कातकरी बांधवांत समाजप्रबोधन करत पौड ते चिरनेर पायी प्रवास

0
615

स्वराज्यनामा ऑनलाईन : पौड, ता.मुळशी येथील सचिन आकरे या तरूणाने १४० किलोमीटर प्रवास करून क्रांतीकारक हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांना अनोखे अभिवादन केले. क्रांतीकारकाच्या स्मृती दिनानिमित्त सचिन सदाशिवराव आकरे या तरुणाने आपल्या गळ्यात नाग्या बाबांची प्रतिमा घालीत, पौड ते चिरनेर (जि. रायगड) हा १४० किलोमीटर, सलग आठ दिवस पायी प्रवास करुन वाटेत येणाऱ्या सर्व आदिवासी पाड्यांत समाजप्रबोधन केले. 

         २५ सप्टेंबर १९३० साली चिरनेर (जि. रायगड) येथील अक्कादेवीच्या माळरानावर जंगल सत्याग्रह झाला होता. यामध्ये इंग्रज्यांच्या गोळीबारात आठ सत्याग्रहींना वीर मरण आले होते. त्यामध्ये आदिवासी-कातकरी समाजातील नाग्या महादू कातकरी या तरुणाला हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांच्याच स्मृतीदिना प्रित्यर्थ त्यांनी हा प्रवास केला.

         सचिन आकरे हे मुळ भुम (जि. उस्मानाबाद) या ठिकाणचे असुन ते मोटार मॅकेनिकल आहेत. दहा वर्षापुर्वी कामाच्या शोधात मुळशीत आले. परंतु येथील कातकरी समाजाची परिस्थिती पाहून त्यांनी आदिवासी लोकांसाठी काम करण्याचे ठरविले. डोनेटोड सोसायटी, राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था, वनवासी कल्याण आश्रम, आदिवासी कल्याण संघ, संपर्क जीवन संवर्धन फाऊंडेशन, गुरुकुल एज्युकेशन फाऊंडेशन यांसारख्या स्वयंसेवी संस्थांमार्फत मदत गोळा करुन ती मदत गरजु आदिवासींकडे ते पोहचवितात. आत्तापर्यंत त्यांनी अनेक आदिवासींच्या कागदपत्रे पुर्तता करुन त्यांच्यात प्रबोधन करण्याचे काम करीत आहेत.

         त्यांनी पौड मधुन आपल्या प्रवासाला १८ सप्टेबर रोजी सुरुवात केली होती. वाटेत  कोळवणमार्गे राऊतवाडी(पवनानगर), औंढे, खालापुर, पोईंजे, चिंचवण, कले, साई येथे आठ दिवस आदिवासी बांधवांकडे मुक्काम करुन चिरणेर येथे पोहोचले.  वाटेत येणाऱ्या शाळा, आदिवासी पाड्यांमध्ये त्याचे जंगी स्वागत केले गेले. त्यांनी व्यसनमुक्ती, मुलांचे शिक्षण, बालविवाह, कागदपत्र पुर्तता, समाजाशी एकरुपता यांसारख्या अनेक विषयावर आदिवासी बांधवांमध्ये प्रबोधन केले. या पायी वारीसाठी अनिल वाघमारे, डॉ. अशोक काळे यांची त्यांना विशेष मदत लाभली.

आदिवासी दिंडी निघावी यासाठी प्रयत्न करणार – सचिन आकरे

         पुणे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने ते वाम मार्गाला जात आहेत. या प्रवासामधुन मी त्यांना प्रबोधन करुन त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणार आहे. दरवर्षी हा पायी प्रवास करुन भविष्यात लोकसहभाग वाढवुन याला आदिवासी दिंडीचे स्वरुप देणार आहे. 

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here