पौड. ता.मुळशी येथील कॉंग्रेस भवनात हॅटट्रिक आमदार संग्राम थोपटे मुळशीकरांच्या जाहिर सत्काराला उत्तर देताना.
स्वराज्यनामा ऑनलाईन : कितीही चुकीचा प्रचार कोणी केला तरीही लोकंच ठरवत असतात कोण आमदार होणार. असे मत भोर विधानसभेत सलग तिसर्यांदा निवडून आलेले आमदार संग्राम थोपटे यांनी पौड, ता.मुळशी येथील कॉंग्रेस भवन येथे व्यक्त केले. हॅटट्रिक आमदार असलेल्या संग्राम थोपटे यांचा मुळशीकरांच्या वतीने जाहिर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी खासदार अशोक मोहोळ, ज्येष्ठ नेते रामभाऊ ठोंबरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सविता दगडे, सभापती राधिका कोंढरे, कोमल वाशिवले, महादेव कोंढरे, सुभाष अमराळे, बाळासाहेब सणस, शिवाजी जांभुळकर, शिवाजी बुचडे, गंगाराम मातेरे, अंकुश मोरे, भगवान नाकती, संजय उभे, संतोष साखरे, दादाराम मांडेकर, राहुल जाधव, सुहास भोते, मधुर दाभाडे, निलेश पाडाळे, सुनिल चांदेरे, दिग्विजय हुलावळे, जितेंद्र इंगवले, विलास अमराळे, सुरेश पारखी, प्रवीण जांभुळकर, भानुदास गोळे, राहुल जांभुळकर, किसन नागरे, विठ्ठल गोडांबे, प्रमोद मांडेकर, प्रसाद खानेकर आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
थोपटे बोलताना म्हणाले की, जनतेने ठरवल्यानेच मला पुन्हा आमदारकीसाठी निवडून दिल्याने त्या समस्त जनतेचा मी ऋणी आहे. पुढील 5 वर्षात त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळशीतील मुख्य समस्या असलेली गोष्ट म्हणजे रस्त्यांचा प्रश्न आहे. पावसाच्या पुर्ण विश्रांतीनंतर रस्त्यांच्या सर्वच कामांना गती मिळेल, ती लवकरात लवकर पुर्ण करून घ्यायचा प्रयत्न राहिल. पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाई संदर्भात आदेश प्रशासनाला दिले असून ते ही लवकर व्हावेत यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आजकालच्या काळात संपर्क ही महत्वाची गोष्ट झाली असून इथून पुढे मुळशीकरांसाठी महिन्यातून दोन मंगळवार पौड येथे उपलब्ध रहायचा प्रयत्न करणार आहे. मागील काळात हा संपर्क कमी पडल्याची प्रांजळ भावनाही त्यांनी बोलवून दाखवली.
या निवडणूकीत मुळशीकरांनी मोलाची साथ दिल्यामुळे विजयी होणे सुकर झाले, त्यामुळे समस्त मुळशीकरांचा मी आभारी आहे, असे सांगून थोपटे यांनी विरोधकांचाही खास समाचार आपल्या शैलीतून घेतला. समोरच्या उमेदवाराने इंदापूरच्या मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार हे मतदान यंत्रावर दोन नंबरला असल्याने त्यांचं दोन नंबरचं बटन दाबायचं हा खासदार सुप्रियाताईंचा इंदापूरचा व्हिडीओ भोर मतदारसंघात वायरल केला. पण जनतेने चुक केली नाही. जातीयवाद, प्रांतवाद जनतेने निष्फळ ठरवला. आघाडीचा पॅटर्न जर नेहमीच राहिला तर शिवसेनेसारखा पक्ष मुळशीत नाममात्रच राहिल, यात शंकाच नाही. आघाडीचे सर्वजण चोख काम करत असताना एक माशी शिंकली आणि बिघाडी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अशांचा योग्य तो समाचार घेतला जाईल. आणि खरं तर कार्यक्रम पीडीसीसी बॅंकेत घ्यायचा होता. पण तिथंही सन्मानानेच जायचं असल्याने आता तिथं काही कार्यक्रम घेऊ दिला नाही, नंतर सन्मानानेच तिथंही जाणार आहे. जनतेच्या समस्या जमिनीवरच्याच हेलिकॉप्टरने सोडवणार असल्याचे सांगताच हशा पिकला होता.
यावेळी अध्यक्षीय भाषणात माजी खासदार अशोक मोहोळ म्हणाले की, मुळशी तालुक्यात जी काही विकासाची कामं झाली ती केवळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातूनच झाली. त्यामुळे विधानसभेसारखी एकजूट या पक्षांनी कायम ठेवून विकासात भर घालत रहावी. यावेळी विविध मान्यवरांनी आपापली मतं भाषणातून मांडली. थोपटे यांचा विविध ग्रामस्थं, संघटना यांनी सत्कार केला. सत्कारापुर्वी पौड एसटी स्टॅंड ते कॉंग्रेस भवन येथे वाजतगाजत मिरवणूक काढली होती. मुळशी तालुका कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आरपीआय कवाडे गट आणि मित्र पक्षाच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीतही आघाडी पॅटर्न राबवू
आघाडीच्या एकजुटीमुळे विधानसभेत यश मिळाल्याचे मान्य करत आमदार संग्राम थोपटे यांनी एक सुचक वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीसारखंच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकीत आघाडीचा पॅटर्न राबवू असा सूर थोपटे यांनी आळवला आहे. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी यावर मुळशी तालुका राष्ट्रवादी काय प्रतिसाद देते हे भविष्यात दिसून येईलच. थोपटे म्हणाले की, विरोधी पक्षांचे मनसुबे आणि पक्षाला हद्दपार करायचे असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी पॅटर्नने एकत्रच लढल्या पाहिजेत. जिथं शक्य होणार नाही तिथे मैत्रीपुर्ण लढती करायचा प्रयत्न करू असेही त्यांनी पुढे आपलं मत व्यक्त केलं आहे.