निरंजन सेवाभावी संस्थेने घेतले १०२ मुलांचे शैक्षणिक पालकत्व

0
621

नांदगाव (ता. मुळशी) येथे कोळवण खोऱ्यातील १०२ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्विकारताना निरंजन सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थं व शिक्षकवृंद.

स्वराज्यनामा ऑनलाईन : मुळशीतील दुर्गम भागातील १०२ मुलांचे शैक्षणिक पालकत्व निरंजन सेवाभावी संस्थेने घेतले आहे. दुर्गम भागातील प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण घेता यावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून “विद्यार्थी पालकत्व अभियान” या संस्थेने राबवले. या योजनेअंतर्गत कोळवण परिसरातील जवळपास १८ गावातील तसेच तुंग, तिकोणा, लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील एकुण १०२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक पालकत्व अंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

          कोळवण खोऱ्यातील नांदगाव, होतले, चिखलगाव, डोंगरगाव, खालचीवाडी, कोळवण, साठेसाई, हाडशी,  शिंदेवाडी, भालगुडी, काशीग, कामतवाडी, तिडकेवाडी, लाव्हाळवाडी या गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या-पुस्तके, गणवेश, बुट, छत्री, पाणी बॉटल, कंपासपोटी इत्यादी सर्व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

          यावेळी निरंजन सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट, अंजली तापडिया, दिनेश मुंदडा, भरत लढे,  आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते, नांदगावचे उपसरपंच चेतन फाले, केंद्रप्रमुख विजय जाधव, गोरख सातपुते, विषय तज्ञ उमेश थोपटे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष संदिप दुर्गे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दशरथ फाले, बेल्हेकर काका, कोळवण केंद्रातील शिक्षक वृंद, पालक व ग्रामस्थं मोठया संख्येने उपस्थित होते.

          दुर्गम भागात राहणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत सर्वोत्तम शिक्षण सुविधा पोहोचविण्यासाठी प्रयत्न निरंजन संस्था करत आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही म्हणून परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यात ही मदत करण्यासाठी आमची संस्था कार्यरत राहिल, असे यावेळी निरंजन संस्थेच्या अंजली तापडिया यांनी सांगितले.

          निरंजन सेवाभावी संस्थेचे हे 9 वे वर्ष असुन आत्तापर्यंत शिवनेरी, राजगड, तोरणा, तुंग, लोहगड, तिकोणा, रायगड या किल्ल्यांच्या पायथ्याला असणाऱ्या आदीवासी पाडे, गावांतील विद्यार्थ्यांना, तसेच बिड, अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांतील १०६८ विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे.

          भारताचा अविभाज्य भाग असणारे जम्मू आणि काश्मीर आता नवी भरारी घेऊ पाहात आहे. प्रगतीशील जम्मू काश्मीर उभारण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनला प्रतिसाद देत निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे जम्मू -काश्मीर मधील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून निरंजन संस्थेकडून १५ ऑगस्ट रोजी डोडा येथील शाळेतील ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे पालकत्व घेण्यात आले. तसेच ५० शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर बसवण्यात येणार आहेत.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here