स्वराज्यनामा ऑनलाईन : जमिनीचा वाद विकोपाला गेल्याने झालेल्या झटापटीत एकाचा खून झाला. ही घटना मुळशी तालुक्यातील वळणे गावात घडली आहे. या घटनेत विलास कुंडलिक साबणे (वय.५१) या व्यक्तीचा खून करण्यात आला असून सुरेश ऊर्फ बाळासाहेब सातपुते (वय.६२) या आरोपीला या खून प्रकरणी पौड पोलिसांनी अटक केली आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विलास साबणे यांनी वळणे गावात १२ गुंठे जागा आरोपी सातपुते यांच्याकडून खरेदी केली होती. या बदल्यात साबणे यांनी सातपुते यांना पाच लाख रूपये दिले होते. गुरूवार (दि.७) रोजी या जमिनीची मोजणी साबणे यांनी ठेवली होती.
यावेळी सदर जमिन असलेल्या ठिकाणी सातपुते यांनी जमिन खरेदीची राहिलेली रक्कम द्या मग जमिनीची मोजणी करा असे साबणे यांना सांगितले. यानंतर साबणे आणि सातपुते यांच्यात झटापट झाली. यामध्ये सातपुते यांनी हातात असलेल्या हत्याराने साबणे यांना मारहाण केली. यात साबणे यांचा मृत्यू झाला. पौड पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.