भुगाव रस्त्याची दुर्दशा ८ दिवसांत न सोडवल्यास पुन्हा रास्ता रोको करणार

0
1859

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  रस्त्याची दुरावस्था, वाहतुक खोळंबा यांस कंटाळलेल्या भुगावकरांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपासण्याची तयारी चालवली आहे. चांदणी चौक–कोलाड मार्गावरील मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बेजार झाले आहे. आंदोलन केल्यानंतर कारवाईचे आश्वासन देणार्या प्रशासनाला आश्वासनाचे विस्मरण झाल्याने त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी समस्त भुगावकर एकत्र आले. त्यांनी ग्रामसभेचा ठराव करून पुन्हा आंदोनल उभारण्याचा कडक इशारा दिला आहे. ८ दिवसांत काम सुरू न झाल्यास भुगावकरांचा रास्ता रोको होणार, हे निश्चित आहे.

              भुगाव हे पुणे शहराच्या हाकेवरचे गाव आहे. मात्र योग्य रस्त्याचा अभावामुळे भुगावकरांसह मुळशीकर नागरीक व पुणेरी चाकरमाने रोज वाहतुकीच्या खोळंब्याला सामोरे जात आहेत. या समस्येमुळे भुगाव मध्ये राहणे जिकीरीचे झाले आहे. अरूंद व खराब रस्ते असल्याने वाहतुक अतिशय संथगतीने होत असते. वाहनांची एवढी प्रचंड वर्दळ असते की, अनेक तास वाहतुक कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे त्रासलेल्या भुगावकर ग्रामस्थांनी ९ ऑगस्ट २०१९ रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावर उपमुख्य कार्यकारी अभियंता देवकाते यांनी एक महिन्याच्या आतच रस्ता दुरूस्ती करून बाजुची गटारं तयार करणं, नालासफाई व मानस तलाव ते रामनदी असा रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजतागायत ३ महिन्यानंतरही कोणतेच काम सुरू न झाल्याने पुन्हा रास्ता रोको करणार असल्याचा निर्धार ग्रामसभेत करण्यात आला आहे.

              मंगळवार दि.२६ नोव्हेंबरच्या ग्रामसभेत ठराव केलेल्या पत्राचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अभियंता श्री.देवकाते यांना सरंपच निकीता रमेश सणस, मा.उपसरपंच स्वस्तिक चोंधे, राहुल आबा शेडगे, ग्रामपंचायत सदस्य सतिश इंगवले, विशाल भिलारे, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, तंटा मुक्ती अध्यक्ष अंकुश घारे, रामजी चोंधे, कैलास चोंधे, जितेंद्र इंगवले, संजय चोंधे, प्रदीप चोंधे, सोमनाथ चोंधे, गणेश चोंधे, विशाल चोंधे यांनी दिले आहे.

काय आहे भुगावच्या रस्त्याची परिस्थिती, काय होतात समस्या ?

              पुणे-कोलाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वर भुगाव हद्दीत रस्त्यांना साईड गटारं नाहीत, त्यामुळे रस्त्यांवर पावसाचे पाणी येऊन अतिशय भयंकर अवस्था झाली आहे. सोसायट्यांमध्ये पडणारे पावसाचे पाणी नागरीकांच्या घरांत जाऊन ४ ते ५ फुटांपर्यंत साठत आहे. ओढे व नाल्यांवरील पुलांची उंची वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे पावसाळ्यात या पुलांवरून गाडी नेल्याने तिच्यात पाणी जाऊन ती नादुरूस्त होते. त्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडतात.

              खड्डेच खड्डे पडल्याने ते कितीही दुरूस्त केले तरी ते लगेच एक दोन दिवसात पुन्हा पडतात, परिणामी वाहतुक अतिशय संथ होऊन प्रचंड वाहतुक कोंडी होते. त्यात लग्नसमारंभ असल्यावर तर ४ ते ५ तास या वाहतुक कोंडीत अडकून पडावे लागते. त्यात शाळकरी मुलं, रूग्णं व ज्येष्ठ नागरिक यांना फार त्रास होतो. त्यामुळे या निवेदनाचा विचार करून त्वरित कारवाई न केल्यास प्रशासनाला भुगावकरांच्या रोषाला सामोरे जावे लागणार, हे निश्चित.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here