे.

             कासार आंबोली गावच्या हद्दीतील गोकुळ मंगल कार्यालयाच्या अलिकडे असेच घातक वळण आहे. तेथे पुर्वी नवीन रस्ता झाल्यावर अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे नवीन रस्ता हा अपघाताचा ठरू नये यासाठी या वळणाला तिलांजली देणे आवश्यकच आहे. नाहीतर इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही.

             त्यानंतर धनवेवाडीच्या हद्दीतले एक वळण सर्वात भयंकर वळण असून त्याचा निपटारा करणे आवश्यक आहे. नाहीतर अपघातांची मोठी मालिका या ठिकाणी घडू शकते. हे वळण प्रशासन काढणार की नाही याबद्दल उलट सुलट चर्चा चालू आहेत. मात्र ते काहीही असले तरीही या वळणाला या महामार्गावरून गायब करणे ही काळाची गरज आहे. प्रशासन जर याकडे दुर्लक्ष करत असेल तर नागरीकांनी रस्त्यावर उतरूण प्रशासनाला हे वळण काढण्यास भाग पाडावेच लागेल. येथेही अनेक अपघात घडतात, त्यामुळे प्रशासनाने याची दखल घ्यावी.

घाटरस्त्यांवरील वळणेही शक्यतो कमी करावीत, नाहीतर जीवितहानी होऊ शकते

             चांदणी चौक ते लवासा रस्ता झाल्यानंतर पिरंगुट घाटात अनेक अपघात घडले होते. त्यातील बरेच अपघात हे घातक वळणामुळे घडले होते. त्यातील एक अपघात मुळशीकर व पुणेकरांच्या जीवाला चटका लावून गेला होता. राष्ट्रपती पदक विजेते अग्निशामक दलाच्या वाहनावरील चालक तुकाराम खेडेकर यांचा पिरंगुट घाटात अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला होता. तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या कार्यक्रमासाठी बंदोबस्ताला अग्निशामक वाहन घेऊन भल्या पहाटे सकाळी 6 वाजता तुकाराम खेडेकर ऑन ड्युटी निघाले होते. अग्निशामकचे वाहनच ते, ते थोडी ना हळूहळू चालणार आहे. पिरंगुट घाटातल्या एका अवघड वळणाचा अंदाज न आल्याने अग्निशामक वाहन घाटातून खाली जाऊन मोठा अपघात घडला होता.

             या आणि अशा प्रकारचे अनेक अपघात वळणांचा अंदाज न आल्याने घाटातून गाडी खाली गेल्याच्या घटना घडल्या होत्या. कामगार दीनीच एक सिमेंट कॉंक्रीट मिक्सर घाटातून खाली गेल्याने चालक कामगाराला प्राणाला मुकावे लागले होते. त्यामुळे नवीन रस्ता अपघाताला निमंत्रण देणार हे नक्की असले तरीही घातक वळणं कमी केली, काढून टाकली तर किमान अपघातांची तीव्रता आणि नुकसान किंवा जिवितहानी टाळता येऊ शकते.

छोटे ओव्हरब्रीज न केल्याने होणार वाहतुक खोळंबा, भोगावा लागणार मन:स्ताप

             चांदणी चौक-कोलाड महामार्गावर अनेक मोठी गावे आहेत. भुगाव, भुकूम, पिरंगुट, घोटवडे फाटा, कासार आंबोली, पौड, शेरे, माले, मुळशी धरण ही त्यातली महत्वाची गावं आहेत. भुगाव, भुकूम, पिरंगुट, कासार आंबोली, धनवेवाडी, विठ्ठलवाडी, पौड येथे ठिक-ठिकाणी छोटे ओव्हरब्रीज तयार करणे फारच गरजेचे आहे. जर असे नाही केले तर भविष्यातही वाहतुक खोळंबा हा फार मोठा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होणार आहे.

             भुगाव, पिरंगुट, घोटवडे फाटा, कासार आंबोली आणि पौड भागात नागरी जीवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लोकांची संख्या प्रचंड वाढल्याने वाहतुकीवर ताण येत आहे. नागरिकांना मुख्य रस्त्यापासून गावात जाण्यासाठी वळावे लागते. त्यात मागे गाड्यांची रिघ लागल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे प्रदुषण, इंधनाचा अपव्यय, वेळ वाया जाणार आहे. छोटे ओव्हरब्रीज असतील तर गावातून जाणार्या येणार्या वाहनांमुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला कोणताही ब्रेक लागणार नाही व त्यामुळे वाहतुक समस्या एवढी उद्भवणार नाही.

             एकंदरीतच राष्ट्रीय महामार्ग जर प्रवाशांच्या सुखसोयीकडे आणि वाहतुक वाढवण्यासाठी व त्यायोगे कोकणातला संपर्क, व्यवसाय-उद्योग वाढवण्यासाठी या महामार्गावरील त्रुटी तत्परतेने काढून टाकणे आवश्यक आहे. रस्ता कितीही रुंद केला आणि या त्रुटी दुर नाही केल्या तर आहे त्यापेक्षा अधिक मोठ्या वाहतुक समस्येला भविष्यात सामोरे जावे लागू शकते.

घोटवडे फाटा, लवळे फाटा येथे फ्लाय ओव्हरची गरज

             चारही दिशेने वाहनांचा मोठा भडिमार घोटवडे फाटा चौकात होत असतो. त्यामुळे अगदी १०० च काय २०० फुट रस्ता जरी या चौकात झाला तरी वाहतुक समस्या सुटणे अवघड आहे. त्यासाठी येथे पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर मोठ्या फ्लायओव्हरची नितांत गरज आहे. ज्यामुळे कोणत्याही दिशेने येणारे व जाणारे वाहन विना थांबा हा चौक पार करू शकेल. तसे झाले तर आणि तरच वाहतुकीच्या खोळंब्याचा प्रश्न मिटणार आहे.

             तसेच वाढलेल्या व्यावसायिकरणामुळे लवळे फाटा चौकही मोठं केंद्रबिंदू बनत चाललं आहे. येथे फ्लायओव्हर आणि सेवा रस्त्याची गरज निर्माण झाली आहे. त्याची निकड पुर्ण करणे हे अतिशय गरजेचे आहे.

             याव्यतिरिक्त साईड गटारं काढणे, भुगावच्या माऊंट वर्ट सोसायटीकडे जाण्यासाठी सेवा रस्ता तसेच छोटा ओव्हरब्रीज करणे. त्यायोगे पाणी रस्त्यावर न येता त्या ओव्हरब्रीजखालून वाहुन जाईल व रस्ता वाहतुकीस सुरळीत राहिल. तसेच पिरंगुट गावातील कॅंपवरचे वळण शक्य तेवढे कमी करणे व त्यामुळे मागे झालेले जीवघेणे अपघात रोखणे असे मोठे निर्णय आणि अंमलबजावणी त्वरित कृतीत आणणे अतिशय गरजेचे आहे. शेवटी हा रस्ता म्हणजे शासनाने जनेतेच्या भल्यासाठी निर्माण केलेली संपत्ती असणार आहे. मग ती निर्माण करताना जिविताला कोणताही धोका निर्माण होणार नाही अशा जास्तीत जास्त निर्धोक पध्दतीने होणे हे जास्त लाखमोलाचे आहे.

आमचं फेसबुक पेज लाईक करा.         http://fb.com/swarajyanama

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here